Ad

Tuesday, 26 December 2023

बोधिसत्व कथा # 10

बोधिसत्व कथा # 10

मार्शल आर्ट्स शिकणारा विद्यार्थी  बोधिसत्वाकडे जाऊन म्हणाला, मला तुमच्या शैलीतले मार्शल आर्टस् शिकायचे आहे पण त्या सोबत मला दुसऱ्या गुरुच्या शैलीतील युद्धकला सुद्धा शिकायची आहे तुम्हाला ही कल्पना कशी वाटते?"
    बोधिसत्व म्हणाला," दोन सशांच्या मागे धावणाऱ्या पारध्याला कोणताच ससा सापडत नाही".

***********************

💡- एकाच वेळी सगळ्यातलं हवं असलेल्या माणसाला काहीच मिळत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या ही म्हण त्या साठीच आहे. मल्टीटास्किंग च्या नादात कुठलंच स्किल साध्य होत नाही.
      आखुडशिंगी,बहुगुणी ,बहुदुधी गाय कोणालाच मिळत नसते. मा.अविनाश धर्माधिकारी सर नेहमी एक त्रिसूत्री सांगतात.
    स्वतःला ओळख
    त्याप्रमाणे क्षेत्र निवड
    निवड केलेल्या क्षेत्रात 100 टक्के एफर्ट्स दे...
    स्वतःला काय हवे,आपली स्ट्रेंथ काय हेच कळत नाही आयुष्य संपत आलं तरी..स्वतः ला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात शंभर टक्के देण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडूलकर.. लता मंगेशकर...अमिताभ बच्चन...कल्पना करा या तिघांनी स्वतःला ओळखून त्या प्रमाणे त्या क्षेत्रात शंभर टक्के दिले नसते तर काय झाले असते..
     " सचिन रमेश तेंडुलकर" -अव्वल कारकून फलाणा तहसील कार्यालय ....कसं वाटत ?
     " श्रीमती लता दीनानाथ मंगेशकर , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, फलाणी शाळा..
.. वाचायला कसं वाटत ना...

किंवा अमिताभ बच्चनच्या  शर्ट वर सिक्युरिटी गार्ड- फलाणी कंपनी.... कसे वाटेल बघायला?

    स्वतःला ओळखून 
 फक्त त्यावरच फोकस करणे आवश्यक आहे.अष्टपैलू दुर्मिळ असतात .स्वतःचे मुलं अष्टपैलू व्हावे म्हणून त्याला तबल्यापासून क्रिकेट पर्यंत सर्वच ठिकाणी पाठवणारे  पालकही  असतात.
      प्रत्येकाला निर्सगाने काहितरी स्ट्रेंथ दिलीय काहीतरी त्रुटी दिलीय ते ओळखून करिअर निवड प्रगतीचे दार उघडले

अत्त दीप भव .☺️

- प्रशांत

Monday, 25 December 2023

बोधिसत्व कथा # 9

बोधिसत्व कथा # 9

एका प्रसिद्ध झेन गुरुकडे  एक तरुण युद्धकला शिकत असतो. तो तरुण इतर विद्यार्थ्यासोबत मैदानात रोज सराव करत असतो. एक दिवस  गुरुंच्या लक्षात येत की त्या  तरुणाच्या तंत्रात इतर विद्यार्थी  सतत अडचणी निर्माण करीत आहेत. त्या तरुणाचे  नैराश्य लक्षात घेऊन गुरूने त्याच्या जवळ जात त्याला विचारले काय अडचण आहे? तो तरुण म्हणाला " मी माझे तंत्र वापरू शकत नाहीये.. मला समजत नाहीये काय अडचण आहे... गुरू म्हणाले "त्याच कारण तुला एकतानता समजली नाहीये.., चल माझ्या बरोबर..
     तरुण शिष्य गुरूंच्या मागे निघाला..थोड्याच अंतरावर जंगल होते ,त्या जंगलात ओहोळ वहात होता तिथे ते आले..थोडा वेळ तिथे उभे राहिल्यावर गुरू म्हणाले "त्या  वाहत्या पाण्याकडे बघ, ते दगडांना ,खडकांना मारत नाहीये, विरोध करत नाहीये, आणि निराश होऊन थांबत नाहीये.. तर त्याच्या आजूबाजूने वहात सतत प्रवाहित होतंय या पाण्यासारखा हो, तुला एकतानता म्हणजे काय ते कळेल...
     तो तरुण काय समजायचे ते समजला ..लवकरच तो पाण्यासारखा झाला . नंतर त्याला  सरावात त्याचे तंत्र दाखवण्या पासून कोणीच रोखू शकले नाही..

