Ad

Wednesday 24 October 2018

मीच कविता होतो मी..

कधी निरभ्र नभाशीच
असा बोलतो मी ,
की बोलता बोलता
निरभ्र होत जातो मी...

कधी मस्त वाऱ्याशी
असा डोलतो मी
की डोलता डोलता
हलका होत जातोच मी...

कधी शांत शांत डोहात
असा डुंबतो मी,
की डुंबता डुंबता
असा नितळ होत जातो मी...

कधी प्राजक्त ओंजळीत
अलवार घेतो मी,
की श्वास घेता घेता
गंधीत होत जातोच मी...

कधी शब्दात इतुका
गुंतत जातो मी,
की गुंतता गुंतता
मीच कविता होतो मी..

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/24/10/18

तू होतीस तेव्हा

तू होतीस तेव्हा...
फुलं अलगद उमलायची,
आता फक्त फुलतात...
तू होतीस तेव्हा...
सकाळ सोनसकाळ असायची
आता फक्त ऊन्ह पडतात...

तू होतीस तेव्हा...
पाऊस रिमझिम पडायचा
आता फक्त पाणी पडतं...
तू होतीस तेव्हा...
सगळंच कसं सोपं होतं..
आता तुझ्यावाचून अडत

तू होतीस तेव्हा...
चांदण्यालाही कैफ होता
आता चंद्रही केविलवाणा
तू होतीस तेव्हा...
बासरीला सूर होता..
आता शुन्यात हरवला कान्हा

-प्रशांत शेलटकर
8600583846

Saturday 20 October 2018

असा बेफाम जगून घे

जिवंत आहेस तोपर्यंत
असं बेफाम जगून घे...
पाहता येईल तेवढं जग
जमेल तसं पाहून घे..

जिथे मिळेल जसं मिळेल
तसं सारं वाचून घे...
पुस्तकंच कशाला हवीत वेड्या
माणसंही वाचून घे...

थकतील उद्या पाय रे
जमेल तसं चालून घे
कधीतरी पायाला पण
थोडी माती लागू दे....

मी आणि माझंच जग
बाजूला थोडं ठेऊन दे
कधीतरी स्वतःला रे
जगाशी या जोडून घे....

किती रोखशील स्वतःला
कधी मुक्तपणे रडून घे...
इस्त्री मोडून कधी चेहऱ्याची
मस्त मस्त कधी हसून घे...

आला श्वास गेला श्वास
हिशेब त्याचा सोडून दे
काळोख्या आयुष्याला
चांदण्याचाच रे ध्यास दे

-प्रशांत शशिकांत शेलटकर 8600583846/20/10/18

Tuesday 16 October 2018

मोक्ष

मोक्ष...

कित्येक मरणे हुकली
म्हणून आजवर जगत आलो
दुःखाला सलाम करुनी
आजवर मी हसत आलो...

कधी स्वप्नांचे मोहक इमले
मी मजेत सजवीत गेलो
कधी माझेच मनसुबे मी
बेफाम उधळीत गेलो...

कधी जवान जिंदगीला
असा मिठीत घेत गेलो
कधी मी उन्मुक्त संन्यस्त
कधी मी विरक्त होत गेलो

कधी पंगा जिंदगीशी..
खुलेआम घेत गेलो..
कधी कधी मरणाशी
दोस्तीही करत गेलो...

जमेल तशी माणसांची
बेरीज मी करीत गेलो
वजाबाकी माणसांची
तरी मी सोशीत गेलो

कित्येक मोहाचे क्षण मी
असे झुगारीत चाललो..
बंधन देहाचे उगाच हे
मी कधीच मोक्षास गेलो...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/15/10/18

Saturday 13 October 2018

प्रेम झालं की

प्रेम झालं की,
ते व्यक्त करायला शब्दांची गरज नसते...
ते झालं की आपला श्वास तिला कळतो
अन तिचा आपल्याला....
ही श्वासांची भाषा
फक्त त्या दोघांनाच कळते..
त्यासाठी आतून उमलावं लागत
फुलासारखं..

प्रेम झालं की,
एकमेकांचा श्वास कळतो
तो कळला की,
नजर पण बोलायला लागते..
तिची व्यथा त्याच्या 
डोळ्यात दाटून अलवार दाटून येते..

प्रेम झालं की,
तिच्या पायात काटा रुतला
तर कळ त्याच्या काळजात उठते..
मग एकांतात त्याच्या डोळ्यांची सरोवरे  पापण्यांची तटबंदी तोडून वाहू लागतात...

