Ad

Sunday, 28 March 2021

आठवणीतले ड्रायव्हर्स

आठवणीतले ड्रायव्हर्स....


दुरून धुळीचे लोट दिसू लागले की समजायचं एस टी आली. मग आई बाबा आमचा हात पकडायचे.गाडी जवळ येऊन थांबली की,की गाडीत शिरायला झुंबड व्हायची मग आम्ही दोघे भाऊ त्या गर्दीत मुसंडी मारून आत घुसायचो. ड्रायव्हरच्या मागची आडवी सीट  रिकामी असली की आम्हाला गड जिंकल्यागत आनंद व्हायचा.त्यावेळी एसटीला मागे दरवाजे असत आणि कंडक्टरची सीट त्या दरवाजाजवळ असायची.
    असो, आम्ही धावत जाऊन ती सीटच्या हिरव्या लोखंडी जाळीत बोटे रुतवून पलीकडचं ड्रायव्हर चे विश्व पाहत असू...
एसटीच्या केबिन ही सतत राबणाऱ्या बाईसारखी असते.तिला नटणं मुळात सोसतच नाही..वाहन चालू रहावे आणि ड्रायव्हरला फक्त बसता यावे हाच एक स्वच्छ हेतू ठेऊन केबिनचे विश्व साकारलेले असायचे. भजनी मंडळात जसे बुवा गातात आणि धरकरी साथ देतात तसे केबिनमधील प्रत्येक पार्ट ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंगला आवाज करून साथ देत असंत..
समोर लावलेला गाडीचा बोर्ड उलटा वाचण्यात पण मजा असायची..केबिन मधल्या बेलचे पण कौतुक असायचे.डबल बेल झाली की एका हाताने गिअर टाकून दुसरा हात स्टेअरिंग ठेऊन खाली पायाच्या काही अगम्य हालचाली करून ड्रायव्हर गाडी चालू करायचा आणि इथून आम्ही   ड्रायव्हर चे गट तयार करत असू..
   मंदगती,मध्यमगती आणि जलदगती..अगदी क्रिकेटसारखे..
अजूनही काही ड्रायव्हर्स माझ्या मनोविश्वात स्थान पटकावून आहेत.
    आमच्या लहानपणी काशा मामा नावाचा एक मंदगती ड्रायव्हर होता..त्याच्या इतका सुरक्षित ड्रायव्हर अवघ्या एसटी च्या विश्वात झाला नाही आणि होणारही नाही. त्यांचं ड्राइविंग इतकं स्लो असायचं की रस्त्यात चालणारी म्हैस देखील आपल्या लेकरांना ,"पोरानु सावकाश चला आपला काशामामा हाय"  अस सांगत असावी.त्या काळात स्लो असण्याला  काशामामा  हा एक समानार्थी शब्द होता..एक बर होत की काशामामा फक्त लोकल फेऱ्या मारत असत..जर त्याला मुंबई ट्रिप दिली असती तर रत्नगिरीत बसलेला प्रवासी मुंबईत जाई पर्यंत त्याचे लग्न होऊन मुलेबाळे पण झाली असती असा एक विनोद त्या काळात प्रसिद्ध होता..
शेख नावाचा दुसरा एक ड्रायव्हर म्हणजे ड्राइविंग मधला सुनील गावसकर होता.त्याच्या ड्राइविंगमध्ये राजा रवी वर्म्याचे सौन्दर्य होत..वळण घेताना पोटातल पाणी देखील हलत नसे. कितीही अवघड वळण असो ते अस काही घेत की रस्त्याच्या कॅनव्हासवर ब्रशने एखादं सहज सुंदर चित्र आकाराला यावं...त्यामुळे त्यांच्या गाडीतून प्रवास करणे म्हणजे गावस्करची फलंदाजी बघण्यासारखे होते.
   याच्या अगदी विरोधी जमादार म्हणून ड्रायव्हर होता. तो म्हणजे ड्राइविंग मधला युसूफ पठाण ..
एक पाय चाकाजवळच्या खाचेत रुतऊन दुसरा हात कडीला धरून जमादारचा प्रचंड देह ज्यावेळी चालकाच्या सीटवर आदळायचा तेव्हा प्रवाशीच काय एसटी पण थरथर कापायची. त्याच्या ड्राइविंग च्या वेळी पोटातील पाणी नुसतं हालायच नाही ते बाहेर पण यायच ..महाभारत काळात म्हणॆ धर्मराजचा रथ कायम चार आंगळे वर चालायचा..कलियुगात फक्त जमादारची एसटी चार अंगुळे वर धावायची..
     विठू मुरकर नावाचा आणखी एक ड्रायव्हर होता.त्याला पिछे मूड म्हणायचे..ड्राइविंग करताना सतत मागे बघायची त्याची सवय होती.गाडी चालवताना तो इतका वेळ मागे पाहायचा की अस वाटायचं की याच्या उजव्या कानाजवळ देवाने एक जादा डोळा दिलेला असावा. मागे बसलेल्या ओळखीच्या प्रवाशाची अगदी तपशीलवार  चौकशी करता करता तो ड्राइविंग करत असे..असते एखाद्याची शैली...
     आम्ही शाळेत असताना सहलीसाठी सगळ्यात फेव्हरेट ड्राइवर होता रवी मुरकर...रवी म्हणजे ड्राइविंग मधला सचिन तेंडुलकर.. एसटी च्या भाव विश्वातला देव..सेलिब्रेटी होण्याचे भाग्य लाभलेला हा ड्राइवर सगळ्यांचाच लाडका होता..
    सहलीला जाताना गाडीत धमाल करताना एक लाडिक बाल हट्ट आम्ही हमखास करत असू..समोर दुसरी गाडी असेल तर "ड्रायव्हर काका ड्रायव्हर काका आमची गाडी पुढे हाका" अशी मागणी ठरलेली असे. ड्रायव्हर्सही आमचा बालहट्ट पुरा करत ओव्हर टेक करून गाडी पुढे नेत असत मग गाडीत जिंदाबाद जिंदाबाद चालू होई...
    काळाच्या ओघात बालपणीचे अनेक ड्रायव्हर्स कधीच ओव्हरटेक करून पुढे गेलेत..आमचं जिंदाबाद ऐकायला ते नाहीत..आज एसटीने प्रवास होत नाही..पण ती एसटी आणि ते ड्रायव्हर्स काळजात घर करून राहिलेत...कायमचे!

