Ad

Saturday 30 January 2021

विडंबन-नसतेस घरी तू..

संदीप खरे यांच्या 
नसतेस घरीं तू जेव्हा 

या कवितेचे विडंबन

अर्थात त्यांची क्षमा मागून

🙏🏻




नसतेच रेंज ती तेव्हा
जीव तुटका तुटका होतो
सगळेच तुटती धागे
सर्वांशी खटका उडतो

जीव सोडून प्रेत पडावे
मोबाईल तसाच पडतो
ही मती दिशाहीन होते
अन डोक्याचा खोका होतो

येतात मेसेज कुणाचे
हिरमुसून जाती मागे
क्लिक करता व्हिडिओ वरती
तो गोल गोलच फिरतो

तू रेंजमध्ये असताना
मज स्मरती  गोडगप्पा
चॅटिंगविण जीव झुरावा
मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय
सांगू माझ्या ग बॉसला
बिनपाण्याने नेहमीच
तो माझी हजामत करतो

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Monday 25 January 2021

शितल जोशी

नितनवे हास्य तुझे
अन डोळे किती बोलके
जपून ठेव असेट तुझा
हे सांगणे तुला ग सखे

गळ्यात तुझ्या पेरला
गोडवा ग साखरेचा
जपून ठेव आवाज तुझा
आनंदे दे ऐकण्याचा

खिलव आम्हा व्यंजने
भिन्न भिन्न प्रदेशांची
अन्नपूर्णाच तू वेगळी
कर तृप्ती रसनेची

निरागसपण जप तुझे
विनंती तुला मित्राची
दुर्मिळ फारच झाली ग
माणसे सखे तुझ्या सारखी

😃😃😃😃

Friday 22 January 2021

भूमिका

भूमिका

सर्व काही असताना
काही तरी हरवलंय
खळखळून हसताना
काहीतरी  सलतय

समजूत काढते माझी मी
किती किती सुखी आहे
पण भांगेत सिंदूर भरताना
त्याची खूप आठवण येतेय

गाडी बंगला नोकर चाकर
सार काही आहे दिमतीला
पण सांगू का ग मैत्रिणी ,
तोच नाही ग संगतीला...

हळवे कातर लोभस क्षण
कधीच बरे निघून गेले
जाताना आठवणींचे चार थेंब
डोळ्यात मात्र  ठेऊन गेले

रडताच येत नाही आजकाल
पापण्या फक्त भिजतात
वेळी अवेळी गळयात मात्र
हुंदके दाटून येतात...

अजून ओली हळद माझी
कळत नाही ग त्याला
रंग लाजऱ्या मेहंदीचा
अजून कुठे विरला?

जगणे कसले ग हे?
मी फक्त अभिनय करते
माझी मी राहिले कुठे?
मी भूमिका फक्त करते

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Friday 15 January 2021

मनगुज

मनगुज...


एक असावं असं काहीतरी
तुझ्या आणि माझ्यात
नात्याला त्या नावच नसावे
 तुझ्या आणि माझ्यात

सांगावे तुलाच सर्व काही
 येते माझ्या मनात
सांगतानाही भान असावे
चर्चा नको जनात

अवेळी पावसाची
अवेळीच रुजवात
बंड वाटे करावे असे 
तरी भय दाटे मनात

रुढींची क्रूर वादळे
तरी तेवते फुलवात
 एक ओंजळ असावी
वादळ आणि वाऱ्यात

पार्थिवाचे कौतुक कितपत
तरी देहाचा झंझावात
सुगंध पेरून विझून जाते
अत्तर दिव्यांची वात..

जे न सापडे कधी कुठे
सापडते ते ग तुझ्यात 
तेच सांगावे असे वाटते
अलगद तुझ्या कानात

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Monday 11 January 2021

ओझे

ओझे


कधी कधी चढते मला
अध्यात्माची धुंदी
बसतो पाडत वेळोवेळी
शब्दांचीच बुंदी

दिवस रात्र तोंडात माझ्या
हरी हरी आणि हरी
सुटत नाही तिळमात्रही
मोह माया जरी

कित्येक ग्रंथ वाचले अन
कित्येक केली पारायणे
जप तप असंख्य केले
अन असंख्य तीर्थाटने..

