Ad

Thursday 29 November 2018

निवांत निवांत

आता मज रम्य भासे
हा मस्त एकांत एकांत
न कुणाशी देणेघेणे
झालो मी निवांत निवांत

न कसला हव्यास अन
न कसला उरला ध्यासही
आता न बोलणे कुणाशी
झालो मी निवांत निवांत

न लोभ कसला आता
न मोह उरे पार्थिवाचा
माझ्याशीच बोलतो मी
आता निवांत निवांत

स्तुतीचा न सोस आता
न निंदेची पर्वा कुणाला
आता मज वाटे खरेच
मी जिवंत जिवंत

-प्रशांत शेलटकर

दुनियादारी

दुनियादारी

समजून घेतोय दुनिया अन्
समजून घेतोय दुनियादारी...
काळोख डसलेल्या जिंदगीची
काळोखाशी दोस्ती न्यारी

समजून घेतोय व्यवस्थेच्या
निर्जीव झाडावर टांगलेल ...
बळीराजाचं कलेवर अन्
समजून घेतोय त्याच्या लक्षुमीचा
काळजाशीच गोठलेला अस्फुट हुंदका

अन् हेही समजून घेतोय...
त्याच्या कच्चाबच्चांच्या
खपाटीस गेलेल्या पोटातला जाळ
अन्  सरकारी चिटूरक्यावरची
बळीराजाच्या जिंदगीची ...
सरकारी किंमत.....

मी समजून घेतोय व्यवस्थेच्या
थडग्यात गाडलेली कित्येक
बळीराजाची अन कामगारांची
आोळख हरवलेली मढी
ज्यांचा डि एन ए थेट माझ्याशी जुळतोय

पण तरीही अजुन समजून घेतोय
काळोखाच्या चादरीवरची
नक्षत्रांची नक्षी...
कार्ल मार्क्सच्या थडग्यात
अजून जिवंत असेल का समाजवादाची
एखादी पेशी....

अजूनही समजून घेतोय
दुनिया अन् दुनियादारी

-प्रशांत शेलटकर

Wednesday 28 November 2018

केव्हाच सुटून गेलाय कारण

आज काल माझ्याचवरचा    
हक्क मी सोडून  दिलाय..
एक पाय ऐल तीरावर अन   
दुसरा पल्याड कधीच गेलाय

मी कुणाचा हाच एक प्रश्न
आजवर  छळत आलाय...
माझं कोण हा प्रश्न तर
केव्हाच सुटून गेलाय कारण
एक पाय ऐल तीरावर अन
दुसरा पल्याड कधीच गेलाय

मोहाची देखणी फुलपाखरं
आता कुठे बागडत नाय
फुलंच नाही बागेत आत्ता
ती तरी करणार काय , कारण
एक पाय ऐल तीरावर अन   
दुसरा पल्याड कधीच गेलाय

तास , दिवस,महिने अन वर्ष
हिशेबाच्या याच्या करावं काय
काळ थांबला पैलतटावर,
इशारा त्याचा कधीच आलाय
एक पाय ऐल तीरावर अन  
दुसरा पल्याड कधीच गेलाय

-प्रशांत शेलटकर
  8600583846

.

Saturday 24 November 2018

हल्ली माझं बरं चाललंय

हल्ली माझं बरं चाललंय
थांबत थांबत का होईना
गाड माझं नक्कीच चालतय

चारचाकी चा सोस नाही
आणि एसीची हौस नाही
रंग उडालेली जुनी बाईक
एका किकला चालू होतेय
थांबत थांबत का होईना
गाडा माझा नक्कीच चालतोय

एकुलती एक बायको
भांड भांड भांडते..
रात्री मात्र लाजत लाजत
अलगद कुशीत येते
अरे इथे दीपिका यायला
मी  कुठे रणवीर असतोय
थांबत थांबत का होईना
गाडा माझा नक्कीच चालतोय

कधी निराश झालो तर
इथे "गदिमा" मला सावरतात
कधी रुसून बसलो तर
"पुलं" किती हसवतात..
अरे इथे फक्त पैशांनी
कोण श्रीमंती मोजतोय
थांबत थांबत का होईना
गाडा माझा नक्कीच चालतोय
.
.
हल्ली माझं तसं बरं चाललय

-प्रशांत शेलटकर
  8600583846

Thursday 22 November 2018

एक नाजूक कविता

सहज जाता येता
तू दिसतेस जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा...

