बोधिसत्व कथा/#४
एकदा बोधिसत्व आणि त्याचा मित्र एका गावाकडे जात असताना मध्ये एक नदी लागते ,नदीचा प्रवाह खूप वेगाने वहात असतो .त्या काठावर एक तरुणी नदी पार कशी करू या काळजीत असते, पण बोधिसत्व आणि त्याच्या मित्राला पाहून तिला हायसे वाटते . ती बोधिसत्वयाच्या मित्राला विचारते की मला पलीकडे नेऊन सोडाल का? मित्र संकोचतो..त्याची द्विधा होते..इतक्यात बोधिसत्व त्या तरुणीला खांद्यावर बसवतो आणि नदी पार करतो .नदीच्या दुसऱ्या काठावर तीला सोडून ,बोधिसत्व आणि त्याचा मित्र पुढे मार्गक्रमण करायला लागतात
खूपसे अंतर चालल्यावर बोधिसत्वाचा मित्र त्याला विचारतो की आपल्या शिकवणुकीत स्त्रीसंपर्क करू नये अस म्हटलंय आणि तू तिला थेट उचलून नदी पार केलीस हे कसे?
बोधिसत्व किंचित स्मित करून म्हणतो ,अरे मित्रा मी तिला नदीच्या काठावरच सोडून आलो आणि तू मात्र अजून तिला घेऊन चालतोयस...
**********************
💡- उपनिषदामध्ये एक सुंदर शब्द आहे इदं न मम..हे माझे नाही.. आयुष्य जगताना वस्तू आणि व्यक्तींशी संपर्क येणे अपरिहार्य आहे.कर्म करताना त्यात लिप्त होणे स्वाभाविक आहे. जसे मातीचे मडके करताना हाटाला माती लागणे अपरिहार्य असते. पण मडके तयार झाल्यावर हात स्वच्छ करणे ..त्यात गुंतून न रहाणे यालाच म्हणतात इदं न मम..वरच्या कथेत बोधिसत्वाने त्या तरुणीला मदत करणे हे कर्तव्य समजले आणि ते पूर्ण केले.मदत करताना ती कोण आहे? ती तरुण आहे, ती सुंदर आहे या भावनांचा लवलेशही त्याच्या मनात नव्हता त्यामुळे कर्तव्य पूर्ण झाल्यावर तिच्या बद्दल विचारांचा लवलेशही त्याच्या मनात नव्हता, शिष्य मात्र ती तरुणी, तिचे सौन्दर्य यातच अडकून बसला होता. तिला न उचलताही तिचे ओझे मनात ठेवून चालत होता.
पाप-पुण्याचे हिशेब जुळवत आयुष्य जगायचे नसते.आला क्षण जगून झाला की तो भूतकाळ होतो त्यात रमून काही उपयोग नसतो. कर्तव्य पार पडलं की मनाची पाटी परत कोरी करायची तिथेच रेंगाळत बसू नये हेच या कथेचे सार...
अत्त दीप भव..
☺️- प्रशांत
No comments:
Post a Comment