बोधिसत्व कथा /#७
बोधिसत्व वारल्या नंतर त्यांचा आंधळा शेजारी मित्राला म्हणाला मी कोणाला पाहू शकत नाही पण बोलणाऱ्याला आवाजावरून जोखतो..अभिनंदन करणाऱ्या माणसाच्या आवाजातील सूक्ष्म स्वार्थ आणि मत्सर मला जाणवतो , दुःखी माणसाबद्दल सहानुभूती दाखवायला बोललेल्या शब्दांमागचा आनंद मला जाणवतो...
पण बोधिसत्व जे बोलायचा त्यात फक्त आणि फक्त आनंदाचा आवाज असायचा...
********************
💡- आपल्या मनातील भावना दाखवणारा आरसा असता तर आपली आपल्यालाच लाज वाटली असती. आपण आहोत कसे? बोलतो कसे आणि वास्तवात आपण कसे आहोत..?
आपण व्यक्त केलेल्या आनंद,दुःख या भावना खऱ्याच असतात की आपण केलेला तो अभिनय असतो? एखाद्याच्या आनंदाचा आपल्याला खरंच आनंद होतो की त्यामागे स्वार्थ आणि मत्सर असतो . प्रमोशन मिळालेल्या साहेबांचे अभिनंदन करताना आपण त्यांच्या " नजरेत' असावे हा हेतू तर नसतो..? किंवा बघा याला वशील्याने प्रमोशन मिळालय..हा भाव नसतो ना?
लग्नाच्या प्रसंगी आहेर देताना आणि वधू वराचे अभिनंदन करताना त्यात खरंच उस्फुर्तता असते की , त्यात हिशोबी व्यवहार्यता असते? आपल्या कडच्या लग्नात कोणी किती रक्कमेची पाकिटे घातली याची काही जण लिस्ट तयार करतात त्या रेंज मध्ये त्याची परतफेड केली जाते.. आनंदाच्या अभिनया आड बेमालूमपणे लपवलेला चोख हिशेबीपणा..
एखाद्याचे वाईट झाले तर खरच वाईट वाटते का? की बर झालं लय उडत होता/उडत होती या भावना मनात असतात ?
माणूस आतून दुभंगलेले आहे. जसा आहे तसा व्यक्त होण्याऐवजी जसा पाहिजे तसा व्यक्त होतोय..
आजकाल सोशल मीडियावर इमोजी नावाचे मुखवटे मिळतातच ना..ते वापरले की कोणी गेलं की RIP या तीन अक्षरात मोकळं होता येते दुसऱ्याच क्षणी HBD या तीन अक्षरात शुभेच्छा देता येतात. भावना असण्यापेक्षा त्याचे प्रेझेंटेशन कसे आहे यालाच महत्व आले आहे.
माझी प्रतिमा आणि वास्तवातील मी यात जितके अंतर पडत जाईल तसा माणूस स्वतःलाच अनोळखी होत जाईल. वर्षानुवर्षे अभिनय केलेल्या माणसाला कधीतरी स्वतःची ओळख शोधावीच लागेल..नाहीतर माणसं स्किझो होतील...
अत्त दीप भव...
☺️ - प्रशांत
No comments:
Post a Comment