Ad

Wednesday, 6 October 2021

नावात काय आहे?

नावात काय आहे?

शेक्सपिअर जर भारतात जन्मला असता तर त्याला हा प्रश्न पडला नसता...कारण भारतात नावात बरच काही असतं... आणि    नसतंही ....जे अस्तित्वात नसत त्याला पण भारतात नाव असत..आटपाटनगराला तालुका ,जिल्ह्य आणि राज्य नसतेच..ते फक्त कथेच्या सुरवातीच्या पहिल्या ओळीत असतं... जस झुमरीतलय्या हे फक्त चित्रपटात असत तसंच...
    माणसांच्या नावात तर गंमतच असते..म्हणजे पूर्वीच्या काळी नवऱ्याचे नाव महादेव असेल तर बायकोचे नाव हमखास पार्वती असायचे. विष्णू असेल तर बायको लक्ष्मी ..विठोबा असेल तर बायको रखमा...मुलांची नावे पण देवादिकांची असत..रामचंद्र,श्रीकृष्ण ,गणेश इत्यादी..इत्यादी..जसे जसे चित्रपटांची मोहिनी समाजावर गारुड करायला लागली तशी नावे देवानंद,राजेश ,जितेंद्र, धर्मेंद्र अशी व्हायला लागली..नव्वद च्या दशकात करिष्मा कपूर टॉप ला होती त्या दोन तीन वर्षात करिष्मा नावाचे पीक आले होते..ऋतिक चा कहो न्या प्यार है सुपर डुपर हिट झाला आणि गल्ली गल्लीत ऋतिक दिसायला लागले..
     पूर्वीच्या काळी जर मूल होत नसेल तर किंवा झालेली मुलं जगत नसतील तर मुलांचं नाव धोंड्या, दगडू अशी ठेवायची पद्धत असे..अर्थात अशी तुच्छतादर्शक नावे ज्यांची असत ते त्या नावाला अगदी सार्थ करीत .क्वचित कोणी शिकून सवरुन नाव काढले तर त्याला पंत ही उपाधी लागत असे मग त्याचा धोंडोपंत होऊन जाई. किंवा बाल वयातील धोंड्या प्रौढपणी धोंडो होत असे..

कधी कधी टोपण नावे पण उपाधी मिरवतात. बंड्याचे बंडो पंत होते, बाबू चे बाबुराव होते ,भाऊ चे भाऊ साहेब होते..बाळू चे बाळा साहेब होते..नावाचे सुलभीकरण म्हणजे टोपण नावे.. निशिकांत चे निशी, निश्या किंवा अगदी कांत्या पण होते...शशिकांत आणि शशिकला चे सुलभीकरण शशी होते... इथे लिंगभेद नाहीसा होतो..नुसतं शशी म्हटलं की बाई की बुवा ते कळतच नाही...
     काही नावे "उभयचर की (उभयचल"? )😄असतात जसे  किरण...मुलाला पण चालते आणि मुलीलाही
     काही नावे पुरुषवाचक असूनही ती स्त्रियांची म्हणून ठेवली जातात. उदा.सविता म्हणजे सूर्य पण सविता हे मुलीचे नाव आहे. अविनाश कौर नावाची एक दूरदर्शन वर न्यूज रीडर होती.

       पंकज म्हणजे कमळ ,पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्म ,जे चिखलात जन्मते ते पंकज म्हणजे कमळ.. पण आता पंकज नावाचा मुलगा कोणत्या चिखलात जन्मतो..☺️

काही नावे व्यवसायावरून रूढ होतात...पारशी समाजातील नावे पहा मी एका ठिकाणी वाचलं होतं डॉ.बाटलीवाला...किती विसंगत वाटत ना...म्हणजे हे डॉक्टर बाटली घेऊन बसतात की काय? ☺️झुनझुनवाला...हे असेच अगम्य नाव...अशी अगम्य नावे आपल्याकडे पण असतात.. काहीतरी वेगळं नाव ठेवायच्या प्रयत्नात काहीतरी दुर्बोध नावे ठेवली जातात..किंवा त्याचा अर्थ लावताना मनाची द्विधा होते..उदा. श्रेया ..म्हणजे श्रेय घेणारी की देणारी..☺️ त्यात दाक्षिणात्य नावे फारच मनोरंजक..प्रसिद्ध धावपटू पी टी उषा च्या नावाचा लॉंग फॉर्म असाच भन्नाट आहे..खरे खोटे ती उषाच जाणे ,पण तो आम्ही पाठ करून  ठेवला होता...पिलावल कंदी टेक्केपरंबिल उषा 😄😄😄 मदर तेरेसांचे नावही असेच काहीसे दुर्बोध आहे..
       काही नावं अशी असतात की" नाव ठेवायला जागा नसते"
काही नावं अशी असतात की नाव मोठं लक्षण खोटं असंही असत.. नाहीतर "नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा " ही कशाला झाली असती ना 😃😃

      -प्रशांत शेलटकर
      8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...