Ad

Thursday 29 February 2024

सोहम

सो s हम...

चिकित्सेच्या द्रवात 
खितपत पडलेला मेंदू
अंमळ हृदयात उतरला
तेव्हा कुठे त्याला उमगलं
जग वेगळं आहे...
फोटो सिंथेसिसच्या पलीकडे
पानापानात काहीतरी आहे
चंद्र नव्हे केवळ निर्जीव गोळा
त्यातही काही वेगळं आहे..
एक अधिक एक दोन
केवळ गणितात..
गणिताच्या पलीकडे
काहीतरी वेगळे आहे
चिकित्सेत बुचकाळलेले तर्कशास्त्र 
नसते केवळ सत्य
मानवी मितीच्या पलीकडे
काहीतरी वेगळे आहे..

चिकित्सेच्या द्रवात 
शिल्लक राहिलेला
उरला सुरला मेंदू
जेव्हा हृदयात पूर्ण परतला
तेव्हा त्याला कळलं की
वेगळे वेगळे अस काही नाहीचेय
तो तेच आहे ते तोच आहे..
तो तेच आहे ते तोच आहे..
सो s हम ..सो s हम...

-- प्रशांत शेलटकर ©

Saturday 24 February 2024

परी...

परी...

काल माझ्या स्वप्नात 
आली एक परी
नव्हती वाटत खरी
पण वाटत होती बरी

पंख नव्हते तिला
ती आली नाही उडत
दोन पिशव्या हातामध्ये
होती घेऊन चालत..

मागून मागून अंतर ठेवून
मी मंद चालत होतो
थांबली जर का ती
मी ही उगाच थांबत होतो

मागून इतकी सुंदर
तर पुढून कशी असेल?
गालावर तिच्या गुलाबी
बट खेळत असेल?

कल्पनेचे इमले बांधत 
मी चाललो होतो..
वय विसरून खरेखुरे
मी निम्मा झालो होतो

चालता चालता अचानक
ती किंचित थबकली
थोडा विचार करून
ती एकदम मागे वळली

" अरे माझ्या देवा...'"
नकळत बोलून गेलो
भान विसरून सगळे
मी पाहत राहिलो

चेहरा निरखून पाहिला
तर ती बायको होती
प्रश्न चेहऱ्यावरचे माझ्या
ती अधीर वाचत होती...

" ह्या पिशव्या घ्या आता
शोधते कधीची मी मघापास्नं
भर दिवसा चालताचालता
कसली बघता हो स्वप्नं"?

विरून गेली स्वप्नातली
ती खोटी खोटी परी
स्वप्नातल्या परीपेक्षा
परी असते आपली खरी

-@ प्रशांत

Saturday 17 February 2024

म.गांधी #/-१

गांधी #१-

इतिहासात कोणत्या नेत्याने काय विधाने केली हे अभ्यासताना त्याचे मागचे-पुढचे संदर्भ आणि प्रसंग यांचा पण यथोचित अभ्यास केला पाहिजे.. नाहीतर गैरसमज होतात..
    उदा. कोणी एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा..हे महात्मा गांधींच्या नावावर खपवले जाते.. मूळ संदर्भ खालील प्रमाणे..

हरिजन यात्रेच्या वेळी एका सभेत गांधीजी म्हणाले , " सवर्णांनी हरीजनांवर (दलितांवर) एवढे अत्याचार केले आहेत की उद्या कोणी हरीजनाने माझ्या एका गालावर थप्पड मारली तर मी त्याच्या समोर दुसरा गाल पुढे केला तरी त्याचे परिमार्जन होणार नाही "..
    मुळात गांधी काय बोलले आणि त्याचा विपर्यास कसा केला गेला याचे हे उदाहरण आहे..

- # संदर्भ-मजबुती का नाम महात्मा गांधी- लेखक - चंद्रकांत झटाले..

- निवेदन -ही लेखांश मालिका उपरोक्त पुस्तकावर आधारित आहे. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाशी निगडित अनेक अनोळखी घटना तसेच आऊट ऑफ बॉक्स जाऊन जाणून घेलेलेले महात्मा गांधी , त्यांचे विषयी केलेला खोटा प्रसार  पुराव्यानिशी या पुस्तकात सादर केला आहे.मला ते आवडले ..इतरांना पण त्या विषयी माहिती व्हावी म्हणून गांधी नावाची लेखांश मालिका लिहायचा मानस आहे.ऐतिहासिक घटनांच्या संदर्भाने जातींचे उल्लेख येणे अपरिहार्य आहे. ते तसे येतील.इथे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नक्कीच नाही.गांधी जाऊन जवळपास पंचाहत्तर वर्षे झाली आहेत.त्यामुळे तत्कालीन घटनांचा संदर्भ आज लावू नये. सुष्ट आणि दुष्टपणा वृत्तीत असतो जातीत नसतो हे माझे ठाम मत आहे. हे पुस्तक तर्कनिष्ठ पद्धतीने लिहिले आहे म्हणून ते भावले.
      याबाबत मत -मतांतरे असू शकतात,सहमती-असहमती असू शकते. व्यक्त व्हायला काहीच हरकत नाही.नव्हे स्वागतच आहे.