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

Tuesday, 23 March 2021

वास्तू

वास्तू....

पावस शिंदेवाडी मधील बर्जे यांचं घर...माझं जन्मघर..अंगणातली गुलाबाची झाडं.. बाजूलाच तीन चाकी सायकल..भलं मोठं पोट सावरीत हातात बॅट घेतलेला मी ...समोरच शर्टची बटण उलट सुलट लावलेला आणि ढेंगं पसरून कॅच घ्यायला उभा राहिलेला माझा छोटा भाऊ सुशांत...एवढं धूसर आठवतंय...

पावस.. गोडबोले वाठार..देशमुखांचा जुना वाडा.. वाड्याचे खिळ्याचे दार...शेजारी सतत खोकणाऱ्या लिमये आजी..त्यांची ती बंबई से आये मेरा दोस्त,दोस्त को सलाम करो अस टाळ्या वाजवून गाणं म्हणणारी अपंग वयस्कर मुलगी...दारासमोरचे तीन मोठे फणस...दगडी चबुतरा असलेलं तुळशीवृंदावन.. सायंकाळी त्यावर बसून म्हटलेले पाढे...शेजारच्या हर्डीकरांच्या घरातून रेडिओवर येणारे नाट्यगीतांचे सूर..राजाभाऊ गोडबोले यांनी सकाळीच गो इंदिरा म्हणून कामवालीला घातलेली खणखणीत साद... आणि संध्याकाळी हात पाय मातीने माखून घेतल्यावर वाड्याच्या मागच्या बाजूला आईने घातलेली ऊन ऊन पाण्याची अंघोळ...सर्व काही लक्ख आठवतं...

