कोणी अचानक गेलं तर भीती वाटते. मन कार्यकारण भाव शोधायला जाते..त्याला डायबेटीस होता,त्याला हार्ट प्रॉब्लेम होता वगैरे वगैरे..मग हे प्रॉब्लेम आपल्याला नसले की थोडं हायस वाटत..किती वेडेपणा ना? माणसाला वाटत आपण खूप उशिरा मरणार.. अजून वेळ आहे...पण कुठला श्वास शेवटचा असेल हे कोणी सांगितलंय?
खरं तर जन्माला आल्यापासूनच आपल्याला "गृहीत धरण्याची" सवय लागलेली असते. माणसं, परिस्थिती सर्व काही गृहीत धरतो. हे गृहीत धरण म्हणजे खर तर आपणच आपल्याला दिलेला दिलासा असतो, अनिश्चितता हेच निश्चित असण्याच्या जगात असे दिलासे खूप महत्वाचे असतात.
आपल्या व्यक्तीगत आयुष्याचा एक ईसीजी असतो.त्यात थोडे फार व्हेरीएशन्सच असायचेच..पण त्यात अबनॉर्मल चेंजेस आले की आपण अस्वस्थ होतो. कुणाच्या अचानक जाण्याने आपल्या जगण्याच्या ईसीजी मध्ये हे अबनॉर्मल चेंजेस येतात.
कुणाच्या अचानक जाण्याचे दुःख असतेच पण त्याहून त्याचे ते जाणे आपल्या जगण्यातील अनिश्चितता अधोरेखित करते हे जास्त खरे..तो अचानक गेला उद्या माझ्याबाबतीतही हे "अचानक जाणे "असू शकते ही भावना व्यक्तीला भयग्रस्त करते. मग दिलासा म्हणून त्या व्यक्तीच्या जाण्याची कारणे शोधण्याची प्रवृत्ती असते.
अस अस झालं म्हणून तो गेला, किंवा असे असे आजार होते म्हणून गेला..हे किंचित दिलासे म्हणजे मनावरचा ताण कमी करायचे उपाय असतात..खर तर ते भ्रमच असतात..कारण मृत्यूपासून बचाव करण्यासाठी सर्व तो कडेकोट बंदोबस्त करणाऱ्या परीक्षितला तक्षकाने फळा मध्ये अळीचे रूप घेऊन शेवटी मारलेच ना..
वरच्याचा कॉल आला की बस्स निघायचं...
माझ्यापुरता किंचित दिलासा...
पुनरपि जननं,पुनरपि मरणं
पुनरपि जननी जठरे शयनं...
-प्रशांत शेलटकर
8600583846