💡- अडथळ्याशिवाय आयुष्य नाही ..आणि त्याशिवाय मजा नाही.. आयुष्यात चॅलेंज नसेल तर आयुष्य बेचव होईल..जीवनाच्या क्रिझ वर बॅटिंग करताना संकटांचे बाऊन्सर येणारच आहेत, फसव्या गुगलीचा सामना करावा लागतोच..संकटाचा चेंडू यॉर्कर आहे, इनस्विंगर आहे, की आऊट स्विंगर आहे हे ओळखावं लागतं.. हे सर्व करताना बाजूचे क्षेत्ररक्षक काही तुमचे कौतुक करत नसतात त्यांचे स्लेजिंग चालूच असत..
     आयुष्याचा डाव तुम्हालाच खेळावा लागतो ..आयुष्य कधी सजवावे लागते तर कधी सावरावे लागते.. तुमच्या प्रगतीने सुखावणारे खूपच थोडे असतात..जळणारे ,अडथळे आणणारे, गोड बोलून काटा काढणारे जास्त असतात..
     त्यांना उत्तरे देत आपली एनर्जी फुकट घालवायची नाही..उद्या हीच लोकं तुमचं शतक झाल्यावर अभिनंदन करायला येतात... तो पर्यंत आपली एकतानता सोडून नये ..खेळत रहायच...😊

अत्त दीप भव

😊-प्रशांत

Sunday, 24 December 2023

बोधिसत्व कथा?#८

बोधिसत्व कथा?#८ 

एकदा एक शिष्य बोधिसत्वाकडे येऊन म्हणाला की ,मला ध्यान जमत नाही, काय करू?
बोधिसत्व म्हणाले , " हे निघून जाईल "
      काही दिवसांनी तो शिष्य परत आला आणि आनंदांने म्हणाला, गुरुजी आता ध्यान उत्तम जमतंय..
     बोधिसत्व म्हणाले," हे निघून जाईल".

***********************

💡- बोधिसत्वाच्या कथांमध्ये एक गूढ अर्थ असतो वरवर वाचून तो समजत नाही. सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन टोकांमध्ये विचारांचा लोलक फिरत असतो. आयुष्यात केवळ सकारात्मक गोष्टी घडतील किंवा केवळ नकारात्मक घटना घडतील असे नसते ,दोन्ही ठिकाणी सम बुद्धी म्हणजे स्वीकारात्मकता.
     ध्यानाच्या उच्च पातळीत कायम रहाणे सामान्य माणसाला शक्य नसते. जसे सुखाची अवस्था कायम रहात नाही. जत्रेतील पाळणा जसा वर जातो उच्च पातळीवर पोहीचतो तिथून परत खाली येतो ..पुन्हा वर जातो तसेच साधना करताना आणि आयुष्य जगताना सुद्धा होत असते..बोधिसत्वाना त्या शिष्याला सांगायचे आहे की ध्यान जमले तरी आनंद नको आणि नाही जमलं तरी दुःख नको या दोन्ही अवस्था स्वीकार ,साक्षी भावाने आयुष्याकडे बघ..
     विशेष म्हणजे भगवद्गीता पण हेच सांगते तू कर्म करत रहा बाकी सगळं माझ्यावर सोपव..भगवान श्रीकृष्ण पण स्वीकारात्मक व्हा असे त्यांच्या जीवना जगण्याच्या पद्धतीने सांगतात.त्यानी गोकुळवासीयांचे प्रेम ही स्वीकारले आणि महाभारताच्या युद्धानंतर गांधारीचा वंशक्षयाचा शापही स्वीकारला..
     अल्बर्ट एलिस यांचे माईंडफुलनेस हेच सांगते की प्रत्येक क्षण जगा, तो जसा आहे तसा स्वीकारा.
     शाश्वत तत्वज्ञान नष्ट होत नाही मुळगाभा तोच ठेऊन प्रत्येक  कालखंडात ते रूप बदलून येते..
    अत्त दीप भव...

😊-प्रशांत

Saturday, 23 December 2023

बोधिसत्व कथा /#६

बोधिसत्व कथा /#६

एकदा एका विद्वानाने संबोधी ..ध्यान प्राप्त करण्यासाठी   खूप सारे ग्रंथ घेतले आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर जाळून टाकले.