कसोप बन वाडी...भाई साळव्यांचे हिरव्या रेजांचे कौलारू घर..लांबलचक पडवी त्यात पडदा लावून केलेले दोन खण... भिंतीवर लावलेले राम लक्ष्मण सीता यांचे मोठे फोटो.. त्यासमोर दादांसोबत म्हटलेली रामरक्षा...घनघोर पावसाळी रात्री  पांघरुणात गुडूप होऊन ऐकलेला बाहेरचा पाऊस ...पडवीतल्या झोपळ्यावर बसून रात्री बुवा लिंगायत काकांनी ऐकवलेल्या भुतांच्या गोष्टी...   उन्हाळ्यात अंगणात ठेवलेले ते आंब्याचे खोके. त्यावर लिहिलेली ती पाठविणार आणि घेणार यांची नावे...सगळं काही कालच घडलेलं...

पावस देसायांच्या अनंतनिवास च्या बाजूचे पानगले यांचे घर..पुन्हा एकदा पार्टिशन टाकून केलेले एकाच खोलीचे दोन भाग..ते आईचे शेणाने सारवणे..रोज संध्याकाळी देसायांच्या घरातून येणारे आरती रामचंद्राचे...भक्तिमय सूर...गणपतीत त्या आरत्या...ती सजावट..साधं स्वच्छता गृह नसताना अनुभवलेले ते अपार सुख अजून मनाच्या तळाशी साचून राहील आहे..

परत पावस शिंदेवाडी...शरद गुरव यांचे घर..मायाळू गुरव दाम्पत्य.. सतत दादा दादा करणारी रूपा.. त्या क्रिकेटवरच्या गप्पा..शेजारच्या महाविष्णूच्या देवळात येणारे आणि अनुनासिक स्वरात " चला दिवे लावून घेतो" अस म्हणून प्रसन्न स्मित करणारे धनंजय जोशी काका...देवळात बसून केलेला तो शेवटच्या वर्षाचा अभ्यास.. भाड्याच्या घरातून झालेली ताईंची बिदाई...आणि त्याच घरात झालेलं भाच्याच बारसं...
    भाड्याच्या घरातल्या सगळ्या सुख दुःखाच्या आठवणींना मनाच्या कुपीत बंद करून 23 मार्च ला केलेला विवेकानंद नगर गोळप येथील स्वतःच्या वास्तूत केलेला प्रवेश..आज आमच्या वास्तूचा वाढदिवस..आई-दादांनी स्वकष्टाने उभ्या केलेल्या वास्तूला घामाचा सुगंध आहे..ज्यांनी भाड्याच्या घरात दिवस काढले आहेत त्याना स्ववास्तूची किंमत कळते..त्या घराला रि सेल व्हॅल्यू नसतेच मुळी... ते अमूल्य असते..तिची ओढ लागते..ती वास्तू आपल्याशी बोलते..फक्त ऐकता आलं पाहिजे.. 

-प्रशांत शेलटकर

Sunday, 21 March 2021

देव

देव

ते म्हणाले देव आहे
हे म्हणाले देव नाही
मी म्हणालो दोघांना
मला त्यातलं कळत नाही

ते म्हणाले ओरडून
देवाला रिटायर्ड करा
जे नाहीच त्याला
रिटायर्ड कस करा?

भलतेच खवळले ते
म्हणाले तू अडाणी
देव म्हणजे येडेपणा
देव म्हणजे नशापाणी

देव नसला तर  नसूदे
माझं जरा ऐक ना
देव असला तरी 
तुला फरक नाहीच ना?

ज्याला जस दिसत
ते त्याला दिसू दे
कृतज्ञेपोटी तरी
हात जोडलेले असू दे

तुझी श्रद्धा तत्वावर
तो कुठे बोलत नाही
त्याची श्रद्धा दगडावर
तू का समजून घेत नाही

तुला जिथे दगड दिसतो
तो तिथे ईश्वर पाहतो..
तुझा भार तुझ्यावर
त्याचा देवावर असतो

तू जसा विचार करतो
त्याने तसाच करावा का?
सिद्ध केलेच पाहिजे सर्व
तुझा वेड्या हट्ट का?

