Ad

Monday, 26 April 2021

अलगद तिचे होते गाणे...

अनुस्वाराचे कुंकू  भाळी
अन वेलांटीचा घेऊन पदर
कविता माझी लाजवंती
रसिक पुढे होते सादर

वृत्ताची नेसली पैठणी
छंदाची घातली चोळी
अवतरणाची माळ साजिरी
तरी बिचारी साधी भोळी

प्रश्नचिन्हांचे कुंडल कानी
उदगाराचा छल्ला कटी
पूर्णविरामाचा तीळ शोभतो
तिच्या मदन मस्त ओठी

गण मात्रांनी जरी बांधली
डोळ्यात तिच्या मुक्तछंद
खानदानी चाल तिची
कडव्या कडव्यात झाली बंद

शब्दफुलांचा माळून गजरा
कविता माझी अशी लाजते
मिठीत येता येता सुरांच्या
अलगद तिचे गाणे होते
अलगद तिचे गाणे होते

-प्रशांत शेलटकर
 8600583846






No comments:

Post a Comment

मित्राचे अध्यात्म

परवा जाता जाता रस्त्यात भेटला एक मित्र वरती बोट करून म्हणाला तिथूनच हलतात सूत्र... बायका ,पोरे ,मित्र वगैरे सगळी आहे माया  असेल तुझ्याजवळ का...