*********************

💡- ग्रंथ हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे संग्रह करण्याचे साध्य नाही. पूर्वसूरींनी त्यांचे ज्ञान शब्दबध्द केले आणि आपल्या पर्यंत पोहोचवले आपण ते शब्दबद्ध ज्ञान शब्दातून मुक्त करून अनुभूती पर्यंत नेले पाहिजे..
      प्रत्यक्षात तसे होत नाही आपण शब्दात अडकतो,त्याच्या प्रेमात पडतो ते मुखोद्गत करतो पण अनुभूतीत परावर्तित होत नाही. ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार तेहतीस ओव्यांपैकी एक तरी ओवी अनुभवावी असे का म्हटले गेले असेल.? 
     हरिपाठाची पारायणे होतात,कीर्तने होतात ,प्रवचने होतात. ऐकून ऐकून सर्व तोंड पाठ होते. सर्व तोंडपाठ झाले म्हणजे ज्ञान झाले का? 
   आपल्या पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत घोकायची आणि ओकायची सवय होती.कविता ,श्लोक तोंडपाठ करायचे आणि न अडखळता म्हणून दाखवले की झाला हुषार विद्यार्थी.. कविता किंवा श्लोक किती समजला याला काही महत्वच  नव्हतं...
      शाळेत असताना  नागरिक शास्त्र विषय असतो ,त्याची परीक्षा होते  आपण पास होतो.पण पुढच्या आयुष्यात त्याचा किती उपयोग करतो ? 
      आपण केवळ परिक्षार्थी झालोय ,खरंतर विद्यार्थी असणे हे सुद्धा पुरेसे नाही.विद्या मिळवणे ही पहिली पायरी त्या विद्येचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी जेव्हा होतो तेव्हा तो ज्ञानार्थी होतो.विद्या हे कौशल्य आहे आणि ज्ञान ही अनुभूती आहे. लाकडाच्या तुकड्यापासून खुर्ची बनवणे हे स्किल किंवा कौशल्य आहे पण ती खुर्ची तयार झाल्यावर पाहणे तीत बसणे, तिला स्पर्श करणे हे ज्ञान आहे..
     ज्ञान झाल्यावर ग्रंथांची गरज उरत नाही उलट त्यांचा संग्रह अहंकारात रूपांतरित होण्याची शक्यता जास्तच....

अत्त दीप भव 🙏🏻

☺️- प्रशांत

बोधिसत्व कथा /#७

बोधिसत्व कथा /#७

बोधिसत्व वारल्या नंतर त्यांचा आंधळा शेजारी मित्राला म्हणाला मी कोणाला पाहू शकत नाही पण बोलणाऱ्याला आवाजावरून जोखतो..अभिनंदन करणाऱ्या माणसाच्या आवाजातील सूक्ष्म स्वार्थ आणि मत्सर मला जाणवतो , दुःखी माणसाबद्दल सहानुभूती दाखवायला बोललेल्या शब्दांमागचा आनंद मला जाणवतो...
     पण बोधिसत्व  जे बोलायचा त्यात फक्त आणि फक्त आनंदाचा आवाज असायचा...