देव ज्यांनी नाकारला
त्यांचाच पुढे देव झाला
आधी लाजत मग वाजत
देव्हाऱ्यात जाऊन बसला

कापुसकोंड्याच्या गोष्टीला
अंत जसा नाही.
देव आहे की नाही?
प्रश्नाला या उत्तरच नाही

देव आहे म्हणालास तर 
तो अगदी समोर आहे
देव नाहीच म्हणालास तर
नुसता मेंदूला घोर आहे

-प्रशांत शेलटकर
8600583846

Wednesday, 10 March 2021

डाव अर्धमुर्धा

डाव अर्धमुर्धा


पहाटेच मजला जाग यावी
 मिठीत माझ्या तू असावी
अन तुझ्या उष्ण श्वासांची
मादक एक गझल ऐकावी

केस विस्कटलेले असावे
टिकलीचे ग  स्थान ढळावे
काजळ गहिऱ्या डोळ्यांमध्ये
तृप्तीचे अलवार स्वप्न असावे

मिठी थोडीशी सैल असावी
पण त्यातही एक ओढ असावी
उघड्या पाठीवरती माझ्या
नखा-क्षतांची नक्षी असावी

खिडकीत गोजीरा चंद्र असावा
आपल्याकडेच तो पहात असावा
मोकळ्या केसात ग तुझ्या
मी चांदण्याचा श्वास माळावा

मग गार गार वारा यावा
विळखा मिठीचा घट्ट व्हावा
मग रात्रीचा अर्धा-मुर्धा
डाव पहाटे पूर्ण व्हावा

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

निळा इ

माझं आकाश आता मोकळं
मिळशार आणि निरभ्र...
ढगांचा मागमूस नाही
चांदण्यांची आस नाही...
सगळं कसं मोकळं मोकळं

सगळीकदे कस निळं निळं
निळ्याच्या पलीकडे निळं
त्याच्याही पलीकडे निळं
सगळेच रंग विरून गेलेत
अवघाची रंग एकची झालाय
निळा ,निळा आणि निळाच

 ही संमोहन करणारी निळाई
याला विठाई म्हणू की कृष्णाई
याला निळाइकडे पाहता पाहता
मी निळाच होत जातोय..
त्या निळाईत माझा विलय होतोय





Monday, 8 March 2021

लेख-फोन मॅनर्स

मॅनर्स म्हणजे काय भाऊ??? मॅनर्स म्हणजे लेटेस्ट डिझाइन किंवा फॅशनचे कपडे घालणे? महागडे कपडे घालणे? बॉलिवूड हॉलीवूड आपल्या गप्पात असणे..? महागडे मोबाईल हँडसेट वापरणे???आणि हे सगळे करून आपण मॉडर्न आहोत हे दाखवणे किंवा आपण काळाच्या बरोबर आहोत किंवा कसे पुढे आहोत ते दाखवणे?
     मोबाईल वरून आठवलं, बहुसंख्य मोबाईल वापरणाऱ्यांना फोन मॅनर्स नसतातच..
१. फोन आल्यानंतर ,तो त्वरित न उचलणे, किंवा नंबर बघून करू नंतर असा विचार करणे.फोन कोणाचाही असो तो पटकन उचलला पाहिजे.काही वेळा अर्जंट काम असू शकते.

२. काही वेळा आपण महत्वाच्या मिटिंग मध्ये असतो किंवा गाडीवर असतो अशावेळी कॉल बॅक करणे खूप गरजेचे असते. आणि असे कॉल बॅक करताना, सॉरी ह मी अमुक कारणा मुळे कॉल उचलू शकलो नाही, असे आवर्जून बोलावे,मग तो कॉल कोणीही केलेला असू दे.ऑफिसमधील बॉस असू देत अथवा शिपाई अगदी आपल्या घरातील छोटे मूल का असेना? असे बोलून तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढत असते.आणि असे जेव्हा तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत करता त्यावेळी त्या मुलाच्या नजरेत तुम्ही रिस्पेक्टड पर्सन होत असता.

