शब्दांची गंमत...
अक्षरांची अर्थपूर्ण रचना म्हणजे शब्द..पण त्याही पलीकडे शब्दांना सजीवपणा असतो..शब्द बोलतात....रागावतात.... हट्ट करतात...लाडात येतात ...रुसून बसतात..शब्द आपल्या शरीर भाषेशी संलग्न असतात..आपल्या भावनेप्रमाणे शब्दांच्या रचनाही बदलतात.. काही शब्द स्रीरुप घेतात काही खास पुरुषी होतात..विशेष करून नांवाचे टोपण नाव होताना अस हटकून होत..प्रकाशच पक्या होत..सुनीलच सुन्या होत..अनंत च अन्या होत..सगळ्यांचे उच्चार आकारांती आहेत ..खास पुरषी मोकळे पणा आहे त्यात..ओठांची हालचाल पूर्ण मोकळी...उलट स्त्रियांची नावे प्रीती,शशी,भक्ती अशी इकारांती असतात ओठांची हालचाल मर्यादित.. आकारांती पण असतात जसे संपदा,हर्षदा,सुलभा,श्वेता, अमृता पण त्यातला आ हा मर्यादेने बांधलेला असतो..पक्या ..सुन्या पम्या यातला आ हा जास्त रांगडा असतो..
प्रेम आणि वात्सल्य दाखवणारे बहुतेक शब्द उकारांती असतात जसे सोनू,बाबू,मिलू, शितु, जानू, पिलू ...चुंबन घेताना दोन्ही ओठांचा चंबू होतो..हे शब्द उच्चारताना पण ओठांचा चंबू होतो...हे सगळे शब्द पडदाशीन असतात..आई आणि मुलाचे प्रेम हे त्या दोघांचे विश्व असते..त्यामुळे घास भरवताना आई म्हणते बाबू आता मोठा आ कलायचा हा..तेव्हा आईचा देखील न कळत आ होतो..हे नातंच असत अस..एकमेकांत रुजलेल
काही शब्द डोळ्यात। बघून बोलायचे असतात...जसे सोनूल्या,पिलू,बाबू ...विशेष म्हणजे सोनाच शोना झालं की ते शब्द कानातच हळुवार बोलायचे असतात..
पण एका शब्दाची उत्पत्ती काही समजत नाही..तो म्हणजे इश्श ...हल्ली फार दुर्मिळ झालाय... खरं म्हणजे तो स्वतंत्र शब्द नाही तो एक सलज्ज प्रतिसाद आहे...त्यासाठी साद देखील तशीच नाजूक असावी लागते...तिथे धसमूसळेपणा झाला की इश्श च इस्स व्हायला लागत नाही...आणि ते झालं की इस्कोट व्हायला वेळ लागत नाही...बाय द वे मला इस्कोट या शब्दाची उत्पत्ती अजून लागली नाही...तुम्हाला लागलीय का?
☺️☺️☺️☺️☺️
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment