Ad

Wednesday 29 December 2021

रात्र

रात्र..

मिट्ट काळोख सभोवती
घट्ट डोळे मिटलेले....
दिसतो माझा मी कुठे
अस्तित्व जणू  संपलेले

श्वासातच फक्त उरल्या
साऱ्या देह जाणिवा
फिटले सारे सुखदुःख
ना कशाचीच वानवा

एक अनाहत वीण
श्वासातच झंकारते
मिटल्या डोळ्यासमोर
रुप त्याचे साकारते

कोण मी अन कोण माझे
प्रश्नच सर्व संपून गेले
पाश देहात्म बुद्धीचे
अलगद कधी गळून गेले

नाम रूप असे माझे
काळोखात विरून गेले
तरी मी पण हे वृथा
का अजून सूक्ष्मात उरले

निद्रा हे क्षणिक मरण
किती सुखावे या जीवा
तरी मृत्यूचे भय दारुण
का विकल करते जिवा

घनघोर काळोखात मी
असा विरून गेलो..
जणू एका रात्रीसाठी
मी ठरवून मरून गेलो..

 -प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday 27 December 2021

जिंदादिल जिंदगी

जिंदादील जिंदगी...

कपाळावर एक आठी
असायलाच हवी...
हसत सतत राहिलो तर
 किंमत म्हणे होते कमी

हसतो जो नेहमीच
म्हणे प्रॉब्लेमच त्याला नाही
आयुष्य कसे जगावे
म्हणे याला कळतच नाही

हसतो हा नेहमीच
म्हणजे हा खुशालचेंडू आहे
ताटात याच्या नेहमी
म्हणे बुंदीचाच लाडू आहे

म्हणे आयुष्य गंभीर घ्या
तरच तुम्ही मॅच्युअर्ड
खतरुड चेहरा म्हणजेच
जणू यशाचा पासवर्ड

लग्नातही यांच्या ते
असे काही हसतात
शुभेच्छा घेतानाही ते
मोनालीसा दिसतात

रडका चेहरा करून का
आयुष्य बदलणार आहे ?
कितीही आपटली तरी
सगळच का मिळणार आहे ?

कित्येक राजे आले गेले
हिशेब त्यांचा नाही
कालचक्राच्या गतीचा
अंदाज कुणाला नाही

आज मेल्यावर जग उद्या
सगळं काही विसरणार
भिंतीवरच्या फ्रेम मध्ये
तूम्ही अडकून पडणार..

जगाचे सोडून द्या हो
घरच्यांचे काय..?
आठवण तुमची काढून
त्यांचे पोट भरणार काय?

म्हणून जस आहे तस
आयुष्य जगुन घ्यावं
झाडावरच फुल अगदी
डोळे भरून पाहून घ्यावं

सकाळचा सूर्य कधी
डोळ्यात साठवून घ्यावा
ऐन वैशाखात कधी
श्रावण आठवून घ्यावा

शरीर जगवायला मित्रा
एक निरंतर श्वास लागतो
तसच आयुष्य जगायला
आनंदाचा ध्यास लागतो

पैसा अडका सोन नाणं
माया तर मुळीच नाही
पण सिद्ध करायला स्व ला
तेवढंच काही पुरेसे नाही..

जन्म ते मृत्यू  मित्रा ,
हा एक प्रवास आहे
 जिंदगी जगावी जिंदादिल
असाच तो एक ध्यास आहे