३. फोन वर बोलताना कधी खोटं बोलू नये. कधी कधी ऑफिसच्या बॉस ला आपण रस्त्यात आहोत येतच आहोत असे सांगतो,नेमकं त्यावेळी कुकरच्या शिट्ट्या होतात.किंवा मी ऑफिसमध्ये आहे असे सांगितले तर समोरच्याला गाडीचे हॉर्न ऐकू जातात.एकदा तुम्ही खोटे बोललात की तुमची विश्वासार्हता कमी होते

४. ज्यावेळी आपण कॉल करतो त्यावेळी समोरच्या माणसाची स्थित्ती लक्षात घ्यावी.समोरची व्यक्ती बिझी आहे का? आता मी बोलू शकतो ना?अशी परवानगी घेऊनच संभाषण सुरू करावे? गृहिणींना सकाळच्या वेळी शक्यतो फोन करू नये त्या बिझी असतात,काही स्त्रिया आपण निवांत झालो की मैत्रिणींना फोन करत सुटतात, आपण फ्री झालो म्हणजे समोरची व्यक्ती  फ्री असेलच असे नाही ना..काही माणसांचा रात्रीचा जेवायची वेळ रात्री 10 आणि झोपायची वेळ 12 असते पण सगळ्ययांच्या वेळा तशाच असतील अस गृहीत धरून फोन केला जातो तेव्हा समोरचा माणूस गाढ झोपलेला असतो.तुम्ही जरी रात्री फोन केला असला तरी त्याच्या दृष्टीने ती अपरात्र असते.

५. बोलताना कमी शब्दात पण प्रभावी बोलावे.समोरच्या माणसाचे पूर्ण ऐकून त्यावर विचार केल्याशिवाय बोलू नये.समोरच्याचे बोलणे मध्येच तोडून आपले बोलणे त्यात घुसवू नये.विषयानुरूप नेमके बोलावे,फाफट पसारा लावून बोलू नये.आपल्या अनावश्यक बोलण्याने समोरच्या व्यक्तीला येणारे अर्जंट कॉल ती व्यक्ती घेऊ शकत नाही.

६. आपल्या घरात पाहुणे आले असतील तर आपल्याला येणारे कॉल कमीत कमी सभाषणाचे असतील याची दक्षता घ्यावी.तुमच्याकडे आलेला नातेवाईक, मित्र,मैत्रीण ही तुम्हाला भेटायला आलेली असते, तुमचे फोनवरच बोलणं ऐकायला नाही.घरात पाहुणे आल्यानंतर मोबाईल वर व्यस्त राहणे हे अडाणीपणाचे लक्षण आहे.

७. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वर बोलताना ,आर्थिक विषय बोलू नये,तसेच आपले पासवर्ड ,खाजगी गोष्टी इतरांना ऐकु जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

८.एखादी वाईट बातमी देताना,समोरची व्यक्ती जबाबदार आहे याची खात्री करून बातमी दयावी. या उलट आनंदाची बातमी देताना, शुभेच्छा देताना तुमचा आनंद तुमच्या शब्दातून कळला पाहिजे.कोरड्या शुभेच्छा लगेच समजतात.

९..दुचाकी वरून जाताना मोबाईल वर कधीही बोलू नये.वेळ सांगून येत नाही.

१०. काही वेळा आपल्याला  चुकून दुसरे कॉल येतात अशावेळी न रागावता सौम्य शब्दात wrong कॉल असल्याचे सांगावे.

११. मिसकॉल देण्याचा हलकटपणा कधीच करू नये.अपक्याला जर बोलायचे असेल तर सरळ कॉल करावा.असे पैसे वाचवून कोणी बंगला बांधल्याचे माझ्या पाहण्यात नाही

-प्रशांत शेलटकर
8600583846



अप्रेषित

तुझ्या कौतुकाचा मुळी
हव्यास मज नाही
नजरेत तुझ्या असावे 
प्रयास मुळीच नाही..

