Ad

Tuesday 29 March 2022

झाकोळ

झाकोळ...

सूर्य खिशात टाकले त्यांनी
मग काजव्यांना माज चढला
मग सोडली ढोली घुबडांनी
अन भयकारी घुत्कार केला

युगे युगे जळू जळू..
सूर्य वळचणीला गेले
अन मालकांच्या गच्च मिठीत
संपादकीय ते झोपले...

पिसाटलेला बेभान जथा
गतकाळाच्या खणतो कबरी
गेम कधी कोणाचा करावा
घेतो कोणी कोणाची सुपारी

निर्लज्ज झाली लाज इथे
विनिमयाचा बाजार सगळा
दौलतीच्या छनछनाला
कायदाही फितूर झाला..

आयाळ झडली दातही पडले
नखांचीही गेली धार..
डरकाळी तर दूरच राहिली
घशात उरली थोडी गुरगुर

झाकोळला अंधारही इथे
म्हणे पुण्यभूमी पवित्र ही
अजून वाटते कुणाकुणाला
देव अवतार घेईलही...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Wednesday 23 March 2022

सखे ऐक ना

सखे ऐक ना...☺️

तुझ्या देहाच्या वैभवाने
दीपुन जावे अस काही नाही
मोहाचा झाकोळ नजरेत माझ्या
असेलच असे नाही ना सखे

सृजनाचे आकर्षण तसे
तुझ्यात आणि माझ्यातही
पण सारखे तेच घेऊन नाचावे
असेही काही नाही ना सखे

तुझ्या देहाच्या वळणवाटांवरून
घरंगळत जाते नजर जरूर
पण कुठे क्षणभर रेंगाळावे
असेही काही नाही ना सखे...

तू सजणार, धजणार 
निसर्गदत्त हक्कच आहे तुझा
पण हरक्षणी मी बेभानच व्हावे
असेही काही नाही ना सखे...

तुला पाहिले की मोह दस्तक देतो
 देहाच्या प्रत्येक पेशींवर जरूर
पण नर जागा व्हावा प्रत्येकक्षणी
असेही काही नाही ना सखे...

सगळे इन-बिल्ट देहमोह
घेऊन जगतो प्रत्येक पुरुष
तरी प्रत्येक पुरुष हैवान असेलच
असेही काही नाही ना सखे...

-प्रशांत श. शेलटकर
 8600583846

Sunday 20 March 2022

ओंडक्यांची पालवी

प्रौढ वयातल्या प्रेमकहाण्या दाखवायचा सोनी आणि झी चा ट्रेंड दिसतोय.."अजूनही बरसात" नंतर , आता सोनी वर "तू तेव्हा तशी " येतेय..समाजात जे घडत ते माध्यमात दिसत ? की माध्यमात दिसत ते समाजात घडतं हा कोंबडी आधी की अंडा आधी या प्रश्नासारखाच अनुत्तरित.. पण जाऊदे ..या सीरियल बघून घरोघरीच्या ओंडक्यांना प्रेमाची पालवी फुटण्याची शक्यता आहे.. कधी कुठे जुनी "ओळख " भेटलीच तर "अजूनही बरसात आहे" म्हणून लगेच "माझी तुझी रेशीमगाठ " बांधायला जाऊ नका ..नाहीतर घरची म्हणायची " येऊ तशी कशी मी नांदायला"
    बाय द वे...मालिका बघताना जीव एकाच वेळी हुळहुळतो आणि हळहळतोही..हे वय म्हणजे नरसिंहाच्या मांडीवरचा हिरण्यकश्यपू..धड दिवस नाही धड रात्र नाही,धड आकाशात नाही की धड जमिनीवर नाही..तसच धड तरुण नाही धड म्हातारे नाही..दिवा विझताना मोठा होतो म्हणतात ..हे सीरियल वाले तेल घालू घालू वात मोठी करून घरोघरी विझू घातलेले दिवे (की दिवटे??) "पेटवतायत ." अरे कुठे फेडाल ही पापं...? अशी कुटुंबाच्या कुटुंब "वयात" आली तर  " जेवलीस का? हा राष्ट्रीय प्रश्न घोषित करायला हरकत नाही...
       च्या मायला हे सीरियल वाले म्हातारे होऊच देत नाहीत...
        --© शेलटकरांचा प्रशांत
                86 00 58 38 46

Friday 18 March 2022

अतिशुद्ध ...

कार्यालयीन कार्यासाठी, कार्या लयात जाणे..इत्यादी इत्यादी..


सकाळी जाग येते
चलसंज्ञापनयंत्र (मोबाईल) उशाशी पडलेले असते. अर्धवट झोपेत ते मी चालू करतो शुभप्रभात चे अनेक संदेश (मेसेज)आलेले असतात..काही चलचित्रे (विडिओ)पण असतात..त्यातलीच काही परस्पराना  अग्रेषीत (फॉरवर्ड ) करतो.घातक पण वेधक चलचित्रे प्रकाश वेगाने रद्द करतो...आणि उठतो
    दंतधावन(ब्रश केला) करतो शौच (टॉयलेट ला जाऊन करण्याची क्रिया)इत्यादी आवरतो. तिथून मी  मुदपाक खान्यात (किचन) सुधाकराच्या थाटात येऊन बसतो. माझी सिंधू एक कषायपात्र(चहाचा कप) दाणदिशी समोर आदळते .कषायपात्रात पेयाच्या लाटा उसळतात..काही भित्रे ससे त्याला "चहाच्या कपतील वादळ "वगैरे म्हणतात ..खाऊच्या बरणीतून एक शुष्कखाद्यचकती (बिस्किट) काढतो आणि कषायपात्रात बुडवतो. मी फार  दक्ष असतो अशावेळी.. थोडा जरी वेळ गेला तरी..शुष्कखाद्यचकती खाली पात्रात पडून नाहीशी होते.. आणि  तोंडाजवळ नुसती बोटे येतात.. बरं पात्राच्या तळाशी गेलेली शुष्कखाद्यचकती म्हणजे वय झालेली वहिदा रहिमान...म्हणून मी शुष्कखाद्यचकतीचा आस्वाद जपूनच घेतो..
      प्रभातीची खाद्यपूजा उरकून मी स्नानगृहात येतो. आल्या आल्या थेट जन्माला येतानाच्या अगदी आदिम अवस्थेत जातो. हे आदिम अवस्थेत जाणे दिवसातून एकदा स्नानगृहात आणि ग्रीष्मऋतूतल्या एखाद्या "विजगेल्या" असहनीय रात्री किंवा हेमंत ऋतूच्या एखाद्या अतिशीत रात्री जेव्हा ती 
"शयनेषु रंभा वगैरे होते तेव्हा  बरं का...
         विविध प्रकारच्या सुगंधी वड्या माझे स्नान सुसंपन्न करतात.
     माझ्या स्नानोत्तर कार्यक्रमात, रिकाम्या डोक्यावर कंगवा फिरवणे हा एक महत्त्वाचा दैनिक कार्यक्रम आहे. एसटी नाही का पुरेसा प्रवासी भारमान नसताना गावात रिकामी जाते आणि रिकामी परत येते तसा माझा कंगवा उजवीकडून डावीकडे,डावीकडून उजवीकडे ,टक्कलमध्यबिंदूकडून मागच्या बाजूला असा उनाड पोरासारखा भटकतो आणि गप्प  निवांत पडून राहतो..तैलमर्दन हा कार्यक्रम माझ्यासाठी हास्यास्पद झाला आहे. तेलाचे चार थेंब एकमेकांना टाळ्या देत स्काय डायव्हिंग करत कपाळ, गाल अशा उतरत्या भाजणीने चेहऱ्यावर उतरतात  एखादा चुकार थेंब जर डर का मारे टकलावर रेंगाळत राहिला तर बाकीचे त्याला डर के आगे जित है म्हणत..टकमक टकलावरून खाली ढकलून देतात तेव्हा चेहरा "तेलाळ" होतो. कधी काळी माथा केसाळ होता आता तिबेटचे पठार झालंय.. असो...हे असो आता पुढच्या आयुष्यात वारंवार म्हणावं लागणार ...असो 
     पुरेसा (😊) वस्त्रांकीत होऊन मी पादत्राणे ( उगाचच संधी विग्रह ,शब्दाची उत्पत्ती वगैरे करू नका) पायात सरकवतो आणि मी बाहेर येतो..बाहेर माझी स्वप्नं सुंदरी (बाईक-ड्रीम युगा अस नाव आहे तिचे बरं का...)मान तिरपी करून झोपलेली ...प्रारंभकळ (स्टार्टर) दाबून मी स्वप्नसुंदरीला जागे करायचा नेहमीच प्रयत्न करतो.पण माझ्या दुचाकीच्या विद्युतघटातील ऊर्जेचा विलय झाल्याने..दुचाकी फक्त घोड्यासारखी खिंकाळते आणि शांत होते.क्षणभर मला बाजीराव झाल्यासारखे वाटते.. माझं घर मला शनिवार वाड्यासारख दिसायला लागते..माझी काशीबाई ओट्यावर भांडी विसळत असते आणि दूर तिकडे मस्तानी.....असो...
      ..प्रारंभ कळ व्यर्थ झाल्यावर पदपट्टीकेवर (किक)लाथ मारतो तशी दुचाकी चालू होते गतिप्रेरकाला   (एक्सिलेटर) पिळ दिला की दुचाकी वेग घेते...
     मी कार्यालयात कार्यालयीन वेळात कार्यालयीन  कामासाठी उपस्थित होतो....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday 7 March 2022

