Ad

Saturday 28 November 2020

नेटा"चे श्लोक



शंभर शब्द ऐकावे
एक शब्द लिहावा
व्यक्त व्हावे नेहमी
सावधपणे !!

कळते सर्वच मज
हा केवळ माज
ल्यावा नम्रतेचा साज
नियमितपणे !!

एकच जरी विषय
बहू असती आशय
परमतावर संशय
घेऊ नये !!

व्हाट्सएप, फेसबुक
बुद्धिभेदाचे साधन
त्यावरून अनुमान
काढुच नये !!

राजकारण,अर्थकारण
विषय फार गहन
आपले तोकडे ज्ञान
दाखवू नये !!

फेसबुकवरील वटवट
न ठरो कोणा कटकट
करुनी असंख्य पोस्ट
वीट कधी आणू नये !!

सगळे आपले सांगाती
कुणी शाळासोबती
उगाच वादाच्या नौबती
झाडू नये !!

जाणावी औकात आपली
जाणावी बुध्दिझेप आपली
उगा विद्वत्तेची डफली
वाजवू  नये!!

न करावा उगा अपमान
न द्यावा उगा सन्मान
विवेक बुद्धीचे हे लक्षण
जाण नेटकऱ्या !!

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday 21 November 2020

समांतर

समांतर

आपण दोघे...
रेल्वेचे दोन समांतर रूळ
समांतर असलो तरी
समान "अंतर" नसलेले
पण सम "अंतर "असलेले

तुझ्यापासून दूर नाही
पण तुझ्याजवळही नाही
तुझ्या माझ्या सांध्यांना
तसाही काही अर्थ नाही

नैतिकतेच्या मालगाडीचे
अवघड अखंड ओझे
जितके तुझ्यावर
तितकेच माझ्यावर...

जवळ आलो तरी अपघात
लांब गेलो तरी अपघात
आपण फक्त अंतर ठेवायचे
नियती नावाच्या अभियंत्याने
आखून दिलेल्या अचूक मापात

स्पर्श नसला तर काय झालं
सहअस्तित्व तर आहे ना...
प्रेम नावाची पटरी,
शेवटी बांधून ठेवतेच ना..
मग असूदे ना...
नियतीच्या मालगाडीचे 
अवघड ओझे...
मग असुदेत आपण समांतर
जायचं तर एकत्र आहेच ना
जायचं तर एकत्र आहेच ना

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846









Friday 20 November 2020

क्षणिक

क्षणिक....

वाटते आज उदास उदास
उगाच हा नात्यांचा पसारा
उगाच वाटते घेतला माथी
अपेक्षांचा हा अवजड भारा

जीव लावावा अलगद जिथे
थांग त्याचा कुणाला नसे
व्यर्थ लावून का घ्यावे उगा 
जीवाला या आपल्या पिसे

अधीर ज्याची वाट पाहावी
तोच वाटेला लावतो हे खरे
आपले आपण होतो एकटे
हेच होते किती ना बरे...

पुसणार असेल कोणी अश्रू
तर रडण्याला अर्थ आहे..
गावाला ज्या जायचेच नाही
पत्ता विचारणेच व्यर्थ आहे

आवरीन म्हणतो आता पसारा
प्रवास फार लांबचा आहे
विसावा  क्षणभराचाच होता
आता मान्य करणे भाग आहे...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846
 21/11/2020

Thursday 19 November 2020

तथ्य

जे आहे तुझ्याकडे
ते मस्त साजरं कर..
पुढचा जन्म कोणता
याचे आहे का उत्तर?

टकलावरचे चार केस
हौसेने पाड  रे भांग
पुढच्या जन्मी झालास अस्वल
तर तू काय करशील सांग?

आता मस्त फिरून घे
पळत राहू दे तुझे पाय
पुढच्या जन्मी झाड झालास
तर एका जागीच देशील ठाय

बस जरा घटकाभर
आणि मस्त ताणून झोप
घोडा झालास तर पुढच्या जन्मी
उभ्याने घ्यावी लागेल झोप

कधीतरी मनासारखं
मस्तपैकी सजून घे
कधीतरी भर पावसात
चिंब चिंब भिजून घे

आला क्षण निघून गेला
पुढच काही माहीत नाही
कोणता श्वास अखेरचा
याचं काही उत्तर नाही

जस आहे जिथे आहे
सगळं कसं मस्त आहे
हवं तसं मिळत नसतंच
मानण्यातच सगळं सुख असतं

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846







Monday 16 November 2020

आजकाल अस वाटतय बघवेड्यासारख..

आजकाल अस वाटतय बघ
वेड्यासारख.....

कधी हळव्या कातर क्षणी
सोबतीला असते तुझी
उबदार आठवण...
आठवत असते तुझे ते
कधी लाडिक कधी रागीट बोलणे

तू कशीही असो,
गुंतून राहतो मी तुझ्यात
भलताच पझेसिव्ह झालोय मी
तू शभरटक्के माझी असावीस
अस वाटू लागलंय मला हल्ली

तुला कोणाचाही स्पर्श
सहन होत नाही आजकाल
तुझ्या ओठांवर, तुझ्या गालावर
असावा वाटते केवळ माझा हक्क
शरीराची अनिवार ओढ मला
अस्वस्थ करते  हे सत्यच
पण तुझ्या मनाची ओढ
त्याहून हजारपटीने जास्त...

संभोगाच्या आवर्तनाचा आनंद
क्षणिक तर नक्कीच पण..
सर्व काही उधळून टाकायची
भावना तर शाश्वतच ना???

कधी कधी वाटत,
माझं बीज रुजावे तुझ्या गर्भात
आणि आई होण्याचा तुझा आनंद
भरभरून पहावा तुझ्या चेहऱ्यावर

कधी वाटते,
भरभरून सुटावा पान्हा 
तुझ्या स्तनातून अखंड...
आणि स्तनपान करताना
तू फिरवावेस तुझे हात
तुझ्या मांडीवर दूध पिणाऱ्या
तुझ्या बाळाच्या जावळातून

कधी वाटते,
तू रडावीस मोकळेपणाने
कोंडलेले तुझे श्वास मोकळे व्हावे
मनाच्या तळात खोलवर
दाबून ठेवलेले असंख्य हुंदके
मुक्त व्हावेत...

आणि आभाळ मोकळं होऊन
नितळ  आकाश स्वच्छ दिसावं
तशी तू दिसावीस...
हसरी, निरागस, निष्पाप
जशी तू होतीस लहानपणी

आजकाल अस वाटतय बघ
वेड्यासारख.....

Sunday 8 November 2020

वडपावचे गाव

वडापावचे गाव

स्वप्नात पहिला मी
अजबच एक गाव
वडाच्या झाडाला लागले
गरमागरम वडापाव

रस्त्याच्या कडेला
पिझ्याची झाडे.
वेलींनाही लागले
गोड गोड पेढे.

मांडवावरच्या वेलींना
भज्यांचे घोस..
मनसोक्त खाऊन घेऊ
भागवू आपला सोस

उंच उंच झाडांना
बर्गर लटकलेले
पानांपानातून
डोसे टांगलेले

इथे तिथे पसरलेले
कॅडबरीचे मळे
मळ्यातून मध्ये मध्ये
चॉकलेटचेच दळे.

आमरसाची  वाहे नदी
भरून दुथडी
तळ्यातून भरून वाहे
मिठ्ठास बासुंदी..

हळूच तोडली मी
जिलेबी झाडावरची
जाग आली अन कळलं
ती दुनिया स्वप्नांची

-प्रशांत शेलटकर
8600583846







नावाची नियती

नाव जरी असले *कोमल* 
कोमलता गायब असते..
रागाचा चढतो पारा
तिचेच नाव *शितल* असते?

दिवटाच निघतो *दीपक* 
 *प्रकाश* तर नुसताच नावाला
अंधारच का पुजला जाई
 *सूर्यकांतच्या* आयुष्याला

 *रेखा* रेखीव का नसावी ?
 *आशा* कायम का निराश असते?
लख्ख गोरी *निशा* का असावी?
काळी सावळी *शुभ्रा* का असते?

 *सुधीर* का बरे अधीर असतो?
गर्विष्ठ का असतो *सुविनय* ?
 *सुहास*  का नेहमीच रडका?
घाबरलेला का असतो अभय?