-😊 प्रशांत शेलटकर 🙏🏻

Wednesday 14 February 2024

स्क्रिप्ट

स्क्रिप्ट...

@- आपले भविष्यातले प्लॅन्स करताना आपल्या भूतकाळाकडे नजर टाकली तर कधी कधी आपले प्लॅन्स हास्यास्पद ठरतात. भूतकाळात घडलेल्या घटना इतक्या अनाकलनीय असतात की आज विचार करता आपल्या आयुष्याचे स्क्रीप्ट आपण लिहीत नसून  आपण फक्त भूमिका करत आहोत हे लक्षात येते. 
     माझे आयुष्य मी या पद्धतीने जगेन असे आपण पूर्वी ठरवलेले असते, पण आज आपण जे जगतोय त्यात आपण ठरवलेल्या गोष्टी अगदीच नगण्य असतात. 
   छान आयुष्य जगायला गुणवत्ता लागतेच पण नशिबाची साथ लागतेच..नशीब हा शब्द ऐकला की लगेच दैववादी म्हणून शिक्का मारला जातो..पण आपल्या आयुष्यात आपल्याला भेटलेली बरी वाईट माणसे आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरतात.हे लक्षात घेतलं तर नशीब किती मॅटर करते ते कळून येईल
       अर्थात कोणती माणसे भेटावी हे आपल्या हातात नसते .पण तीच माणसे का भेटावीत हा एक गूढ प्रश्न आहे. आपल्या भूतकाळाकडे पाहिलं तर ही टर्निंग पॉइंट देणारी माणसे भेटली नसती तर आपण कुठे असतो हे प्रत्येक यशस्वी माणसाला विचारून बघा ..कधी ही माणसे शिक्षक असतील.. मित्र असतील ...माणसेच कशाला निर्जीव वस्तू पण आयुष्य बदलवतात.. पेपर वाचावा.. नोकरीची जाहिरात दिसावी..सहज अर्ज करावा आणि नोकरी लागावी असे योगायोग घडत नाहीत का?
    जुनी गोष्ट आहे..  माझ्या ओळखीचे एक काका आहेत..आता ते सैन्यातून कर्नल पदावरून निवृत्त झालेत.. तर त्यानी सांगितलेला किस्सा श्रवणीय आहे..शिक्षण पूर्ण झाल्यावर ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले..एके दिवशी सहज म्हणून कोल्हापूर ला फिरायला गेले ,तर तिकडे सैन्य भरतीचा कॅम्प लागला होता , बघ्यांची गर्दी होती , काका सुद्धा त्या बघ्यांच्या गर्दीत सामील झाले. काका उंचपूरे असल्याने त्या कॅम्प मधल्या अधिकाऱ्याचे त्यांचेकडे लक्ष गेले .त्याने सहज विचारले  ,काय येतोस का? काका म्हणाले हो..लगेच सर्व आवश्यक त्या चाचण्या झाल्या आणि काकांना तिथूनच ट्रेनिंग ला पाठवण्यात आले.घरच्या माणसांना त्यानी रेलवेतून पत्र लिहिले( त्यावेळी मोबाईल नव्हते)..
फिरायला म्हणून जावे काय आणि लष्करात भरती व्हावे काय..हे सगळं अनाकलनीय नाही का? योगायोग म्हंटल तर ते वैज्ञानीक दृष्टीने अयोग्य..किंवा विज्ञानाच्या पलीकडले..काकांना त्याच दिवशी कोल्हापूर जायची प्रेरणा कुठून मिळाली, कॅम्प पाहण्याची इच्छा का व्हावी.. हजारो माणसं असताना त्या लष्करी अधिकाऱ्याचे त्यांचेकडेच लक्ष का जावे? 
     आयुष्य अनप्रेडिक्ट आहे. ते गृहीत धरून प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात आहे. म्हणून तर गीतेत श्रीकृष्ण सांगून गेला की कर्म करीत रहा कर्मफळ  तुझ्या हातात नाही..वेगळया अर्थांने स्क्रीप्ट तुझ्या हातात आहे तू फक्त भूमिका करत रहा..