जसा आहे तसाच ना
दिसावा मी तुला..
नजरेत तुझ्या राहण्याचा
अट्टाहास मुळीच नाही

उगा कौतूकाचे सोहळे
तू नको करू कधी
मज नावाजावे लोकांनी
सायास मुळीच नाही

तक्रार करून जगाची
मी काय साध्य करावे
मज लोकांच्या वागण्याचा
अदमास मुळीच नाही..

जावे सुळावर एकदाच
जे प्रेषित म्हणून आले
रोज जातो सुळी मी
क्लेश मुळीच नाही

/-प्रशांत शेलटकर
 8600583846





Friday, 5 March 2021

सल

सल...

आजकाल जुनेपाने
मी आठवत नाही
आजकाल उगाच काही
मी साठवत नाही

मी चाललो पुढेच
मागे पहातही नाही
काय भोगले मागे
ते सांगतच नाही

भार फुलांचाही आता
काही सोसवत नाही
आता कुणाकडेही
मी विसावत नाही

देणे नियतीचेही
मी ठेवतच नाही
आता जगण्याचे कसले 
हिशेब लागत नाही

आता उरलेल्या क्षणांना
मी सजवत नाही
आता सुखाने हसाया
मन धजावत नाही..

आता माझेच कौतुक
मला ऐकवत नाही
सल आतल्या काटयाची
आता जाणवत नाही

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Thursday, 4 March 2021

अ. ल.क- ४ रेसिपी

त्याला जाग आली..रात्री बायकोने रेसिपीचे पुस्तक वाचून तिथेच ठेवले होते.आज संडे...बहुतेक आज नॉनव्हेज ...त्याचे मनात मांडे...पडल्या पडल्या तो पुस्तक चाळू लागला...पुस्तकातील वर्णन आणि चित्रे यांचे सुखद कॉम्बिनेशन जिभेवर जमू लागले..
दुपारी जेवताना पुस्तक बाजूलाच होते.आणि तो चिकन रोस्ट ची रेसिपी वाचता वाचता कोबीची भाजी खात होता

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

अ. ल.क.-१-मोह

अ.ल.क.-१

अत्यंत कलाकुसरीने सजवलेल्या मंडपात, रेशमी धोतर आणि उपरणे परिधान करून,शोभिवंत उच्च आसनावर बसून  ते म्हणाले,
"माणसाने सर्व प्रकारचे मोह टाळले पाहिजेत,साधी राहणी आणि उच्च आचारसरणी हेच सत्य आहे बरं का...."

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

हंगामी मृत्यू....

हंगामी मृत्यू...

अस्ताव्यस्त पसरलेली रात्र,
आणि हा आळसावलेला एकांत
आळोखेपिळोखे देत झोप जागी झालेली
साल्या या मोबाईलला झोप नाही..
बेवड्याने ग्लास उचलावा ना..
तसा मी मोबाईल उचलतो.....
आणि तेच तेच वांझोटे
बघत बसतो,
ऐकत बसतो
वाचत बसतो....
कोणाच्या पोस्टखाली
लाईक साचलेले..
कुणाच्या दुकानात 
गिऱ्हाईक ना फिरलेले...
कुणाच्या पोस्टला
कमेंटचे  डोंगळे लागलेले
कोणी इतिहासाच्या धोबीघाटावर
गेलेल्यांची धुणी धुत बसलेले
छात्या इतक्या फुगलेल्या की
कधीही फुटतील...
प्रेताची कवटी फुटावी तशा...
मला भ्या वाटत...
मी मोबाइल फेकून देतो..

सिनेमा संपल्यावर हॉलमध्ये लायटीत
आजूबाजूचे प्रेक्षक दिसावे ना 
तशी बायका मुले दिसू लागतात
ती आहेतही आणि नाहींतही
ती त्यांच्या मितीत हरवलेली
या क्षणी तरी मी बेदखल झालोय
त्यांच्या विश्वातून...
या क्षणी तरी कोण कुणाचं नाहीये
नवरा,बायको मूल, आई बाबा
सगळी पार्थिव नाती संपून गेलीत
बाकी सगळ्या लयी विरून गेल्यात
तरी श्वासांची लय चालू आहे...