-प्रशांत शेलटकर
8600583846

Friday 24 December 2021

बुद्धिप्रामाण्यवाद

बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय भाऊ? कोणाच्या बुद्धीला प्रमाण मानायचे? स्वतःच्या की इतरांच्या? इतरांच्या असेल तर त्यांच्या बुद्धीवर श्रद्धा ठेवायची का? आणि स्वतःच्या असेल तर माझा बुद्धिप्रामाण्यवाद इतरांपेक्षा वेगळा असणार हे नक्कीच,मग निष्कर्ष कसे काढायचे? अगदी बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणाऱ्या लेखकांनी लिहिलेले ग्रंथ प्रमाण मानणे म्हणजे ग्रंथप्रामाण्य म्हणावे का? अगदी फक्त विज्ञानाने मान्य केलेलेच आपण मान्य करावे अस म्हटलं तरी दर दिवसाला,महिन्याला ,वर्षाला, दशकाला आणि शतकाला विज्ञान बदलत असते..मग कालचा, गेल्या महिन्यातल्या, गेल्या वर्षातला ,गेल्या दशकातला आणि गेल्या शतकातला बुद्धिप्रामाण्यवादी खोटा होता असे म्हणावे का? म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद ही बदलणारी गोष्ट आहे . ती निरंतर अनुभवाची गोष्ट आहे. तो विदवत्तेचा, अहंकाराचा विषय नाही. जो खरा बुद्धिवादी असतो तो आपल्या बुद्धीच्या मर्यादा ओळखतो आणि नम्र असतो..महत्वाचे म्हणजे तो स्वतंत्र बुद्धीचा असतो. तो पुस्तकी नसतो. अमुक तमुक पुस्तकात असे म्हटले आहे . प्रस्तुत लेखक बुद्धिवादी आहे म्हणून त्याने लिहिलेलं बुद्धिवादीच लेखन असणार या "अंधश्रद्धा" खऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी माणसाकडे नसतात. कोणत्याही विचारधारेचे "पाईक" असणे हेच तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी नसल्याचे प्रतीक आहे. आज असे परपोशी,परप्रकाशीत खूप आहेत. 
           बुद्धीप्रामाण्यवाद हा व्यक्तिसापेक्ष असतो,किंबहुना तो असायलाच हवा.स्वतःच्या मेंदूचा सुयोग्य वापर हे बेसिक असते बुद्धिप्रामाण्य असण्याचे. माझ्या प्रमाणेच इतरांनी विचार केला पाहिजे असे मानणे म्हणजे बुद्धिवाद नव्हेच..आपले मत दुसऱ्याला पटलेच पाहिजे अस कुठे असते? समाजातील अनिष्ट ( इथे काहीवेळा आपल्याला ते अनिष्ट वाटत असले तरी ते इष्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही)  कर्मकांडाना विरोध करता करता आपणच " कर्मकांडी" होत नाही ना याची दक्षता घेतली पाहिजे. 
          एक बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून मला अस वाटलं. माझ्या मतांशी सहमत झालेच पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही. शक्य असेल तेव्हा मी माझेच प्रबोधन करत असतो. इतरांचे प्रबोधन करण्याइतपत माझी योग्यता नाही..

- प्रशांत शशिकांत शेलटकर
  रत्नागिरी
 8600583846

Thursday 23 December 2021

ब्रह्मार्पणमस्तु....

ब्रह्मार्पणमस्तु....

मिटत्या पाकळ्यात
गंध काही उरलेले
डोळ्यात जसे काही
चुकार थेंब उरलेले
तसे आयुष्य हे
काही क्षणांचेच उरलेले

आता ना हे मन
कशातच गुंतलेले
क्षण शेवटचे
श्वासात माळलेले
तसे आयुष्य हे
काही क्षणांचेच उरलेले

आता मनात ना काही
प्रश्नच उरलेले..
उत्तराचे मोह असेच
विरून गेलेले
तसेही आयुष्य हे
काही क्षणांचेच उरलेले

कुणा ठावूकेय
पुढे काय ठरलेले
परी ठावूकेय
मागे काही न उरलेले
तसे आयुष्य हे
काही क्षणांचेच उरलेले

सूर्य अस्तास जरी
उन हे रेंगाळलेले
जसे दिव्यातले ,
थेंब काही उरलेले
तसे आयुष्य हे
काही क्षणांचेच उरलेले

अर्ध्य जीवनगंगेचे
तिलाच अर्पण केले
तरी थेंब काही
ओंजळीत हे उरले
तसे आयुष्य हे
काही क्षणांचेच उरलेले

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

- प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Friday 17 December 2021

सदिच्छा

कोणाच्या सुखाआड  
येऊ नये कधी...
होईल मनासारखे आपल्या
असे नेहमीच नाही

सर्वांचेच भले नेहमी
चिंतीत जावे
दान नेहमी मनासारखे
पडेलच असे नाही

ओघळून फुले 
ओंजळीतून निघाली
परी सुगंध पेरलेला
ओंजळ सोडतच नाही

जरी कोणी नाही
झाले कधी आपलेच
कोणाचे होण्याला 
कोणी अडवतच नाही

सुखाला तुझ्या
दृष्ट लागू नये कधी
एवढेच सांगेन देवाला
बाकी सांगणेच नाही

-प्रशांत शेलटकर
 8600583846

तुला विसराव म्हणते..

तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस

.. एखादं मोरपीस गाला वरून फिरावं..आणि तनमन हळव होऊन जावं तशा तुझ्या आठवणी हळव्या करतात आणि मग  मनाच्या अंगणात 
का बरं असा फुलून येतोस
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस...

 असा कसा रे तू ..न बोलता खूप बोलून जातोस..पारिजाताचा सडा पडावा ना अगदी तस्साच...तुझ्या मौनाचे अर्थ तरी कसे लावू ? त्यापेक्षा तू घडाघडा बोल...बोलून रिता हो..तुझं मौन मला अस्वस्थ करतं रे..अबोल राहून किती बोलतोस..
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस

त्यापेक्षा तू भेटलाच नसतास तर
मनाच्या तारा छेडल्याच नसत्या..
मैफिलीचा उगा पसारा मी मांडलाच नसता..मग ही भैरवी अशी अंगावर आलीच नसती..
तू असा दूर राहून , मनाच्या तारा छेडत बसतोस..
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस...

तुझ्याशिवाय निभावलंय माझं
बघ ना किती छान चाललंय..
हे भरलं घर...प्रेमळ नवरा
गोड मुलं, त्यांचा गोड पसारा..
कशाला हवा तुझा वेडा विचार
पण नाही ,तू कुठे माझं ऐकतोयस
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस

आता पुरे हं....
नको आठवू सारखा..
आता श्रावण संपलाय
अवेळी नको ना येऊस...
आलास तरी असा डोळ्यातून
वाहू नकोस..तू असा गालावर ओघळलास की थेट
 काळजात रुजतोस
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Monday 13 December 2021

पुन्हा फुलांचे कळे

फुलांचे कळे...

अशी हासते तू की
जसा प्राजक्त परिमळे
अशी लाजते तू की
की फुलती लक्ष कमळे

अशी चालते तू की
की जशी नागीण सळसळे
अशी बोलते तू की
जणू कंठी  कोकिळ किलबिले

असा केशसंभार तुझा की
जसे दाटले मेघ सावळे
असे नयन तुझे की
जसे तुडुंब भरले तळे

अशी नजर तुझी की
 हे हृदय पार हिंदकळे
जरी पाठमोरी झालीस तू
नजर परत परत वळे

अशी सुन्दरी तू भार्ये
किती  कौतुकाचे सोहळे
मी पाहतो तुला जेव्हा
 होती पुन्हा फुलांचे कळे

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Monday 6 December 2021

कायच्या काय☺️

कायच्या काय...☺️

तुझ्या माझ्या नात्याला नाव काय
तुझ्याविना आयुष्याला अर्थ काय
विसरता येतच नाही तुला कधीच
यालाच लोक प्रेम म्हणतात काय?

💓💓💓💓💓💓💓💓

बावनकशी सोन्याचा भाव काय
पारखी अस कधी विचारतो काय
चमकतो हिरा कसाही अन कुठेही
खजिन्यात काय  कचऱ्यात काय

💓💓💓💓💓💓💓💓

तू मला अवचित भेटतेस काय
भेटल्यावर लाजून बोलतेस काय
कितीही वेळ बोललो तरीही
बोल ना अजून म्हणतेस काय 

💓💓💓💓💓💓💓💓

बटा तुझ्या गालावर येतात काय
कानामागे त्याना खोचतेस काय
धडधड उरात खळबळ काळजात
रोखून डोळ्यात  बघतेस काय

💓💓💓💓💓💓💓💓

येते येते म्हणून थांबतेस काय
निघताना पाऊल अडते काय
निरोप देताना ग त्याच वळणावर
पुन्हा  मागे वळून पाहतेस काय.