********************

💡- आपल्या मनातील भावना दाखवणारा आरसा असता तर आपली आपल्यालाच लाज वाटली असती. आपण आहोत कसे? बोलतो कसे आणि वास्तवात आपण कसे आहोत..?
     आपण व्यक्त केलेल्या आनंद,दुःख या भावना खऱ्याच असतात की आपण केलेला तो अभिनय असतो? एखाद्याच्या आनंदाचा आपल्याला खरंच आनंद होतो की त्यामागे स्वार्थ आणि मत्सर असतो . प्रमोशन मिळालेल्या साहेबांचे अभिनंदन करताना आपण त्यांच्या " नजरेत' असावे हा हेतू तर नसतो..? किंवा  बघा याला वशील्याने प्रमोशन मिळालय..हा भाव नसतो ना?
     लग्नाच्या प्रसंगी आहेर देताना आणि वधू वराचे अभिनंदन करताना त्यात खरंच उस्फुर्तता असते की , त्यात हिशोबी व्यवहार्यता असते? आपल्या कडच्या लग्नात कोणी किती रक्कमेची पाकिटे घातली याची काही जण लिस्ट तयार करतात त्या रेंज मध्ये त्याची परतफेड केली जाते.. आनंदाच्या अभिनया आड बेमालूमपणे लपवलेला चोख हिशेबीपणा..
     एखाद्याचे वाईट झाले तर खरच वाईट वाटते का? की बर झालं लय उडत होता/उडत होती  या भावना मनात असतात ?
     माणूस आतून दुभंगलेले आहे. जसा आहे तसा व्यक्त होण्याऐवजी जसा पाहिजे तसा व्यक्त होतोय..
    आजकाल सोशल मीडियावर इमोजी नावाचे मुखवटे मिळतातच ना..ते वापरले की कोणी गेलं की RIP या तीन अक्षरात मोकळं होता येते दुसऱ्याच क्षणी HBD या तीन अक्षरात शुभेच्छा देता येतात. भावना असण्यापेक्षा त्याचे प्रेझेंटेशन कसे आहे यालाच महत्व आले आहे. 
       माझी प्रतिमा आणि वास्तवातील मी यात जितके अंतर पडत जाईल तसा माणूस स्वतःलाच अनोळखी होत जाईल. वर्षानुवर्षे अभिनय केलेल्या माणसाला कधीतरी स्वतःची ओळख शोधावीच लागेल..नाहीतर माणसं स्किझो होतील...

अत्त दीप भव...

☺️ - प्रशांत

Thursday, 21 December 2023

बोधिसत्व कथा /#५

बोधिसत्व कथा /#५

एकदा चार भिख्कू  आठ दिवस मौन साधना करायचे ठरवतात. पहिल्याच दिवशी संध्याकाळी त्यानी लावलेली मेणबत्ती विझते..

पहिला भिख्कू- " अरेच्चा मेणबत्ती विझली "
दुसरा भिख्कू- " अरे हो, खरच की..!
तिसरा भिख्कू- ° अरे जरा शांत रहा ना माझं मौन चालू आहे ना "
चौथा भिख्कू- " तरी बरं मी काही बोललोच नाही"

****************

💡- बहुतेक वेळी असच होते.चांगल्या हेतूने केलेले कर्म ,हेतू भरकटले की त्याचे कर्मकांड होते.ऑफिसमध्ये आजारी असल्याचे खोटे कारण सांगून घरी "सत्य" नारायण  घालणारे गृहस्थ आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाची रेसिपी किती बरोबर आणि किती चूक याचीच चर्चा करणाऱ्या गृहिणी...ही हेतु भरकटलेल्या कर्मकांडाची उदाहरणे आहेत. 
    जप करताना त्या देवतेशी तादात्म्य पावलो तर जप केल्यावर लगेचच लौकिकात आपण येत नाही..कारण त्या फेज मधून बाहेर यायला थोडा वेळ लागतो. जपमाळेचा शेवटचा मणी पार केल्या केल्या जर संसार आठवत असेल काहीतरी गडबड आहे.
     मौनसाधनेची पहिली स्टेप म्हणजे घराचा पुढचा दरवाजा बंद करून घराची स्वच्छता करणे.मौन साधना म्हणजे मौन चालू झाल्यावर इतरांशी संवाद बंद करणे आणि स्वतःशी संवाद चालू करणे ..तो जर झाला तर आपण आपल्याला कळत जातो. विपश्यना म्हणजे विशेष पहाणे.. विशेष पहाणे म्हणजे डोळे बंद करून आपले अंतरंग पहाणे.. आपल्या मनात चाललेल्या घडामोडी तटस्थ पहाणे.
      हे एकदा जमले की बाहेर मेणबत्या विझोत ,वारे वादळ येवोत साधकाला त्याने काही फरक पडत नाही

अत्त दीप भव..