किंचित ओठात
तू हसतेस जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

पुढे गेल्यावर मागे
वळून पाहतेस जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

ओढणीशी चाळा करत
तू बोलतेस जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

एक समान धागा
जुळतो जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

माझ्यासाठी डोळे
भरतात जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

भरल्या डोळ्यात
होकार दिसतो जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

मग माझ्यासाठीच
तू सजतेस जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

अबोलीचा गजरा
माळतेस जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

अन पहाटे पहाटे
आठवतेस जेव्हा
एक नाजूक कविता
सुचते मला तेव्हा

साजणी

ही माझी शंभरावी कविता,
शतक झाल्यावर जसा फलंदाजाला आनन्द होतो तसा मलाही झालाय..
गेले दोन वर्षे मी व्यक्त होतोय..जसं जमेल तसं..
    मी फार चांगले लिहितो अस नाही...पण जे लिहितो ते मनाच्या तळापासून आलेलं असत हे नक्की..
    मला आपल्या ग्रुपमधून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय...माझ्या दोन कविता काही जणांनी स्वतःच्या नावावर प्रकाशित केल्या..सुरुवातीला थोडं वाईट वाटलं ,किंचित रागही आला पण एकाअर्थाने ती माझ्या कवितेला मिळालेली दाद होती अस मी समजतो..
     धन्यवाद 🙏🙏

        सजणी

डोळ्यात तुझ्यासाठी
लविल्या सांजवाती
कधी येशील परतुनी
सजणे माझ्यासाठी

क्षणक्षण सुना वाटे
जीव ना कशात गमे
कासावीस जीव होई
सजणे तुझ्याच साठी

मज तुझ्यासवेच्या
आठवती लाघववेळा
लागल्या जीवास कळा
सजणे तुझ्याच साठी

नाते तुझे नि माझे
कधीच ना कुणा कळले
मन वेडे गुंतत गेले
सजणे तुझ्याचसाठी

असशील जिथे तू
सजणे सुखी रहा तू
देवास मागतो मागणे
सजणे तुझ्याच साठी

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

Sunday 18 November 2018

मर्यादा

माझी प्रत्येक गोष्ट तुला
आवडावी अस काही नाही
आणि तुझी प्रत्येक गोष्ट
मला आवडावी असंही नाही

माझ्या आयुष्यात तुझी
बेरीज व्हावीच असंही नाही
आणि तुझ्यातून तू मला
वजा करशीलच अस नाही

माझ्यातला अहंकार ..
त्याला म्हणत असेन मी
कदाचित माझी अस्मिता
त्याचा कधी विलय होईल
अस कधी वाटत नाही..
आणि तू तुझ्या वर्तुळातून
बाहेर येशील अस वाटत नाही

कदाचित तुला वाटत असेल
एखाद्या उपग्रहासारखे
मी फिरत राहीन तुझ्याभोवती
पण धुमकेतूला नसते
आकाशगंगाची मर्यादा
हे तुला माहीत असेल
असे मला वाटत नाही...

आपल्या दोघांतल अंतर
ही आहे विधात्याने आखलेली
लक्ष्मण रेषा, ती तशीच असुदे
माझ्यातल्या रावणाची कुंडली
तुला माहीत नसेल...
असं काही वाटत नाही

-प्रशांत शेलटकर
8600583846

Thursday 15 November 2018

बिनचूक

बिनचूक

इथे कुणाचंच आयुष्य....
बिनचूक कधी असंत नाही
दोन अधिक दोन..चार
नेहमीच कधी असत नाही

इथे आखीव अन रेखीव
अस कधीच काही नसतं
सगळंच कसं विस्कळीत
ज्याचं त्याच नशीब असत
गणिताचा कुठलाच नियम
आयुष्याला लागत नाही...
इथे कुणाचंच आयुष्य....
बिनचूक कधी असंत नाही

जीवलगावर लावावा जीव
तोच जीवाला घोर लावतो
कधी कधी अनोळखी मात्र
जीवाला पण जीव देतो...
आपलं कोण अन परकं कोण
प्रसंगाशिवाय  कळत नाही..
इथे कुणाचंच आयुष्य....
बिनचूक कधी असंत नाही

जन्माला आलेला जीव
कधीतरी चुकणारच आहे
अन चुकता चुकताच तो
नक्की शिकत जाणार आहे
न चुकता जगायला
माणूस म्हणजे देव नाही
इथे कुणाचंच आयुष्य....
बिनचूक कधी असंत नाही

-प्रशांत शेलटकर
8600583846

Tuesday 13 November 2018

लोकशाही

लोकशाही

तिरक्या चालीचे उंट
अन अडीच घराचे घोडे
वजीराची मर्जी संभाळे
गरीब बिचारे गुमान प्यादे..

कोण केसाने गळा कापे
कोणी खूपसे पाठीत खंजीर
कोण धावतो बेलगाम अन
कुणाच्या पायात जंजिर
कोणी इथे असती लबाड
अन कोणी फारच साधे
वजीराची मर्जी संभाळे
गरीब बिचारे गुमान प्यादे

बुद्धिबळाच्या पटावरी
बेफाम घोडी तिरके उंट
राजा बसला एकांतात अन
वजीर मात्र झाला धुंद..
प्याद्यांची मग फौज गाते
लोकशाहीचे अखंड पोवाडे
वजीराची मर्जी संभाळे
गरीब बिचारे गुमान प्यादे

तिरक्या चालीचे उंट
अन अडीच घराचे घोडे
वजीराची मर्जी संभाळे
गरीब बिचारे गुमान प्यादे..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...