प्रेम झालं की,
जग सुंदर होते.
मग पक्षी फक्त किलबिलत नाहीत
ते गातात
झरे फक्त वहात नाहीत
ते गुणगुणतात...
.आकाशात चांदण्याची नक्षी होते.
.आणि चंद्राला साक्षी ठेवावेसे वाटते..

प्रेम झालं की,
ते फक्त एकदाच होतं..
ती दूर गेली तरी...
फक्त तिच्या साठीच
काळीज भरून येत..
आणि तिची वाट पाहण्यात
आयुष्यही निघून जातं...
प्रेम झालं की हे असंच होतं
प्रेम झालं की हे असंच होतं

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583836/14/10/18

दिवस

दिवस...

निर्लज्ज बेफाम रात्रीचा..
पदर काय तो ढळला अन
दिवसाढवळ्या कोण जाणे
"दिवस" कसा तो चळला....

तत्वाच्या त्या पोकळ गप्पा
अन नैतिकतेचे बंडल पाढे
घोकत बसला दिवसाढवळ्या
वेडा तो "दिवस " आंधळा..
दिवसाढवळ्या कोण जाणे
"दिवस" कसा तो चळला....

दंभाची ती छाती टीचभर
मिरवीत बसला दिवस तो येडा
विकारांची ढेकूणदाढी...
उगाच कुरवाळत मग बसला..
दिवसाढवळ्या कोण जाणे
"दिवस" कसा तो चळला

रात्र कोवळी नाजूक सुंदर..
नखऱयांचे पैंजण छन छन
सूर्य पोहचता पैलतटावर
दिवस कासावीस झाला
दिवसाढवळ्या कोण जाणे
"दिवस" कसा तो चळला

वस्त्र फेडूनी मग दिवसाचे
नखरे करुनी रात्र ती गेली
अन तत्वाची करून पिपाणी
दिवस वाजवे भल्या सकाळी
सूर्य बिचारा विचार करतो..
दिवसाढवळ्या कोण जाणे
लेक माझा कसा चळला..
दिवसाढवळ्या कोण जाणे
"दिवस" कसा तो चळला....

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/14/10/18

Wednesday 10 October 2018

सॉरी... आठवतं का?

लाईट केव्हाही जाते
आणि केव्हाही येते
महावितरण सॉरी म्हटल्याचे
आठवते का??????

बसेस वेळेवर सुटत नाहीत
कधी स्टॉप वर थांबत नाहीत
परिवहनमंडळ सॉरी म्हटल्याचे
आठवतं का??????

पहिल्यापावसात खड्डे पडतात
किती किती अपघात होतात
पि-डब्लू-डी सॉरी म्हटल्याचे
कधी आठवते का?????

दिल्याशिवाय काम होत नाही
कागद काही हलत नाही
शासनाने सॉरी म्हटल्याचे
कधी आठवते का???

पाच वर्षातली चार वर्ष आराम
एक वर्षात सपाटून काम...
कुठला लोकप्रतिनिधी कधी
सॉरी म्हटल्याचे आठवत का?

आता जर कुणी आला दारा
म्हणला ताई माई शिक्का मारा
तर त्याला एक नक्की विचारा
पाच वर्षातून एकदाच का फेरा

आणि त्याला.....सॉरी म्हणा...

-प्रशांत शेलटकर
  8600583846

इतकीही...

इतकीही नको बोलूस की,
तुझ्या ओठातच गुंतून राहीन
अशी नको पाहुस माझ्याकडे       
तुझ्याकडे मी पहातच राहीन

इतकीही जवळ येऊ नकोस    
की माझे श्वास थांबतील...
इतकीही लांब जाऊ नकोस
की तुझी आठवण येत राहील

गालावर आलेली ती तुझी बट
अशी कानामागे नेऊ नकोस
अन बोलता बोलता निःशब्द
तू अशी होऊ नकोस...

कधी भिजलीस जर पावसात
केस असे झटकू नकोस...
अन केस असे झटकून तू
मला अशी बिलगू नकोस...

अन बिलगलीसच कधी मला
एक मात्र विसरू नकोस
देणे ओठांचे ओठांना ...
दिल्याशिवाय तू जाऊ नकोस

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846/10/10/18

Monday 8 October 2018

ग्लोबल-लोकल

ग्लोबल ग्लोबल बस्स झालं
हो रे थोडं लोकल..लोकल
गॅझेटचा रे नादच खुळा...
आता हो रे  सोशल.. सोशल

पूर्वीइतकीच सूंदर सकाळ
आतासुध्दा असते....
मग गुडमॉर्निंगच्या मेसेजची
गरज का रे भासते...
मेसेजशिवाय मित्रांची
रोज विचार हलचल हलचल
गॅझेटचा रे नादच खुळा...
आता हो रे सोशल सोशल...