😊 प्रशांत

Wednesday, 20 December 2023

बोधिसत्व कथा/#४

बोधिसत्व कथा/#४

एकदा बोधिसत्व आणि त्याचा मित्र  एका गावाकडे जात असताना मध्ये एक नदी लागते ,नदीचा प्रवाह खूप वेगाने वहात असतो .त्या काठावर एक तरुणी  नदी पार कशी करू या काळजीत असते, पण बोधिसत्व आणि त्याच्या मित्राला पाहून तिला हायसे वाटते . ती बोधिसत्वयाच्या मित्राला विचारते की मला पलीकडे नेऊन सोडाल का? मित्र संकोचतो..त्याची द्विधा होते..इतक्यात बोधिसत्व त्या तरुणीला खांद्यावर  बसवतो आणि नदी पार करतो .नदीच्या दुसऱ्या काठावर तीला सोडून ,बोधिसत्व आणि त्याचा मित्र पुढे मार्गक्रमण करायला लागतात
      खूपसे अंतर  चालल्यावर बोधिसत्वाचा मित्र त्याला विचारतो की आपल्या शिकवणुकीत स्त्रीसंपर्क करू नये अस म्हटलंय आणि तू तिला थेट उचलून नदी पार केलीस हे कसे?
     बोधिसत्व किंचित स्मित करून म्हणतो ,अरे मित्रा मी तिला नदीच्या काठावरच सोडून आलो आणि तू मात्र अजून तिला घेऊन चालतोयस...

**********************

💡- उपनिषदामध्ये एक सुंदर शब्द आहे इदं न मम..हे माझे नाही.. आयुष्य जगताना वस्तू आणि व्यक्तींशी संपर्क येणे अपरिहार्य आहे.कर्म करताना त्यात लिप्त होणे स्वाभाविक आहे. जसे मातीचे मडके करताना हाटाला माती लागणे अपरिहार्य असते. पण मडके तयार झाल्यावर हात स्वच्छ करणे ..त्यात गुंतून न रहाणे यालाच म्हणतात इदं न मम..वरच्या कथेत बोधिसत्वाने त्या तरुणीला मदत करणे हे कर्तव्य समजले आणि ते पूर्ण केले.मदत करताना ती कोण आहे? ती तरुण आहे, ती सुंदर आहे या भावनांचा लवलेशही त्याच्या मनात नव्हता त्यामुळे कर्तव्य पूर्ण झाल्यावर तिच्या बद्दल विचारांचा लवलेशही त्याच्या मनात नव्हता, शिष्य मात्र ती तरुणी, तिचे सौन्दर्य यातच अडकून बसला होता. तिला न उचलताही तिचे ओझे मनात ठेवून चालत होता.
       पाप-पुण्याचे हिशेब जुळवत आयुष्य जगायचे नसते.आला क्षण जगून झाला की तो भूतकाळ होतो त्यात रमून काही उपयोग नसतो. कर्तव्य पार पडलं की मनाची पाटी परत कोरी करायची तिथेच रेंगाळत बसू नये हेच या कथेचे सार...

अत्त दीप भव..

☺️- प्रशांत

बोधिसत्व कथा/#३

बोधिसत्व कथा/#३

एकदा दोन मित्र रस्त्यात उभे राहून बाजूच्या मंदिरावरच्या झेंड्याकडे पहात वाद घालत होते

पहिला- झेंडा हलतोय
दुसरा- नाही ,वारा हलतोय(मृगजळ)

बाजूने बोधिसत्व जात होते, ते दोघांना म्हणाले वाराही हलत नाही आणि झेंडाही हलत नाहीये हलतंय ते तुमचे मन..