💓💓💓💓💓💓💓💓

एकांतात मी तुला आठवतो काय
अवचित डोळे भरून येतात काय
आणि साखर झोपेत कधी कधी
ओठावर माझे नाव येते काय

💓💓💓💓💓💓💓💓

मनात तुझ्या नेमकं चाललंय काय
कानात  अलगद  सांगशील काय
लाजत असशील जर सांगायला
डोळे तुझे अलवार बोलतील काय

💓💓💓💓💓💓💓💓

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Saturday 4 December 2021

आभास-लेख

आभास....


इतिहासाविषयी आपण केवळ अंदाज करू शकतो. कारण आपण त्या काळात अस्तित्वातच नव्हतो.लॉजीकली विचार केला तर , काळाला ब्लॅक अँड व्हाइट या दोनच शेड नसतात.त्याला अनेक रंग असतात. त्यातले ठराविक रंग उचलून काहींनी लेखन केलेलं असू शकते. त्यांच्या लेखनातून एकच शेड दिसण्याची शक्यता असते. शिवाय व्यक्तिगत अनुभव सुद्धा खूप प्रभाव टाकतात .
     त्या काळातील ज्या काही तार्किक आणि वैज्ञानिक  कसोट्या वापरून लेखन केले असेल त्या कसोट्या आज असतीलही किंवा कदाचित कालबाह्य झालेल्या असतील. 
 म्हणून आपण ते ग्रंथ केवळ संदर्भ म्हणून वापरले पाहिजे. आजच्या काळाशी ते सुसंगत आहे का ते पाहिले पाहिजे. नाहीतर नवा ग्रंथप्रामाण्यवाद जन्म घेतो.अंधश्रद्धा या केवळ धार्मिकच असतात असे नाही.त्या पुस्तकीपण असू शकतात.कोणाच्या बुद्धिमत्तेचे दडपण असणे हे चुकीचेच असते.
      कोणत्याही सामाजिक चळवळीत सहभागी होणे हे नक्कीच स्पृहणीय. पण असे सामील होताना स्वतःचा मेंदू शाबूत ठेवणे अत्यन्त महत्वाचे ..चळवळ ही प्रवाही हवी, साच्यात अडकली की तिचेच एक कर्मकांड होते. आणि दुसरे असे होते की मग सामाजिक कामाचाच अहंकार होतो. काम करण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात .पण आपलाच मार्ग योग्य आहे असे समजणे अहंकाराचे लक्षण आहे. काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याची सोशल मिडियावरची भाषा पहिली की माणसाचा बौध्दिक अहंकार कोणत्या पातळीपर्यंत जातो ते लक्षात येते.
       आपल्याकडे विद्वान म्हणजे ज्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचली आहेत ते विद्वान अस समजण्याचा एक गैरसमज आहे. हे असे तथाकथित विद्वान ,अमुक ढमुक लेखक अमक्या ढमक्या पुस्तकात अस म्हणाले आहेत, असे संदर्भ देऊन आपल्या विद्वत्तेचे दाखले देत असतात. पण अमुक तमुक हे विद्वान आहेत  त्यांनी जरी ते मागच्या शतकात सांगितलं असले तरी ते विद्वान असल्यामुळे त्यांचे संदर्भ वर्तमानात  देणे म्हणजे मूर्खपणा नव्हे काय? 
त्यानी त्या काळात केलेले परिस्थितीचे आकलन त्या काळात बरोबर असेलही पण ते आजच्या परिस्थितीला जसेच्या तसे लागू करणे हा वैचारिक अंधपणा झाला.
       दुर्दैवाने आज आपल्याकडे अशा परपोशी बांडगुळा ची संख्या बेसुमार वाढली आहे. त्यामुळे मूळ ज्ञानवृक्ष झाकोळून गेलाय.. हे भीतीदायक आहे. अज्ञानी असणे एक वेळ ठीक आहे पण ज्ञानाचे भास होणे जास्त धोकादायक..ती एक नशाच असते..

          -प्रशांत  शशिकांत शेलटकर
            8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...