Ad

Saturday, 18 May 2019

मेहंदी

मेहंदी रंगावी ना..
तशी तू रंगत जातेस
फरक इतकाच की
मेहंदी हातावर अन तू...

जाऊदे सर्वच नसतं सांगायचं
थोडं असतं राखायचं...
जी आवडते ना..
तिलाच खोलवर जपायचं..

इतकं खोलवर की कधी,
स्वतःलाच समजून येऊ नये..
कधी काळी पुस्तकात जपलेलं
एखाद पिंपळपान...

मग एखाद्या ओल्या क्षणी
अलगद उघडावे पुस्तक
आणि अवचित समोर यावं
जपलेलं पिंपळपान...

तू तशी अवचितच येतेस
कधी समक्ष कधी असमक्ष
ती तशी आलीस की,
फुलून येतो गुलमोहोर...
अन चाफाही गंधाळतो...

तुला कळतोय ना तो
फुललेला गुलमोहर...
अन धुंद करतोय ना तुलाही
तो मत्त गंधाळलेला चाफा...

बस्स इतकंच,
आणखी काय हवं अजून
प्रत्येकवेळी यायलाच हवं का
शब्दांनी सजून ?

मौन बोलके होते तेव्हा,
शब्द मौनात जातात..
आणि ते मौनात गेले तरच
सुरवंटांची फुलपाखरे होतात..

तुला हे कळतंय ना ,
मनात मी झिरपतोय ना..
कुठेतरी तुझ्या मनातही
एक मोगरा फुलतोय ना...

असला तर असू दे
नसला तर नसु दे
पण तुझ्यासाठी काळजात
एक दिवा लावू दे..

कारण....

मेहंदी रंगावी ना..
तशी तू रंगत जातेस
फरक इतकाच की
मेहंदी हातावर अन तू...
काळजात.....

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...