सल्ल्याचे सलाईन...
रोग परवडला रे
पण आवर तुझा सल्ला
एलोपॅथी की आयुर्वेद
मनात नुसता कल्ला
कुणी म्हणतो दूध हवे
पण देशी गाईचेच
आणि पीठ तर हवे
ज्वारी आणि बाजरीचेच
जशी काही गोठ्यामध्ये
देशी गाय बांधली आहे
आणि परसात माझ्या
ज्वारी मी पेरली आहे
फळे खा कोणी म्हणतो
कुणी म्हणतो घ्या स्मूदी
कुणी म्हणतो झोपून घ्या
विकत घ्या मसाजगादी
तासभर करा वर्कआऊट
मी देतो डिझाइन
फिटनेसची देतो गॅरंटी
जॉईन व्हा ऑनलाईन
घामेजलेले सेल्फी बघून
कॉम्प्लेक्स मात्र येतो
लोक किती तंदुरुस्त
आणि मी बेडवर लोळतो
म चार दिवस उत्साह
धावणे आणि पळणे
गच्चीत जाऊन सकाळी
जोर बैठका काढणे
शूज ,ट्रॅक पॅन्ट, टोपी
खरेदी मस्त होते
सेल्फी काढून छानसा
सुरवात मस्त होते
रंग तेरड्याचे म्हणे
असतात चार दिवस
चार दिवसातच फिटून जाते
मग व्यायामाची हौस
मग पुन्हा तेच मेसेज
तेच सल्ले फुकटचे
बरं कसं वाटलं मला
बोल घ्या अनुभवाचे
कोणी एक बाई म्हणे
होते मी किती त्रस्त
औषध घ्या अमक्याचे
आता मी आहे मस्त
विश्वास ठेवू नकाच हो
हे असते मार्केटिंग
तुमचं आमचं सर्वांच
असत घाऊक चिटिंग
जिथे पिकते जे जे
तेच खावे नियमाने
करू नयेत उपचार
कोणाच्याही सल्ल्याने
जितक आहे आयुष्य
तितकंच आपण जगणार
वेळ नसेल तुमची तर
यम सुद्धा नाही येणार
- प्रशांत शेलटकर 😃
No comments:
Post a Comment