पुराण कथा वाईट नसतात,त्यातला सदुपदेश महत्वाचा असतो.नव्या पिढीला त्या भाकड कथा वाटतात. वाटणारच, कारण त्या लॉजीकली पटत नाहीत. आजची पिढी प्रश्न विचारणारी आहे.तिला तिच्या कलाने समजून सांगावे लागते.
देवबाप्पा येईल आणि कान कापील हे ऐकून घेणारी ही पिढी नाही.म्हणून मुळात पालकांना पुराण कथांमधील मर्म कळलं पाहिजे. पुराण कथा इतिहास म्हणून सांगू नये.त्या दृष्टांत कथाच असतात. कथेच्या माध्यमातून जीवन मूल्य रुजवणाऱ्या या कथा मुलांपर्यंत त्यांना पटेल अशा पध्दतीने गेल्या तर मुलं ऐकून घेतात.
मुळात लक्ष वेधून घेण्यासाठी, मनोरंजनाचा मसाला वापरून जीवन मूल्य रुजवण्यासाठी पुराण कथांची निर्मिती झाली.लहानवयात कथा ऐकताना मन त्या कथांमधील चमत्काराकडे आकर्षित होत असले तरी प्रौढवयात त्यातील मूल्य लक्षात राहतात हे त्या पुराण कथांचे यश म्हणावे लागेल.
प्रामाणिकपणा,खरे बोलणे,गरिबीला न लाजणे, दान करणे, शिक्षण घेणे, याचे अनौपचारिक शिक्षण या पुराणकथा देत असत.मूल्यशिक्षण देण्याचे मध्यम म्हणून पुराणकथा काम करत होत्या. आजच्या पिढीचे ते माध्यम वेगळे असू शकते.आजची पिढी स्मार्ट आहे.कदाचित तिला या कथांची गरजच लागणार नाही.तुम्ही सांगायला गेलात तर ती प्रश्न विचारून तुम्हाला हैराण करेल.त्याची उत्तर तुमच्याकडे असतीलच असे नाही, अशावेळी मूल्य शिक्षणाचे माध्यम हे तुम्ही स्वतः असू शकता, शेवटी मूल तुम्हालाच फॉलो करत असते.
पुराणातील वांगी पुराणात म्हणायची पद्धत असली तर मुळात तो शब्द वांगी असा नसून वानगी असा आहे.वानगी म्हणजे उदाहरण ,दाखला, जेव्हा आयुष्यात प्रश्न उभे राहतात तेव्हा पुरांकथामधील नायक कसे वागले होते याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन त्या प्रमाणे वागणे म्हणजे पुराणातील वानगी, या वानगी चे वांगी होऊन त्याचे भरीत कधी झाले ते कळलेच नाही.
कालाय तस्मै नमः
-प्रशांत शेलटकर
8600583846