💡- प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन भिन्न असू शकतो त्याच बरोबर त्याचे आकलन (परसेप्शन) वेगळे असू शकते . सत्य एकच असले तरी त्याची मांडणी प्रत्येक जण वेगळी करू शकतो .ती सुद्धा त्याच्या परसेप्शनच्या मर्यादेत. आणि विशेष म्हणजे परसेप्शनला मर्यादा असते ती सुद्धा ज्याची त्याची वेगळी. प्रत्येकाला जाणवलेले सत्य हे सत्यच असते परंतु त्याला जाणवलेले सत्य हे तेवढेच सत्य नसते त्याहून आणखी वेगळे ,आणखी विस्तृत असण्याची शक्यता असू शकते. उदा. स्टेज वरील वक्त्याला समोरचे श्रोते, खुर्च्या, वर फिरत असलेले फॅन, सभागृहाच्या खिडक्या हे सगळे दिसत असते , ते त्याच्या दृष्टीत येणारे जग असते .आणि त्याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू या सत्यच असतात. पण तेवढ्याच सत्य नसतात..तो स्वतःच एक सत्य असतोच जरी तो स्वतःचा स्वतःला दिसत नसला तरी, त्याच्या मागे असलेल बॅक स्टेज ,मागचा बोर्ड ,वर फिरणारा फॅन हे सारे त्याला दिसत नसते कारण तो श्रोत्यांसमोर बोलत असतो बॅक स्टेजकडे त्याची पाठ असते. त्याच्या दृष्टीने ते अज्ञात असते म्हणजे ते सत्य नसते का? त्याच्या दृष्टीने जे अज्ञात असते ते श्रोत्यांच्या दृष्टीने ज्ञात असते 
     सत्याची ज्ञात आणि अज्ञात अशी विभागणी माणसाने आपल्या सोयीनुसार केली आहे .सत्य हे सत्यच असते . ते स्वयंसिद्ध असते .सूर्य हे सत्य आहे .दिवसा तो दिसतो म्हणून तो असतो, रात्री तो दिसत नाही म्हणून तो असत नाही ..असे थोडेच आहे. त्याचे असणे आणि नसणे आपल्या स्थितीवर ,आपल्या आकलनावर अवलंबून नसते ..तो असतोच .. आपली स्थिती बदलली म्हणजे रात्र झाली की तो आपल्याला म्हणजे फक्त आपल्यालाच दिसत नाही.म्हणून तो नाहीच असे नसते.पृथ्वीवर पलीकडे दिवस चालू असतो त्याना तो दिसतो.आकलनाला स्थिती आणि काळाच्या मर्यादा असते तशीच ते व्यक्तीसापेक्ष असू शकते
       परसेप्शन ही आपली मर्यादा आहे आणि आपली ताकदही...सत्य हे त्या पलीकडचे आहे..थोडे माझ्या आवाक्यातले ...खूपसे  माझ्या आवाक्याच्या पलीकडले...
     बोधिसत्वाच्या या छोट्या पण गहन अर्थपूर्ण कथेचे माझ्या बुद्धीच्या मर्यादेत झालेले हे अंशतः आकलन..इतरांची आकलने भिन्न असू शकतात.

अत्त दीप भव..

☺️-प्रशांत

Tuesday, 19 December 2023

बोधिसत्व कथा-#२

बोधीसत्व कथा-#२

एकदा एक प्राध्यापक बोधिसत्वाकडे  सल्ला मागायला जातो, बोधिसत्व चहा करत असताना हा प्राध्यापक त्याच्याशी तावातावाने चर्चा करत असतो. चहा तयार झाल्यावर बोधिसत्व एक कप त्या प्राध्यापकाच्या हातात देऊन त्यात चहा ओतायला सुरुवात करतो : चहाचा कप  काठोकाठ भरला तरी चहा ओततच रहातो. शेवटी न राहून तो प्राध्यापक म्हणतो अहो महाशय कप भरला आहे आता त्यात अधिकचा चहा कसा मावेल ? त्यावर बोधिसत्व उत्तर देतो की ,तू या कपासारखाच आहेस विचारांनी भरलेला मग मी सांगितलेले विचार तू कसा स्वीकारशील? आधी रिकामा हो मग त्यात काही नवीन भरता येईल..☺️

💡--नवीन विचार समजून  घेण्यासाठी मनाची पाटी कोरी करावी लागते. मनात पूर्वग्रह ठेऊन ऐकताही नीट येत नाही आणि नवीन स्वीकारले जात नाही.

☺️-प्रशांत

बोधिसत्व कथा-#१

बोधिसत्व कथा-#१

  अस्सं ? 

  एकदा एका गावातील एक अविवाहित तरुणी प्रेग्नन्ट रहाते. या पापाचा धनी कोण? आईवडील आणि गावकरी विचारतात..ती तरुणी बोधिसत्वाकडे बोट दाखवते.
     सगळ्या गावात बोधिसत्व एक सदाचारी आणि ज्ञानी माणूस म्हणून ओळखला जात असे. त्या तरुणीच्या आईवडिलांना प्रचंड संताप येतो.. एका सज्जन समजलेल्या माणसाने अस कृत्य करावे??  ते त्याला जाब विचारतात..बोधीसत्व त्याना म्हणतो ....अस्सं?
     यथावकाश ती तरुणी बाळंत झाल्यावर ते बाळ बोधीसत्वाकडे सुपूर्द केलं जातं..तुमचं पाप तुम्हीच सांभाळा.. बोधिसत्व परत एकदा अस्सं म्हणतो आणि ते बाळ स्वीकारतो त्याचे लालन पालन करतो.
     यथावकाश त्या तरुणीला केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो.गावातील एका तरुणाला वाचवण्यासाठी तिने बोधिसत्वावर खोटा आळ घेतलेला असतो.
     ती तरुणी परत बोधिसत्वाकडे जाऊन त्याची क्षमा मागून ते बाळ परत मागते
     बोधिसत्व अस्सं म्हणून तीच बाळ तिच्याकडे  परत सुपूर्द करतो..

