Ad

Saturday 25 June 2022

राजकारण

राजकारण...


राजकारणावर बोलायची
करू नका घाई...
कोण कोणाच्या कुशीत
सांगता येत नाही..

जिंकलो मी जिंकलो
कोणी ठोके आरोळी
दुसऱ्या क्षणी येते त्यावर
रडायची हो पाळी...

आपला तो बाब्या
दुसऱ्याचे ते कार्ट
बाकी सगळे मूर्ख
मी तेवढा स्मार्ट..

बिचारा खरच असतो का
सांगा पक्षाचा कार्यकर्ता
वाहत्या गंगेत अगदी कोरडा
थोडा तरी राहील का?

सेक्युलर तर नसतंच कोणी
ढोंगीपणाच हो सगळा
नेता असतो संधीसाधू
जणू नदीकाठचा बगळा

कोण कुठे कसा फुटला
यावर सगळ्या चर्चा
फुकट वेळ दवडू नको
आधी किराणा भर घरचा...

पंत गेले राव चढले
काय फरक पडला
सतरंजी उचलू उचलू
कार्यकर्ता मात्र सडला

पोटावर हात ज्यांचे
त्यानाच हे नसते उद्योग
हातावर पोट ज्यांचे
ते भोगती त्यांचेच भोग

मतदार म्हणे राजा आहे
लोकशाही की जय हो
राज्य मात्र त्याच्यावरच
असला कसला हा खेळ हो

म्हणून म्हणतो मित्रानो
चर्चा फुकाच्या थांबवा
मतदानाच्या दिवशी मात्र
हक्क आपला गाजवा..

दारात आली गाडी तर
सरळ नाही म्हणा..
एक दिवसाचे राजेपण
नकोच मला म्हणा.

उजाडेल केव्हातरी नक्की
विश्वास ठेवा पक्का
आधीच उघड करू नका 
आपला हुकमाचा एक्का

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Tuesday 21 June 2022

पुनरपि...

पुनरपि....

रात्रीचा एक वाजलाय... जीवन धारा हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरच्या आय सी यु मध्ये मी बेडवर ...सलाईन चालू आहे...रक्त चढवलं जातंय...समोरच्या भिंतीवरच कॅलेंडर वाऱ्याने फडफडतय...बाजूलाच घड्याळ आहे... एकची वेळ दाखवतेय ते...आणि तारीख 21 जून 2022

......

रक्ताची तिसरी बॉटल लावली गेलीय..डोके आणि डोळे जड झालेत...अंधुकसे आठवतंय..कालचा अपघात...गाडी स्लिप आणि मी फेकला गेलो..डोक्याला मार...कोणीतरी इथे दाखल केलंय... अजून शुद्धीत आहे मी...
समोरच्या भिंतीवरच कॅलेंडर वाऱ्याने  अजून फडफडतय...बाजूलाच घड्याळा ची टिक टिक चालू आहे..आता 4.30 झालेत ...आणि तारीख तीच  21 जून 2022...

........

आता श्वास लागलाय.. नाकाला ऑक्सिजन लावलाय...आजूबाजूला कसल्यातरी वेगवान हालचाली चालू आहेत..अगम्य वैद्यकीय भाषेतून डॉक्टर सूचना देत आहेत..मला कळत नाहीयेत त्या..डोळे जड झालेत..तरीही भिंतीवरचे घड्याळ दिसतय...वेळ समजतेय...सहा वाजून दहा मिनिटं झालीत..खिडक्यांची तावदाने थोडी उजळ झालीत.. आता उजाडेल अस वाटतय..

.....

खूप वेळ नजर घड्याळाकडेच लागलीय...तितकेच वाजलेत...मोठा काटा दहा वर...छोटा काटा सहावर... कॅलेंडर ची फडफड थांबलीय..तावदाने तशीच उजळलेली थोडीशीच... सगळंच फ्रीज झालंय... डॉक्टर आणि नर्सेस स्ट्याच्यु स्ट्याच्यु खेळतायत का??...
.....

आता फक्त घड्याळ दिसतंय..तीच वेळ सहा वाजून दहा मिनिटे...बाजूचे कॅलेंडर..21 जून 2022...

किती वेळ तीच तारीख तीच वेळ??? काळ फ्रीज झालाय की माझ्या जाणिवा फ्रीज झाल्यात..
ते भिंतीवरचे घड्याळ आणि ते कॅलेंडर..अनंत काळ तीच तारीख आणि तोच दिनांक दाखवणार का?

.....

आता काहीच आठवत नाहीये..
फक्त ते घड्याळ आणि ते कॅलेंडर...बस्स सगळ्या मिती एक झाल्यात...लांबी...रुंदी ...उंची विलय झालाय केव्हाच..आता मी आइन्स्टाइनच्या चौथ्या मितीच्याही पलीकडे ....काळाच्या ही पलीकडे...घड्याळ अंधुक होत जातंय..
....
हा भास की स्वप्न..की कालातीत अनुभव..की हा प्रकाशवेग..इकडे तिकडे सगळीकडेच मी आहे...एकाच वेळी सूक्ष्म एकाच वेळी भव्य..देहाची काही गरजच नाहीये...अगदी शिवोहं अवस्था.. जाणीव आहे आणि नाहीही...अंधार आणि प्रकाश सत्य काय? एकाचा विलय की दुसऱ्याचा उदय...दोन्ही सत्य की दोन्ही असत्य...

......

चल परत...एक अनाहत नाद..
......