सांजरंग..

सांजरंग...

मी आहे असाच ..
एक विस्कटलेला चित्रकार
इथे तिथे पसरलेला
तूच मला ठेवतेस आवरून
कधी रागाने कधी प्रेमाने..

कधी अवचित धक्का लागून 
रंग सांडले जर कॅनव्हास वर...
तर त्या विखुरलेल्या रंगातही
तूला चित्र दिसतं...होय ना!
म्हणतेस रंगसंगती छान जमलीय
अन गंमत म्हणजे ..
न दिसणारे रंगही तुला दिसतात

अग माझ्या रंगपेटीत
फार रंग नव्हतेच कधी
ते ही आता संपत आलेत
पण तुला ना त्याची खंत
म्हणे एखादी अजून एक शेड
जमून जाईल बघ
त्या उरलेल्या रंगात...

डोळ्यात दाटून आलेले
रंगहीन पाणी ....
रंगेबेरंगी होत तेव्हा...
अर्धा अधिक कोरा कॅनव्हास
रंगांची मिजास करू लागतो
रंगपेटीतल्या मोजक्या रंगाना
लाभते तेव्हा इंद्रधनुचे भाग्य..

आयुष्यातले सांजरंग...
झरझर उतरत जातात कॅनव्हासवर...
मला आता उसंत नसते
रंग किती सरले किती उरले
याची तमा नसते..

शेवटचे चित्र तुझेच आहे ना
सफेद केस...
गालावरच्या सुरकुत्या.. 
अगदी जशाच्या तशा
आता तू अगदी डिट्टो 
वहिदा दिसत्येस ग..
ती ग आपली  वहिदा रहिमान
म्हातारी झाली तरी 
किती क्युट दिसते ना..
बघ ना सेम टू सेम वहिदा...

अरे? हे काय?
अग रडू नकोस ना
रंग ओघळतील ना..
आता सगळे रंग संपलेत ग..
माझं आता आवरलंय..
रंगच उरले नाही बघ..

स्वर्गात तुला भेटायला येताना
हे असे रडके चित्र घेऊन येऊ का?...

रडू नकोस ग ...
अग ए ऐकतेस ना?????
आलोच मी...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Sunday 6 March 2022