√ निष्कर्ष- मान आणि अपमान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण प्रामाणिक असू तर जग तुमच्या विषयी काय म्हणते काय बोलते याची काळजी करू नका. संयम दाखवला तर सत्य प्रकाशात येते. सत्य झाकोळले जाते नष्ट होत नाही. कर्तव्य करा मोह नको पुण्याचा आणि पापाचाही...☺️

 अत्त दीप भव....
-प्रशांत  😌

Friday, 15 December 2023

स्क्रिप्ट

" आपण आपल्या चॉईस प्रमाणे मुलाला जन्म देत नसून मुल आईवडील म्हणून आपल्याला निवडते..जन्म कुठे आणि कोणत्या कुटुंबात घ्यायचा हा पुनर्जन्मास इच्छुक असलेल्या आत्म्याचा चॉईस असतो. ( अधिक माहितीसाठी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांचे लिटरेचर अभ्यासून पहा) कदाचित काही जण याच्याशी सहमत होणार नाहीत. त्याना तो असहमतीचा अधिकार आहेच..ज्याने त्याने स्वतःचा अभ्यास चालू ठेवायचा आहे.
     मुलं आणि आपण एकच नाही हे ध्यानात घ्यायला हवं विशेष करून आयांनी..प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगळी असते आणि भूमिकाही..त्यामुळे कोणाच्याही बाबतीत फार पझेसिव्ह राहू नये. 
      माणसाचा जन्म झाल्याबरोबर नात्यांचे जुगाड चालू होते.एकेक नाते निर्माण होते तसे त्या नात्याचे मोह निर्माण होतात.कारण त्या नात्यापासून लाभ होत असतात. प्रेमात पडल्यावर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणणारी कपल्स काय त्या पूर्वी जगत नव्हती? ज्या दिवशी पहिला श्वास  घेतला तेव्हा पासून माणूस जगतच आलाय. 
    त्यामुळे मी यांच्याशिवाय किंवा हिच्याशिवाय जगू शकत नाही हे सत्य नाही. लोभ माणसांचा नसतो त्या माणसापासून मिळणाऱ्या लाभांचा असतो. तो लाभ थांबेल म्हणून माणसांच्या वियोगाचे दुःख जास्त असते.
    लैंगिक सुख ते वात्सल्य व्हाया मानसिक आणि शारीरिक सुरक्षा या सर्व सुखाच्या भावना आहेत. त्या माणसामुळे पूर्ण होतात म्हणून माणसाला माणसांचा मोह असतो.

आमेन
आजचा ज्ञान डोस संपला
😃😃😃😃😃😃

- प्रशांत

Thursday, 14 December 2023

नाती तुटायची झटका आणि हलाल पद्धत....

नाती तुटायची झटका आणि हलाल पद्धत....

नाती अचानकपणे तुटत नाहीत, अगोदर कारणे शोधली जातात,ती   मेंदूत स्टोअर केली जातात, त्याचवेळी ज्याच्या सोबत नातं तोडायच त्याच्या चांगल्या आठवणी विस्मृतीच्या कप्प्यात ढकल्या जातात...कारण त्या आठवणी नातं तोडायचा निर्धार दुबळा करतात..
     अशा तऱ्हेने पुरेशी कारणे गोळा झाली की , एक दिवस निमित्त शोधले जाते आणि मग स्फोट होतो..मेंदूत साठवलेली कारणे धडाधड पेट घेतात..नाते बेचिराख होते...ही झाली नाते संपवायची झटका पद्धत...एकदाच कडाक्याचे भांडण करायचे आणि नाते तोडून टाकायचे..
      नाते संपवायची दुसरी पद्धत म्हणजे हलाल पद्धत..यात नाते एकदम तोडले जात नाही..हळूहळू तोडले जाते..संवाद कमी कमी होत जातो..हाय हॅलो पासून सुरू झालेले नाते..हळूहळू फारच तपशीलात जात जात गहिरे आणि सेंटी होत जाते आणि मग परत यु टर्न घेऊन हाय हॅलो पर्यन्त येते...अर्थात हा यु टर्न कोणीतरी एक घेतो ..आणि परत येतो ..पण जो दुसरा असतो तो त्या यु टर्न च्या पॉइंटलाच थाम्बलेला असतो. त्याला बहुधा कळतच नाही की सोबत्याने यु टर्न का घेतलाय? तो वाट पहात बसतो परत सगळं ओके होईल..सोबती परत येईल..
.....हे जे वाट पहाणे असते ना तेच हलाल होणे असते.. ती एक तडफड असते..प्यास असते..वाट पाहण्याची शिक्षा देहांताच्या शिक्षेइतकीच वेदनादायी असते.. घट्ट धरलेला हात जेव्हा अलविदा करतो तेव्हा नातं विरून जातं आणि तेच जास्त क्लेशदायक असत

