Ad

Thursday, 5 April 2018

देव

देव मानावा की मानू नये
या भानगडीत मी पडत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही

ज्यांना देव हवा आहे
त्यांच्यासाठी तो श्वास आहे
ज्यांना देव नकोच आहे
त्यांच्यासाठी तो  भास आहे..
आस्तिक नास्तिक वादात
मी कधीच पडत नाही....
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही....

हार घेऊन रांगेत कधी
मी उभा रहात नाही...
पाव किलो पेढ्याची लाच
मी देवाला कधी देत नाही
जो देतो भरभरून जगाला
त्याला मी कधी देत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही...

जे होणारच आहे ....
ते कधी टळत नाही...
खाटल्यावर बसून
कोणताच हरी फळत नाही
म्हणून मी कधी ...
देवास वेठीस धरीत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही...

देव देवळात कधीच नसतो
तो शेतात राबत असतो
तो सीमेवर लढत असतो
तो कधी आनंदवनात असतो
कधी हेमलकसात असतो...
देव शाळेत शिकवत असतो
कधी देवच  शिकत असतो
म्हणून ....
मी देवळात कधी जात नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काय अडत नाही...

--प्रशांत शेलटकर
    रत्नागिरी

4 comments:

  1. उत्तम उतरलीये ..... आवडली

    ReplyDelete
  2. छान कविता. आपले हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. ही कविता माझीच आहे.प्रशांत कर्णिक नावाच्या भामट्याने ती चोरली असावी

      Delete

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...