- प्रशांत शेलटकर

Sunday 11 February 2024

प्रयाण...

प्रयाण...

पुन्हा मी आलो तिथेच
जिथून सुरवात होती
वर्धमान झालो किती
तरी शून्यात अखेर होती

कल्पनेच्या फक्त भराऱ्या
पदरात फक्त निखारे..
ते ही विझून गेले 
आता कोळसेच सारे

जीव टांगणीला लागला
उगाचच मी झुरलो
नावारूपास अन्य आले
मी नावापुरताच उरलो

आता केवळ स्मृती माझी
ठेवतील क्वचित कोणी
पुसून टाकतील मला बघा
कोणी त्यांच्या मनातूनी

बंद करून घर हे
मी आता निघतो आहे
नसू दे ना सृहद कोणी
सावली तरी जवळ आहे

हे प्रयाण अपरिहार्य
जायचेच सर्व तोडोनी
नाहीतरी गेलेच पुढे
सोबती मला सोडोनी

- प्रशांत

Friday 2 February 2024

नारायण

नारायण...

पुलं ची एक नारायण नावाची कथा आहे..तो जो नारायण नावाचा कथानायक आहे तो सहृदय,उपकारी,लोकांची कामे स्वतःची समजून करणारा.एक गरीब मनुष्य आहे. मनुष्यात रमणारा मनुष्य आहे..
    एक लग्न ठरतं.. तिथे तसा काही संबंध नसताना ते आपल्या घरचेच लग्न असल्यासारखा तो राबतो..अगदी पत्रिका छापण्यापासून ,बस्ता खरेदी, ते अगदी पंगत वाढण्यापर्यंत सगळी कामे अगदी मनापासून करतो..पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरतो..आपला तसा काही संबंध नसताना परक्याचे लग्न अक्षरशः त्याच्या अंगात येते..
       सर्वांची कामे करत असल्यामुळे तो अर्थातच सगळ्यांचा लाडका बनतो लग्न होईपर्यंत त्या घरातील सर्व मंडळींचा तो अगदी गळ्यातील ताईत बनतो. भगिनीवर्ग तर सारखा नारायण...नारायण जप करत असतात..थोडक्यात त्याच्या वाचून सगळ्यांचेच अडत असते.आपल्यावाचून लोकांचे अडते ही भावना किती सुखदायक असते ना..मनातल्या खोल कप्प्यातला इगो त्यामुळे सुखावत असेल का? आणि तुझ्या वाचून माझे किती अडते रे अशी खोटी अगतिकता दाखवून स्वतःचे स्वार्थ पूर्ण करणारे पण असतील ना...? असो .... कथा पुलंची असल्याने त्या कथेला खास पुलं चा विनोदी टच आहे हे सांगायला नकोच..
     पण शेवट मात्र हृदय स्पर्शी आहे..दिवस भर दगदग करून मांडवातच आडवा झालेला नारायण एकटाच अंगाचे मुटकुळ करून झोपलेला असतो.. त्याच्याकडे आता कोणाचेच लक्ष नसते..त्याची उपयोगिता संपलेली असते..त्याची गरीब बायको त्याच्या उघड्या अंगावर  पांघरूण टाकते..कदाचित ती त्यावेळी खिन्न हसली असेल का?परिस्थिती ने व्यापलेली स्त्री खिन्न हसण्यापेक्षा दुसरं काय करू शकते म्हणा..पुलं पुढे लिहितात नारायणच्या बाजूलाच झोपलेल्या त्याच्या छोट्या मुलाच्या बाळ मुठीतला कळकट लाडू तसाच असतो...किती हृदयस्पर्शी आहे हे..डोळ्याच्या कडा ओल्या करणारे. 
     दिवस भर हिरो झालेला नारायण लग्न आटपल्यावर झिरो होतो, त्याच्या वाटयाला ना कौतुक ना स्तुती..आपला सुद्धा कधी तरी नारायण होतो..जो पर्यंत लोकांची कामे आपली म्हणून करतोय,लोकांच्या भावनेला जपतोय..तो पर्यंत आपलं कोण कौतुक असतं.. एकदा का स्वार्थ पूर्ण झाला की लोक अगदी छान दुर्लक्ष करतात.. त्यांच्या भाव विश्वातून अलगद बाजूला करतात..तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा त्यांच्यासाठी दिलेली असते त्याना मात्र आता तुमच्याकडे बोलायला आणि बघायला पण वेळ नसतो...थोडक्यात तुमचा नारायण झालेला असतो..अगदी दुर्लक्षित...

    - प्रशांत शेलटकर

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...