© प्रशांत शेलटकर

Wednesday, 6 December 2023

सल्ल्याचे सलाईन..

सल्ल्याचे सलाईन...

रोग परवडला रे
पण आवर तुझा सल्ला
एलोपॅथी की आयुर्वेद
मनात नुसता कल्ला

कुणी म्हणतो दूध हवे
पण देशी गाईचेच
आणि पीठ तर हवे
ज्वारी आणि बाजरीचेच

जशी काही गोठ्यामध्ये
देशी गाय बांधली आहे
आणि परसात माझ्या
ज्वारी मी पेरली आहे

फळे खा कोणी म्हणतो
कुणी म्हणतो घ्या स्मूदी
कुणी म्हणतो झोपून घ्या
विकत घ्या मसाजगादी

तासभर करा वर्कआऊट
मी देतो डिझाइन
फिटनेसची देतो गॅरंटी
जॉईन व्हा ऑनलाईन

घामेजलेले सेल्फी बघून
कॉम्प्लेक्स मात्र येतो
लोक किती तंदुरुस्त
आणि मी बेडवर लोळतो

म चार दिवस उत्साह
धावणे आणि पळणे
गच्चीत जाऊन सकाळी
जोर बैठका काढणे

शूज ,ट्रॅक पॅन्ट, टोपी
खरेदी मस्त होते
सेल्फी काढून छानसा
सुरवात मस्त होते

रंग तेरड्याचे म्हणे
असतात चार दिवस
चार दिवसातच फिटून जाते
मग व्यायामाची हौस

मग पुन्हा तेच मेसेज
तेच सल्ले फुकटचे
बरं कसं वाटलं मला
बोल घ्या अनुभवाचे

कोणी एक बाई म्हणे
होते मी किती त्रस्त
औषध घ्या अमक्याचे
आता मी आहे मस्त

विश्वास ठेवू नकाच हो
हे असते मार्केटिंग
तुमचं आमचं सर्वांच
असत घाऊक चिटिंग

जिथे पिकते जे जे
तेच खावे नियमाने
करू नयेत उपचार
कोणाच्याही सल्ल्याने

जितक आहे आयुष्य
तितकंच आपण जगणार
वेळ नसेल तुमची तर
यम सुद्धा नाही येणार


- प्रशांत शेलटकर 😃

Saturday, 2 December 2023

उमाळी..

उमाळी...

कवी कुठे मी ?
मी तो उमाळी
सूर्य उगवताच
जशी फुलते कळी

जसा येतो उमाळा
तसे लिहीत जातो
विषय देताच कोणी
लेखणी बंद करतो

दगड देता कोणी
मूर्तिकार मूर्ती निर्मितो
तसेच विषय देताच
कवी कविता देतो

जोवर न येई उमाळा
तोवर जो थंड राही
कवितेच्या प्रांतात
त्याला कवी म्हणत नाही

विनोद केला कोणी
तर हास्य सहजच असते
त्या हसण्यास कोणी
कला म्हणत नसते

तसे विशेष प्रसंगी
मनात दाटले काही
केवळ मीटरमध्ये बसले
त्या काव्य म्हणत नाही

जुळवून कशीतरी अक्षरे
मी लिहितो काहीतरी
कविता म्हणून उगाचच
लोक घेतात डोईवरी

किती तेजस्वी तारे-तारका
किती तेवत्या स्निग्ध पणत्या
त्यात मी कुठे लावू सांगा
माझ्या कवितेच्या उदबत्त्या

जसा येतो उमाळा
तसे मी लिहीत जातो
म्हणून मी स्वतःला
उमाळी म्हणवून घेतो

-प्रशांत शेलटकर
 8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...