Ad

Wednesday, 20 December 2023

बोधिसत्व कथा/#३

बोधिसत्व कथा/#३

एकदा दोन मित्र रस्त्यात उभे राहून बाजूच्या मंदिरावरच्या झेंड्याकडे पहात वाद घालत होते

पहिला- झेंडा हलतोय
दुसरा- नाही ,वारा हलतोय(मृगजळ)

बाजूने बोधिसत्व जात होते, ते दोघांना म्हणाले वाराही हलत नाही आणि झेंडाही हलत नाहीये हलतंय ते तुमचे मन..

💡- प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन भिन्न असू शकतो त्याच बरोबर त्याचे आकलन (परसेप्शन) वेगळे असू शकते . सत्य एकच असले तरी त्याची मांडणी प्रत्येक जण वेगळी करू शकतो .ती सुद्धा त्याच्या परसेप्शनच्या मर्यादेत. आणि विशेष म्हणजे परसेप्शनला मर्यादा असते ती सुद्धा ज्याची त्याची वेगळी. प्रत्येकाला जाणवलेले सत्य हे सत्यच असते परंतु त्याला जाणवलेले सत्य हे तेवढेच सत्य नसते त्याहून आणखी वेगळे ,आणखी विस्तृत असण्याची शक्यता असू शकते. उदा. स्टेज वरील वक्त्याला समोरचे श्रोते, खुर्च्या, वर फिरत असलेले फॅन, सभागृहाच्या खिडक्या हे सगळे दिसत असते , ते त्याच्या दृष्टीत येणारे जग असते .आणि त्याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू या सत्यच असतात. पण तेवढ्याच सत्य नसतात..तो स्वतःच एक सत्य असतोच जरी तो स्वतःचा स्वतःला दिसत नसला तरी, त्याच्या मागे असलेल बॅक स्टेज ,मागचा बोर्ड ,वर फिरणारा फॅन हे सारे त्याला दिसत नसते कारण तो श्रोत्यांसमोर बोलत असतो बॅक स्टेजकडे त्याची पाठ असते. त्याच्या दृष्टीने ते अज्ञात असते म्हणजे ते सत्य नसते का? त्याच्या दृष्टीने जे अज्ञात असते ते श्रोत्यांच्या दृष्टीने ज्ञात असते 
     सत्याची ज्ञात आणि अज्ञात अशी विभागणी माणसाने आपल्या सोयीनुसार केली आहे .सत्य हे सत्यच असते . ते स्वयंसिद्ध असते .सूर्य हे सत्य आहे .दिवसा तो दिसतो म्हणून तो असतो, रात्री तो दिसत नाही म्हणून तो असत नाही ..असे थोडेच आहे. त्याचे असणे आणि नसणे आपल्या स्थितीवर ,आपल्या आकलनावर अवलंबून नसते ..तो असतोच .. आपली स्थिती बदलली म्हणजे रात्र झाली की तो आपल्याला म्हणजे फक्त आपल्यालाच दिसत नाही.म्हणून तो नाहीच असे नसते.पृथ्वीवर पलीकडे दिवस चालू असतो त्याना तो दिसतो.आकलनाला स्थिती आणि काळाच्या मर्यादा असते तशीच ते व्यक्तीसापेक्ष असू शकते
       परसेप्शन ही आपली मर्यादा आहे आणि आपली ताकदही...सत्य हे त्या पलीकडचे आहे..थोडे माझ्या आवाक्यातले ...खूपसे  माझ्या आवाक्याच्या पलीकडले...
     बोधिसत्वाच्या या छोट्या पण गहन अर्थपूर्ण कथेचे माझ्या बुद्धीच्या मर्यादेत झालेले हे अंशतः आकलन..इतरांची आकलने भिन्न असू शकतात.

अत्त दीप भव..

☺️-प्रशांत

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...