भिंतीवरच घड्याळ बदललेलं..त्याची डिझाइन बदललेली.. त्याची टिकटिक ऐकू येतेय...चक्क काटे फिरत आहेत..आठ वाजून सहा मिनिटे झालीत..खिडक्या आता  लख्ख उजळल्यात... स्ट्याच्यु झालेले डॉक्टर आणि नर्सेसचे पुतळे प्राण भरल्यासारखे हळू लागलेत ...त्यांचे चेहरे उजळेत..मला आता अगदी फ्रेश वाटतय...इतकं फ्रेश की जणू मी नवीन जन्मच घेतलाय.. सगळं काही नवं नवं...समोरच्या भिंतीवरचे कॅलेंडर पण अगदी नवं..तारीखही नवीन...01 मार्च 2036....
      सगळं काही नवं...मी नवा आणि मला कुशीत घेणारी माझी आईही नवीनच....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Saturday 18 June 2022

आसक्त

आसक्त..

विरक्तीचा भास सगळा
विकार हेच सत्य प्रखर
वरवरची शांती सगळी
कसा शमावा अंतस्थ कहर

म्हणे वासना सोडून द्यावी
देहात असता कसे हे शक्य
जळाविणा मासोळी असणे
केवळ केवळ असते अशक्य

सम-भोग हीच समाधी
जिवा-शिवाचे हेच मिलन
विस्मरणात कसे धाडावे
परम सुखाचे ते उत्कट क्षण

देह निर्मिले त्यानेच वेगळे
अन पेरले त्यात आकर्षण
खेळ सृजनाचा होतो सुरू
का टाळावे ते मोहक क्षण

देहात मिसळतो देह जेव्हा
तीच खरी अदभुत समाधी
विखरून जातो अहं सारा
विसरून जातो साऱ्या उपाधी

ध्यानात तरी काय वेगळे  
शरीर केवळ साक्षी उरते
संभोगाच्या उत्कट क्षणी
स्वतःचेच ना भानही उरते

नकार देत देहसुखाला
कसे व्हावे विरक्त कोणी
अतृप्त मनाने कशी गावी
मोक्षाची ती पोकळ गाणी

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Thursday 9 June 2022

सारे प्रवासी घडीचे

सारे प्रवासी घडीचे...

मजल दरमजल करीत
बस अशी चालली
कधी वळणे अवघड
कधी निवांत चालली

सारे प्रवासी घडीचे
मुक्काम सर्व ठरलेले
तिकीट काढले तेव्हाच
थांबे तेव्हांच ठरलेले

शीणलेले प्रवासी देती
जांभई ती कंटाळलेली
कुणी उभे कुणी बसलेले
तरी मंडळी कावलेली

कुणी बसलेले  निवांत
तरी ते वैतागलेले
कुणी उभेच तरीही
शिळ घालीत राहिलेले

पण मी उभाच कधीचा
शोधतो बसण्यास जागा
उभ्या उभ्याच करतो मी
 किती तो  मनात त्रागा

सगळा प्रवास उभ्यानेच
शेवटी  विंडो मिळाली
अन तेव्हा कळले मला
बस स्थानकात शिरली

आता उतरण्याचीच घाई
घ्या रे वळकटी आपली
संपला प्रवासच सगळा
आता कसली ती नवलाई

टाकून एक सुस्कारा
आता इंजिन बंद होईल
उतरून जातील सारे
मग सर्व शांत होईल

निमून कोलाहल सारा
मी आता मौनात गेलो
जन्म-मरण नकोच आता
मी शून्यात गेलो...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

Thursday 2 June 2022

मिरगातला कवी

मिरगातला कवी😌

म्हणावा तसा पाऊस
अजूनही पडत नाही
पेन घेऊन बसलो तर
काही केल्या सुचत नाही

कसे सुचेल तुम्हीच सांगा
लाईट जातो सारखा
सुखद गार झोपेलाही
कवी होतो पारखा...

रात्रभर डासांची मग
सुरू राहते पिपाणी
डास मारता मारता सांगा
कशी सुचावी गंमत गाणी

धुंद कसली हो कुंद ही हवा
कवी असा घामेजलेला
कवीच कशाला पेनही त्याचा
घामाने अस्सा  भिजलेला

थोडं थांब मित्रा अरे
आता येईल पाऊस
कळ थोडी काढ आता
नको कोठे जाऊस

झर झर झर झरतील धारा
ढगांच्या मग झारीतून
सुचतील मग कशाही कल्पना
कवीच्या भिजल्या मनातून

फुलवून प्रतिभेचा पिसारा
मोर नाचेल मग कविचा..
पागोळी पडतात जिथे
भास होईल त्या मोदकांचा

कुणा "एक्स"च्या आठवणींनी
कवी होईल मग बेजार
पाऊस नव्हे, तिच्या डोळ्यांना
लागली आहे म्हणेल धार

पाऊस नको कविता आवर
असेच म्हणाल तुम्ही..
न वाचताच कविता त्याची
स्क्रोल कराल तुम्ही...

सबुर करा मित्रांनो
पाऊस येईल आणि जाईल
आषाढ सुरू होताच 
कविता मग वाहून जाईल...

रोजच पाऊस रोजच चिखल
जगणे होईल मग नकोसे
धो धो वाहून जातील कवीचे
ते दर्द भरे उसासे

इथे फार गळते हो
काही तरी ओ करा ना
कवीच्या मागे त्याची बायको 
रोजच करील मग ठणाणा

मग मिटून वही अन पेन
कवी येईल माणसांत
तुमची आमची सुटका होईल
त्या ओल्या क्षणांत

- प्रशांत शेलटकर
  8600583846

स्क्रिप्टेड लाईफ...

स्क्रिप्टेड लाईफ...     कधी निवांत क्षणी मागे वळून पाहिलं तर कळतं.. की काही माणसं आपल्या आयुष्यात का आली आणि का निघून गेली याची काही टोटल ला...