अनाहत...
शांत एकटे झाड उभे
शांत डोहाच्या काठावर
शांत मीही एकटा उभा
शांत डोहाच्या काठावर
किंचितही ना तरंग उठे
शांत डोहाच्या पाण्यावर
कुणी न पक्षी जरा किलबिले
शांत एकट्या त्या झाडावर
पानांची ना कसली सळसळ
शांत एकट्या त्या झाडावर
लाटांची ना कसली खळबळ
शांत शांत त्या पाण्यावर
आत्ममग्न ते झाड पाहते
बिंब त्यांचे त्या पाण्यावर
आत्ममग्न मी ही पाहतो
प्रतिबिंब माझे त्या पाण्यावर
खळबळ सारी विरून गेली
एक समाधी तरंगे जलावर
देह जाणिवा स्तब्ध जाहल्या
तनामनाचा पडला विसर..
सोस जगण्याचे विरून गेले
शांत तळ्याच्या त्या काठावर
भय मरणाचे सरून गेले
शांत तळ्याच्या त्या काठावर
शांत एकट्या झाडाखाली
बासरीचे सूर अवचित
शांत शांत मग पाण्यावरती
तरंग उमटले ते किंचित
एक अनाहत नाद राहिला
भरून साऱ्या आसमंतात
मुक्त पावलो असे वाटले
त्या अदभुत निमिषार्धात
स्वप्न पहाटे पहाटे मज
पडले मनोरम असे
त्या अनाहत नादाचे
मज लागले भारी पिसे
-✍️ प्रशांत शेलटकर ( हळक्षज्ञ)
8600583846
No comments:
Post a Comment