# महिला दिन विशेष

# महिला दिन विशेष

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
       
       काही जण असेही म्हणतात की वर्षातून एकच दिवस महिला दिन साजरा करून काय होणार? त्यांना एकच सांगावे.. असे साजरे केलेले दिन वर्षभर ऊर्जेचा बूस्टर देतात. आपण नाही का रोजच वाढत असतो तरीही वाढदिवस साजरा करतोच ना..
     खरं तर महिला दिन ही फक्त साजरा करण्याची गोष्ट नाहीये. तो एक सिंहावलोकन करण्याचा दिवस आहे...सिंह जसा काही पावले पुढे गेल्यावर मागे वळून बघतो तस प्रत्येक स्त्रीने गत आयुष्याकडे वळुन पाहण्याचा हा दिवस. आजपर्यंत आयुष्यात काय साध्य केले? स्वतःला स्पेस किती दिली? आपल्याच एखाद्या गरजू सखीला काय मदत केली ? याचा आढावा घेण्याचा दिवस..
    गार्गी,मैत्रेयी ते जिजाऊ, लक्ष्मी बाई ते सावित्री ,आनंदी बाई जोशी, ते अगदी सिंधुताई, आणि सुधा मूर्ती पर्यन्तचा हा प्रवास तसा काटेरीच..आणि पुढचा प्रवासही  काटेरीच असणार आहे नवीन प्रश्न ,नवीन आव्हाने  यांचा मुकाबला करण्यासाठी नवीन जिजाऊ, सिंधुताई,सावित्रीबाई निर्माण व्हाव्या लागतील..आणि हो घरोघरींच्या सावित्रीना साथ द्यायला घरोघरी ज्योतिबा पण निर्माण झाले पाहिजेत. 
      स्त्री ही नैसर्गिकच पुरुषांपेक्षा बौद्धिकदृष्टीने सरस असते.पण हे  बौध्दिक सामर्थ्य कोणत्या गोष्टींसाठी वापरले जाते हे पण महत्वाचे. ते विधायक गोष्टींसाठी वापरले गेले तर उत्तुंग कार्य होत आणि चुकीच्या कामासाठी वापरलं तर सर्वनाश..
    महिला दिन साजरा करताना दैवतीकरण अजिबात नको..तिला देव्हाऱ्यात ठेऊन तिची पूजा नको..माणूस म्हणून ती गुणदोषासकट स्वीकारली पाहिजे.
      जसे आपण आईला स्वीकारतो अर्थात स्वीकार अस्वीकाराचा प्रश्नच नसतो तसेच पत्नी ,बहीण याना स्वीकारलं पाहिजे. लग्नाळू पुरुषांच्या लग्नाच्या जाहिरातीवर नजर टाका.. सुंदर,गृहकर्तव्यदक्ष,नोकरी करणारी वधू पाहिजे...अरे लग्नाळू मुलगी म्हणजे बिझनेस पॅकेज वाटले का? बरं आपण सुंदर, गृहकर्तव्यदक्ष वगैरे असतो का? 
    त्यापेक्षा बायको जशी आहे तशी स्वीकारावी ,तिची आणि आईची, तिची आणि बहिणीशी तुलना करू नये.. आई , बहीण हे मटेरिअल वेगळे आणि बायको हे मटेरियल वेगळे.
     अजूनही ग्रामीण भागात बायका आपल्या नवऱ्याना मालक म्हणतात. अरे मालक म्हणायला तुम्ही त्यांचे सेवक आहात का? नवरा -बायको म्हणजे संसार रथाची दोन चाके आहेत ना मग यात मालक कुठून आले?
     साधं माहेरी जायला पण परवानगी मागतात काही स्त्रिया.. परवानगी मागण्याऐवजी "मला माहेरी जायचं आहे , या या कारणासाठी तेव्हा मी या तारखेला जाणार आहे.तुझं काय मत आहे.आपण चर्चा करू " अस ठामपणे सांगितलं पाहिजे.. उगाच  परवानगी मागणे म्हणजे संस्कृती वगैरे जपणे असे वाटत असेल तर अशा संस्कृतीचे विसर्जन केले पाहिजे..
    महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री ही स्त्रीचीच शत्रू आहे का? याचे पण मंथन केले पाहिजे. हुंडाबळी मध्ये सासू आणि नणंद यांचा सहभाग मोठाच राहिला आहे. गरीब -श्रीमंत हा देखील कळीचा प्रश्न, घरातल्या मोलकरणीला  आपण कसे वागवतो?  
     आपली एखादी श्रीमंत सखी असेल तर आपण तिच्याशी कसे वागतो?तेच एखादी गरीब सखी असेल तर आपल्या कपाळावर आठ्या पडतात का? किंवा तिला प्रचंड सहानुभूती दाखवून तिला आपण लाज आणतो का? प्रवासात वृद्ध स्त्री, गरोदर बाई हिला आपण चटकन उठून जागा देतो का?शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांबद्दल तिरस्कार नको कित्येक पुरुषी जनावर त्या झेलतात म्हणून इतर स्त्रिया सुरक्षित असतात..अर्थात हे वेश्या व्यवसायाचे समर्थन मुळीच नाही.नरकच आहे तो. अत्यन्त लाजिरवाणी गोष्ट आहे ती..पण आपला त्या अभागी स्त्रियांबद्दल काय दृष्टकोन आहे  हे प्रश्न स्त्रीने स्वतःला विचारून पाहावेत...
    लास्ट बट नॉट लीस्ट...
जेन्ट्स लोकांनो, आजची स्त्री आधुनिक आहे..स्वाभिमानी आहे, तिला तिचे आत्मभान आले आहे. तिच्या पेहेरावावरून तिला जज करू नका. घरातून बाहेर पडल्यावर सगळ्या स्त्रिया "उपलब्ध" असाव्यात असा हलकट दृष्टिकोन नको, अनाठायी मदत पण नको. तिला अबला वगैरे समजू नका..शारीरिक दृष्ट्या ती तुमच्यापेक्षा सक्षम आहे. ती नाजूका नाही. दिवसभर शेतात काम,नोकरी वगैरे करून ती घरी आल्यावर सुद्धा कामात झोकून देते ...अर्थात हे पुरुष म्हणून आपल्याला लाजिरवाणे आहे. शंभर ठिकाणी हाड मोडावीत अशा वेदना व्हाव्यात अस बाळंतपण असतं.. तुम्हाला काय जातय सांगायला वंशाला दिवा हवा म्हणायला ...आणि हो रात्रीचे नाजूक क्षण जपा..सुख ओरबाडून मिळत नसत...काही वेळा खरंच तिचं डोकं दुखत असत...अशावेळी निमूटपणे डोक्याला बाम वगैरे लावा तिच्या ...कोरडे लव्ह यु नको...कृतीतून ते दिसलं पाहिजे...
    सुंदरतेचे दुसरं नाव स्त्री आहे..स्त्री मग ती गोरी असो,सावळी असो, काळी असो,भारतीय असो ,अमेरिकन असो,आफ्रिकन असो,की जपानी चायनीज असो अगदी टुंड्रा प्रदेशातील असो ती सौन्दर्याची उपासक असतेच असते. ती स्वतः ही सजते आणि भवतालही सजवते..
     बायको माहेरी गेली की घराची काय अवस्था होते हे पुरुषांनी एकदा पहावेच
    