तरी न झाले मन हे शांत
झाली ना चित्तशुद्धी
नुसतेच झाले कर्मकांड
अजून ना स्थिरबुद्धि

वाचून वाचून पोपट झालो
करतो शब्दांचे खेळ
अनुभूती तर कसलीच नाही
कशाचा कशाला ना मेळ

शब्दांची वाजवतो पुंगी
गर्दीचा मग नाग डोलतो
वाटते येड्या लोकांना
याच्या तोंडून देव बोलतो

अध्यात्माचे ओझे आता
फेकून देईन म्हणतो
चार चौघांसारखे साधे सरळ
जगून घेईन म्हणतो


-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

Sunday 10 January 2021

एक क्षण

एक क्षण...


एक धागा हवा
विस्कटलेले बांधायला
एक मैत्रीण हवी
मी आहे ना म्हणायला

एक पणती हवी
अंधार दूर करायला
एक श्रद्धा हवी
कधीतरी झुकायला

एक खांदा हवा
मनमोकळं रडायला
एक मित्र हवा
दिलखुलास हसवायला

एक ओंजळ हवी
प्राजक्ताने भरायला
एक थेंब हवा
तहान थोडी भागवायला

एक सूर हवा
मैफल सारी सजवायला
एक साद हवीच
प्रतिसाद द्यायला

एक क्षण हवा
मोकळा श्वास घ्यायला
एक देव हवा
सगळं सगळं सांगायला

-प्रशांत शेलटकर
8600583846




Saturday 9 January 2021

श्रद्धांजली

भंडारा जिल्ह्यांतील अग्नितांडवात, मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांसाठी .....


वेदनेचे काव्य
काव्यातील वेदना
कशा गोठून गेल्या
आज साऱ्या संवेदना

जो आला जन्माला
तो जाणारच आहे
पण जाण्याचे हे
वय का सांगा आहे?

देवा तुझ्यावरचा
विश्वास हटतो आहे
जोडताना हात तुला
आज कापतो आहे

कसले तर्क लावू
कसले रे अनुमान
थरारून गेले देवा
आज रे स्मशान

अकालीच झाले
कळ्यांचे निर्माल्य
उरे अंती एकच
उरात एक शल्य...

तुझ्या अस्तित्वाचा
कसा धरू भरवसा
तुझ्या पुढे आता
कसा पसरू पसा

जा बाळांनो जा
अभागीच आम्ही
देवघरीच गेलात
असेच म्हणू आम्ही

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Friday 1 January 2021

खरं-खरं, बरं-बरं

कसक

एक अनामिक कसक
काळजात रुतून आहे
इतके चाललो आपण
मंजिल अजून दूर आहे

इतके जवळ आलो तरी
दुरावा अद्याप आहे..
अजूनही नजरेत तुझ्या
मी अनोळखीच आहे

डोळ्यात माझ्या कधीच
आभाळ भरून आलेले
पण डोळ्यात तुझ्या ग
वैशाख तोच आहे...

वाटते अंतर दोघातले
अलगद मिटून जावे.
पण वाटते अपूर्णतेचा
मज शाप निरंतर आहे..

सोबत उन्हाचीच होती
तेच एक बरे होते...
स्वप्न श्रावण सरीचे
आता विरल होत आहे..

आता उन्हाच्या छत्रीवर
मी ऊन झेलतो आहे..
अन उन्हाला उन्हाचेच
अर्ध्य देतो आहे......

-प्रशांत शेलटकर
 8600583846

कसक

कसक

एक अनामिक कसक
काळजात रुतून आहे
इतके चाललो आपण
मंजिल अजून दूर आहे

इतके जवळ आलो तरी
दुरावा अद्याप आहे..
अजूनही नजरेत तुझ्या
मी अनोळखीच आहे

डोळ्यात माझ्या कधीच
आभाळ भरून आलेले
पण डोळ्यात तुझ्या ग
वैशाख तोच आहे...

वाटते अंतर दोघातले
अलगद मिटून जावे.
पण वाटते अपूर्णतेचा
मज शाप निरंतर आहे..

सोबत उन्हाचीच होती
तेच एक बरे होते...
स्वप्न श्रावण सरीचे
आता विरल होत आहे..

आता उन्हाच्या छत्रीवर
मी ऊन झेलतो आहे..
अन उन्हाला उन्हाचेच
अर्ध्य देतो आहे......

-प्रशांत शेलटकर
 8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...