वाढदिवसाची धमालही आता
इमोजीमध्ये  "फ्रीज" झाली
अन गेलेल्याची श्रद्धांजली
"आरआयपी" मध्ये बंद झाली
मुक्त कर रे  भाव- भावना
कशास रे  मळमळ मळमळ
गॅझेटचा रे नादच खुळा...
आता हो रे सोशल सोशल

आवडला नाही तरी डीपी तुझा
मी त्याला छान म्हटलं पाहिजे
पुढल्यावेळी माझ्या डिपीला
तु मानाचं पान दिलंच पाहिजे
असल्या खोटेपणाची मित्रा
का रे व्हावी तळमळ तळमळ
गॅझेटचा रे नादच खुळा...
आता हो रे  सोशल सोशल

मित्रा आता तुला हसायला
इमोजीच का लागते. ?...
अन इमोजीशिवाय रडायची
तुला लाज का वाटते?....
फुलून येशील आतून जेव्हा
जमून येईल बघ मैफल मैफल
गॅझेटचा रे नादच खुळा...
आता हो रे  सोशल..सोशल
ग्लोबल ग्लोबल बस्स झालं
हो रे थोडं लोकल.. लोकल

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846-8/10/18

Thursday 4 October 2018

Choice is yours

बसमध्ये खच्चून गर्दी असावी...आपण कसेतरी लटकत उभे असावे...कितीही प्रयत्न केला तरी बसायला जागा मिळू नये...संपूर्ण प्रवासात सीट शोधण्यातच वेळ जावा...आणि आता प्रवास संपता संपता चांगली विंडोसीट मिळावी..म्हणजे सीट मिळाली याचा आनंद मानावा की प्रवास संपत आल्याचा ....हेच कळेनासं होतं.. तसंच आयुष्याचं असतं नाही का!... ज्या गोष्टीमागे धावण्यात जिंदगी जाते ती गोष्ट आयुष्याच्या संध्याकाळी व्यर्थ वाटू लागते..मोठ्या आनंदामागे धावता धावता...छोटे आनंद निसटत जातात.. सत्ता , संपत्ती , आणि सौन्दर्य या स'कारामागे धावता धावता "सादगी"तला सकार हरवून जातो..मग आयुष्याचा उत्तररंग बेरंग होतो....जन्माला येऊन आपण साध्य काय केलं?? हेच कळेनासे होते...सतत उच्चतेचा ध्यास घेतलेल्या माणसाची अवस्था पिरॅमिडच्या टोकावरच्या एक आणि एकच बिंदूसारखी होते..एकाकी..ना कोणाची साथ ना कोणाची सोबत...त्यापेक्षा पिरॅमिडच्या तळातले बिंदू सगळे ताण सहन करू शकतात..कारण ते एकटे नसतात...येणारा प्रत्येक क्षण तुमच्यापुढे choice ठेवत असतो...कसं जगायचं ते रडत रडत की गाणे म्हणत... Choice is yours....

©प्रशांत शशिकांत शेलटकर
      8600583846/         
      04-10- 2018

Wednesday 3 October 2018

आभाळमाया

आभाळमाया

अथांग आभाळाशी
एकदा बोललो मी
थांग तुझा का मज
लागत नाही....
उत्तरोनी आभाळ सांगे
काय सांगू बाळा मजसवे
बोलावयास कोणी नाही..

तुम्ही लेकरे या धरेची
ही धरा जरी माझी पत्नी असे
इतुकी गुंतली लेकरांत की
मजकडे तीचे लक्षच  नाही...
काय सांगू बाळा मजसवे
बोलावयास कोणी नाही..

जरी लेकरे आम्ही या धरेची
संकटात येते आठवण बापाची
तुझ्याकडेच हात पसरतो बापा
जाणतो तुझ्यात वसती देवाची
आनंदास मग आभाळाच्या
पारावार तो उरला नाही...
मेघांच्या सरी उतरल्या मग
धरतीच्या  गहिऱ्या डोही
.
.
.
.

थांग बापाच्या मनाचा
कोणालाच लागत नाही
बापाची आभाळमाया
कधी कोणालाच उमगत नाही

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846
  04/10/2018-©

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...