 *अमर* का खरेच अमर असतो?
होतो विजयचा का नेहमीच जय?
 *अजय* नेहमीच अजय असतो का
पराभवाचे त्याला नसते का भय

 *धीरजचा* का धीर सुटतो
असंतुष्ट का असतो *संतोष* 
नाव वेगळे काम वेगळे
कोणाला याचा द्यावा दोष


 शेलटकर प्रशांत
8600583846

Monday 2 November 2020

चु.भु.द्या.घ्या☺️

चु.भु.द्या.घ्या☺️

काही शब्दांचे लघुरुप ( shortforms) असे असतात की त्याचा खरा अर्थ कळला की हसू येते
पूर्वी दुकांनांच्या पाटीवर प्रोप्रा. असे लिहिले असायचे. प्रोपायटर चे प्रोप्रा. हे लघुरुप. पण त्यावेळी मला वाटायचं हे  म्हणजे श्री ,श्रीमती सारख काहीतरी असावं☺️
वास्तविक प्रोप्रा ऐवजी सरळ प्रोपायटर  किंवा मालक लिहायचं ना...पण जाऊदे  लिहिणाऱ्यालाच बहुतेक माहीत नसावा त्याचा अर्थ...
  विचारलं तर कदाचित म्हणाला असता " शास्त्र असतंय त्ये" ☺️☺️

    पूर्वी पत्र लिहिताना  सुरुवातीला स.न.वि.वि अस लिहिलं जायचं.. ते म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष चे लघुरुप...पण हे फार कुणाला माहीत नसायचं..पत्र वाचताना पण सनविवी अस बोलून मोकळे☺️ बरं हे एवढ्यावरच नाही थांबायचं आई वडिलांना पत्र लिहिताना शि. सा.न म्हणजे शिर साष्टांग नमस्कार , किंवा तीर्थरूप लिहावं लागायचं.. तीर्थरूप म्हणजे तीर्थ जस पवित्र तसे तुम्ही मला पवित्र आहात हेच आईवडिलांना सांगायच असतं... परत गंमत बघा तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप वेगळं...आईवडील हे तीर्थरूप असतात त्याना तीर्थस्वरूप म्हणायच नसतं ते बाकीच्या आदरणीय नातेवाईकांसाठी राखीव...तिर्थस्वरूप म्हणजे जे तीर्थासारखे आहेत ते..तीर्थरूप नाही पण तीर्थासारखे...किती सूक्ष्म फरक आहे ना....दुसरा एक शब्द म्हणजे विधवा स्त्रीला पत्र लिहिताना गं. भा अस लिहायची पद्धत होती.. गं भा म्हणजे गंगा भागीरथीचे लघुरुप...गंगे सारखी पवित्र स्त्री असा त्यांचा भावार्थ..
      
      पत्र लिहुन झाल्यावर जर काही लिहायचं राहील तर खाली ता.क. अस लिहायच आणि पुढे राहिलेले किहायच
ता.क. म्हणजे ताजा कलम ☺️☺️☺️
     सरकारी पत्र पण नमुना होता...म.वि म्हणजे  महाशयास विदित व्हावे... विदित व्हावे म्हणजे माहिती व्हावे...हू. हू . म्हणजे हुजूर हुकूम...म्हणजे वरिष्ठांचा आदेश...
     पत्राच्या शेवटी कळावे का लिहितात हे मला अद्याप कळलेले नाही..मी माझ्या सामान्य बुद्धीनुसार काढलेला अर्थ म्हणजे.. पत्रलेखकाने जे काही वर लिहिले ते वाचणाऱ्याला कळावे...असा असू शकेल ☺️☺️☺️☺️☺️
   पत्राचा शेवट तर भारीच असतो....
     
   आपला विश्वासू...म्हणजे स्वतःच स्वतःला विश्वासू म्हणवून घ्यायचे का?☺️☺️☺️ की आपली गॅरंटी समोरच्याला कळावी म्हणून ही लिहायची पद्धत आली  का ते नकळे...

वरील लेखात काही चुकल असेल तर
चुभू  घ्यावी द्यावी....
चूक भूल द्यावी घ्यावी....

☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

-प्रशांत  शशिकांत शेलटकर
 8600583849

माझा ब्लॉग-
https://aksharpooja.blogspot.com/?m=1

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...