      जागतिक महिला दिनाच्या मंगलमय शुभेच्छा 💐💐💐

-प्रशान्त शेलटकर
 8600583846

अजून एक चुंबन नोंद..💋

अजून एक चुंबन नोंद..💋


तुझा चेहरा ओंजळीत घ्यावा 
अन तुझ्या गालावरची बट
 तुझ्या कानामागे खोचावी 
अन तुझ्या डोळ्यात .....
रोखून पाहत म्हणावं... 
तू खूप सुंदर आहेस...💋

बस्स तुझ्या श्वासाची लय 
अलगद पकडावी माझ्या श्वासाने अन....  
एक निसटते चुंबन घ्यावे 
तुझ्या थरथरणाऱ्या अधरांचे..💋

त्याच क्षणी तू मिटशीलच
तुझे जुलमी डोळे...
अन मिटल्या डोळ्यांनी
बघत रहाशील मला...
अनुभवशील मुलायम स्पर्श 💋

निसटते ओठ मग
 धीट होतील भलतेच..
तुझेही अन माझेही
अलगद ओला अमृतस्पर्श
ओठांनी ओठावर लिहून 
जाईल एक प्रेमाची गझल 💋

हवाहवासा हळुवार डंख
कालगती स्तब्ध व्हावी
अस काहीतरी वेगळंच
तुझ्या माझ्या ओठांचे
ते अद्भुत अगम्य अद्वैत 💋

एक धन्य तृप्ती...
गात्रा-गात्रात पसरेल
त्या अनामिक तृप्तीने 
तुझे डोळे ओले होतील
पुन्हा एकदा तू रोखून 
पहाशील माझ्याकडे
लटक्या रागाने..उगाचच
अन आपल्या प्रेमाच्या
दैनंदिनीत होऊन जाईल
एक अजून चुंबननोंद 💋
..
एक अजून चुबंननोंद...💋


💋💋💋💋💋💋💋

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...