अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
उगाच का लावतोस
अक्कलेचा दिवा..
कळतेच सर्व तुला
आव उगा का आणतो
पितळेला उगाच का
भाव सोन्याचा देतो
का चालला तू असा
जिथे नेईल हवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
इथे पूर्ण सत्य
ना कधी कुणा कळले
तरी वाटते तुला
सर्व तुलाच कळले
क्षणभर देई रे
तुझ्या मनाला विसावा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
कुणी भलतेच काही
पुस्तकात लिहितो
कुणी फेसबुकीं
काही पोस्टून जातो
कुणी देतो रे
निखाऱ्याना हवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
आंधळी निष्ठा रे
कुणावर नसावी
आपली आपणाशी
बुद्धी स्वतंत्र असावी
मनाच्या गुलामीला
ना कसलीही दवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
आज काल आदरणीय
कुणी राहिले नाही
आज काल स्पृहणीय
काही राहिले नाही
देवही आजकाल
करतो देवाचाच धावा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
नेते आज जे बोलले
ते आजच विरून जाते
भांडणाला कार्यकर्त्यांना
फक्त निमित्त मिळते
लबाड नेत्यांचा रे
ओळख कुटील कावा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
मतां मतांच्या लोंढ्यात
असा वाहून जाऊ नको
बुद्धीचा काठ कधी
सोडूच नको.
कळेना ना कुणाची
कधी पालटेल हवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
अरे थांबना ,
माझ्या लाडक्या जीवा
उगाच का लावतोस
अक्कलेचा दिवा..
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment