Ad

Tuesday 9 April 2024

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...

    कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल लागत नाही..ती कधी तरी ती आपल्या आयुष्यात दस्तक देऊन येतात त्याला काहीही निमित्त लागतं.. आणि जातानाही कसलेही निमित्त होऊन निघून जातात..त्यांच्या येण्या जाण्याचे कारण जणू नियतीने लिहिलेले असते.नियती तुमचे स्किट लिहिते..त्यात आपल्या स्वतःच्या जागा आपण निर्माण करायच्या असतात.पण आपण मूळ संहिता नाही बदलू शकत..तोंडाला रंग फासून आणि तुमच्या भूमिका निश्चित करून नियती तुम्हाला जगाच्या रंगमंचावर ढकलून देते..मग आपण आपली भूमिका समरसून करत रहायची.. ज्याच त्याच स्किट संपलं की तो विंगेत परततो ..बस्स आपलं स्किट पूर्ण झालं की परतायचं...

© प्रशांत

Monday 8 April 2024

पाऊस

आज आमच्या गावात पाऊस पडला...पहिला पाऊस म्हटल्यावर...कवी ने कविता नाही केली तर त्याला मोक्ष मिळत नाही..त्याला नानाविध कष्ट सहन करावे लागतात. त्याचा आत्मा लोकलला लटकलेला प्रवासी होतो.. त्याच्या बस चुकतात...पंगतीला बसला की त्याचे आवडते व्यंजन समोर आले की नेमके संपते मग त्याला कुर्म्या ऐवजी कोबीची भाजी खावी लागते...बस मध्ये बसला तर त्याच्या बाजूला नेहमीच "खोकाळू" पॅसेंजर येऊन बसतो...

म्हणून माझी ही कविता सहन करा..
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

वळीवाचे चुंबन ..

अत्तराचे भाव कोसळले
सुगंध मातीचा आला..
नव्हे तापल्या वसुंधरेने
सुगंधी सुस्कारा टाकला

किंचित ओला दिलासा
तरी आनंदी पान पान
मातीतला कण कण देतो
धुंद सुगंधी तान तान

हा क्षणिक आहे गारवा
हा वर्षाव जरी जरासा
तरी किंचित या सुखाचा
सृष्टी करते किती जलसा

मारुनी थोडी शायनिंग
पाऊस हसून गेला..
जसे कुणा तरुणीला
फ्लाइंग किस देऊन गेला

वळीवाचे ओले चुंबन
धरती शहारून गेली
अवचित मृदगंधी वीणा
सूर सुगंधी सोडून गेली

आता येउ दे उन्हाळा
फिकीर त्याची कशाला
आठवण जपत वळीवाची
धरणी ही सोसेल झळा..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

💧💦💧💦💧💦💧💦

Sunday 7 April 2024

हिंदू..

हिंदू...

सकल हिंदू आपण बंधू
केवळ एक घोष वाक्य
आधी जात मग धर्म
कसे मग हिंदुत्व शक्य

जातीपातीत फुटलो आपण
कधीच सुधारणार नाही
व्यवहारातून गेली पण
मनातून जात ,जात नाही

विखरून गेलो म्हणूनच
राज्य परक्यांचे आले
गोडवे केवळ भूतकाळाचे
फक्त तोंडात राहिले

आडनाव बघून लोकांचे
जातीचा अंदाज बांधतो
मग कसा करायचा व्यवहार
हेच ना आपण ठरवतो

वरवरचा सगळा उत्सव
आत मत्सर भरलेला
पाठ फिरताच कोणाची
निंदोत्सव हा ठरलेला

प्रसंग येताच कठीण बाका
तात्काळ एक होतो अहिंदू
जात,पंथ ,दर्जा नी पक्ष
शोधत बसतो आपण हिंदू

पोस्ट ,आणि स्टेटस टाकून 
सण होतात आपले साजरे
जबड्यात गेले कुत्र्यांच्या तरी
 ससे खातात खुशीत गाजरे

नाका तोंडात पाणी जाते
तेव्हाच हिंदू एक होतो.
हिंदुत्व एक जीवन पद्धत
हेच आपण विसरून जातो

वाळून जातो थेंब एकटा
जोडून राहिला तर होतो सागर
जात पंथ भाषा विसरून
हिंदुत्वाचा करूया जागर

@ प्रशांत

Monday 1 April 2024

देव

देव...

सगळे साले भास
म्हणे देव मला पावला
केले इतके पाप
तिथे देव कुठे थाम्बला..

