परवा जाता जाता
रस्त्यात भेटला एक मित्र
वरती बोट करून म्हणाला
तिथूनच हलतात सूत्र...
बायका ,पोरे ,मित्र वगैरे
सगळी आहे माया
असेल तुझ्याजवळ काही
तरच म्हणतील या या..
हलका श्वास टाकला त्याने
दूर कुठे तरी हरवली नजर
ऐकू येतो म्हणाला आता
वैकुंठातून गजर..
हरलेल्या मित्राच्या पाठीवर
मारला एक हलका गुद्दा
म्हणालो पटला नाही रे
तुझा माया मोहाचा मुद्दा..
हे सगळ सुचतंय तुला
तू झालास म्हातारा
सगळ भोगून झाल्यावर
उगवतोय विरक्तीचा तारा
सगळ जग असत जागेवर
तशीच असते माया ममता
फरक इतकाच रे मित्रा
संपल्या तुझ्या क्षमता..
करून करून भागल्यावर
माणसाला देव आठवतो.
दुष्कर्माची भीती मनावर
म्हणून पुण्य साठवतो..
सगळी माया मोह म्हणतोस
मग देवाचा तरी मोह का?
आयुष्यभर पाठ फिरवलीस
मग आता सामोरा का?
बेदखल झाल्यावर सगळीकडे
दखल घेतोस देवाची..
माया मोह म्हणतोस ज्यांचा
माणसे तीच रे कामाची
जमेल तसे कर साजरे
आयुष्य आता उरलेले..
माया मोह म्हणू नकोस रे
क्षण हातातून गेलेले..
मिटून ठेवली मग मित्राने
अध्यात्माची पोथी..
पुन्हा नव्याने बांधीन म्हणतो
विरून गेलेली नाती..
तो तसा निघून गेल्यावर
मी पाहिले हळूच वरती
देव म्हणाला एका पुण्य
जमा तुझ्या खाती..
खालूूनच म्हणालो देवा
थँक्यु व्हेरि मच...
देव म्हणाला जा पुढे
पुरे झाली मचमच...
@ प्रशांत 😊