Ad

Friday, 7 May 2021

टक्कल

टक्कल

संपलं कुठे कपाळ
त्याचा थांग लागत नाही
पाडू पाडू म्हणतो ,
पण भांग पडत नाही...

कधी होते घनदाट
आज सांगावे लागते
आठवणीत गत वैभवाच्या
आज जगावे लागते..

का गेले? कसे गेले?
काहीच  कळत नाही
टकलावरून नजर मात्र
कुणाचीच ढळत नाही

कुणी म्हणाले डोक्यावरती
खोबरेल तेल घाला
कुणी म्हणाले टकलावरती
ठेचून कांदा लावा

टोपीमुळे केस जातात
कुणी दिला सल्ला
सल्ल्याचाच माझ्यावर हो
किती झाला हल्ला

वाया गेलेल्या पोरासारखे
सल्ले  वाया गेले..
किरकोळ जायचे पूर्वी
आता घाऊक घाऊक गेले

भांग पाडताना आजकाल
फणी देखील लाजते
एवढ्याचसाठी फिरणं बाई
परवडत नाही म्हणते...

मी म्हणालो गेलीस उडत
गरजच तुझी नाही
तुझी देखील चैन करणे
मला परवडत नाही

डोक्यावरचे चार दोन
आता मस्त जपतो आहे
केस कटिंग चे पैसे आता
सेव्हिंगला टाकतो आहे

कुणी म्हणते केस जाता
मिळतो पैसे बक्कळ
म्हणून आता चार चौघात
मिरवतो माझे टक्कल

🪶
-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...