केले कित्येक जप
केवळ मणी ओढले
नाम राहिले बाजूला
मी फक्त मणी मोजले

साफ गुंतलो प्रपंची
मोह तिळमात्र न सुटला
करून केवळ देखावा
मी बाजार भक्तीचा मांडला

 न हाकलला कावळा
उष्ट्या हाताने कधी 
शब्दांचे भरले ढग
अन शब्दांची केवळ नदी

शब्दांचे करून खेळ
मी अध्यात्म मस्त सजवतो
भला सात्विक म्हणुनी
ढोल माझेच मी वाजवतो

म्हणे अनुभूती आली
देव माझ्याशी बोलला
कोण रे  तू देवाचा ?
असा खास लागून गेला

उतरवून ठेव ते खोटे
मुखवटे सगळे दांभिक
नको करू ते कर्मकांड
रहा स्वतःशी प्रामाणिक

देव ज्यांना उमगला
करुणामय हृदय त्यांचे
खरे स्थितप्रज्ञ ते साधू
चरण स्पर्शावे त्यांचे

@ प्रशांत 😌

भय+कृतज्ञता = देव

भय+कृतज्ञता = देव

निर्सगाचे रौद्र रूप, बेभरवशाची जिंदगी, जो निसर्ग आपले पोषण करतोय तोच कधी तरी आपल्या जीवावर उठतोय ..या सर्व भवतालात भरकटलेल्या माणसाला बुडत्याला काडीचा आधार मिळावा तशी देव नावाची एक शाश्वत काडी सापडली.. एकाच वेळी भय आणि कृतज्ञता याचे विलक्षण मिश्रण असलेली भावना म्हणजे देव...
   आरंभीच्या काळात  त्या भावनेने त्याला मानसिक स्थैर्य दिले..देवाच्या अस्तित्वाचे प्रश्न ,माणूस स्थिर-स्थावर झाल्यावर निर्माण व्हायला लागले.निसर्ग अफाट आणि भव्य आहे..दिवस-रात्रीचे चक्र अखंड चालू आहे, त्यात काहीतरी नियम आहेत..आपण आपली नित्य कामे करत असतो तसेच ही निसर्गाची कामे कोण करत असेल ? हा प्रश्न माणसाला पडला, त्याचा भवताल हा चल होता ,अस्थिर होता, जे चल आहे त्याला कोणीतरी चालवत आहे असा बेसिक विचार त्याच्या मनात येऊन गेला असेल..जो चालवतोय पण दिसत नाहीये तो वादळे निर्माण करतोय, विजा चमकवतोय, पाऊस पाडतोय ,त्याने असे प्राणी निर्माण केलेत की जे आपल्याला खाऊ शकतात ..या सर्वातून त्याच्या विषयी भय निर्माण झाले ..पण त्याच्याचमुळे आपले पोषण होतंय, मातीतून धान्य देतोय, पाणी देतोय ,यातून त्याच्या विषयी कृतज्ञता निर्माण झाली..
       पण ती निराकार शक्ती समजून घ्यायला अवघड म्हणून त्याने  तिला साकार रूप दिले..साकार करतानाही तिला मानवी रूप दिले ते  ती शक्ती समजायला सोपी म्हणून आधी पाषाण मग त्याच्या मूर्ती झाल्या.. पाषाणच का? तर तो स्थिर असतो, दीर्घकाळ टिकतो, तो जळत नाही..
      मग आपल्या भय आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रोजेक्शन त्या मूर्तीवर करणे चालू झाले, भय भावना त्रासदायक असते, ती शेअर केली की मनावरचा ताण कमी होतो.देवापुढे हात जोडले की मन शांत व्हायला लागलं कारण भय नावाच्या ओझ्याला कोणीतरी शेअर करणारा मिळाला 
     कृतज्ञता ही पॉझिटिव्ह भावना आहे ती व्यक्त केली की ऊर्जा मिळते. म्हणून माणसे देवापुढे हात जोडायला लागली..
      पुढे मूर्ती सुबक झाल्या त्यांची देवळे झाली.पण कृतज्ञता आणि भय या भावना कायम राहिल्या.. त्यात भय ही बेसिक भावना असल्याने "देव" टिकून राहिला.. आणि टिकून राहील..
      देव कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही हा विचार जसा दृढ होत जाईल तसा देव रिटायर होईल की कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणूस त्याचे कायम ठेवील ? या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात लपले आहे..

@ प्रशांत शेलटकर

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...