मी खिडकीपाशी येतो,
पलीकडचे झाडंही अशीच 
वेगळ्या मितीत गेलेली..
त्यांचे श्वासही मंद झालेले...
जणू सगळ्या आसमंताचाच
जणू हंगामी मृत्यू झालाय...

मृत्यू इतका सुखद असेल का..
सगळ्याच जाणिवांची वस्त्रे उतरवून
नेणिवेच्या अथांग.. गहिऱ्या डोहात
प्रवेश करणे म्हणजे असेल का मृत्यू ?
दिवसाची माया सुखावते..लळा लावते
पण ही शांत एकांती रात्र...
नेणिवेचे शाश्वत सुख देतेय...
शून्य करतेय माझ्या तन मनाला....

आता परत झोप म्हणते झोप आता
ही आळसवलेली रात्र अजून संपलेली नाही
मी  परत बेडवर येतो...
आता परत डोळे मिटून जातील...
मग मी सुद्धा वेगळ्या मितीत जाईन
माझा पण हंगामी मृत्यू होईल...
उद्या सकाळ पर्यंत...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846








Monday, 1 March 2021

ज्ञान-लेख

पुस्तके माहिती देतात, ज्ञान नाही. वाचन,चिंतन आणि मनन या ज्ञान प्राप्तीच्या पायऱ्या आहेत.पहिल्या पायरीशी थांबून चला आता ज्ञान झाले असे समजणे हे अज्ञान आहे.  
पुस्तक म्हणजे लेखकाला त्याच्या दृष्टिकोनातुन झालेले परिस्थितीचे आकलन असते.वाचक पुस्तक वाचताना लेखकाच्या भूमिकेत जाऊन जणू परकाया प्रवेश करत असतो. लेखकाला समजून घेण्यासाठी ते आवश्यकही आहे. परंतु एकदा का पुस्तक वाचून मिटून ठेवलं की त्या भूमिकेतुन बाहेर पडल पाहिजे.मग आपलं स्वतंत्र चिंतन सुरू केलं पाहिजे.चिंतन म्हणजे सेल्फ डिबेट असतो. जे काही वाचलं आहे त्याबद्दल स्वतःलाच उलटसुलट प्रश्न विचारता आले पाहिजेत. आणि असे मंथन झाल्यानंतर जे काही उरते त्याला ज्ञान म्हणतात.अर्थात असे ज्ञान तरी अंतिम असते का? तर याचे उत्तर नाही आहे.मिळालेले ज्ञान हे पुढचे ज्ञान मिळवण्यासाठीची पायरी असते.अशा अनंत पायऱ्या अनंत काळ चढाव्या लागतात. त्यामुळे ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेलाच विज्ञान म्हणावे का?
     बरं, वाचन म्हटलं की डोळ्यासमोर पुस्तकच येतात, ते तस नसतं, व्यक्ती,समाज परिस्थिती याचेही वाचन करता येते, पुस्तक म्हणजे  व्यक्ती, समाज यांच लेखकाला 
झालेले आकलन आणि त्याचा लिखित सत्यांश.
    केवळ पुस्तक वाचून ज्ञानी होता येते ही एक अंधश्रद्धा च आहे ,रूढार्थाने अशिक्षित बहिणाबाई यांच्या काव्यरचना विद्यापीठांचा अभ्यास विषय होतो यातच सर्व काही आलं..
    संग्रही पुस्तकं असणे म्हणजे शस्त्रसंपन्न असणे अशी उपमा दिली तर ती शस्त्रे प्रत्यक्ष किती वापरता येतात हे महत्वाचे..संग्रही पुलं ची पुस्तक भरपूर पण जगाकडे पाहण्याची जीवनदृष्टी हसरी ,खेळकर ,निरागस नसेल तर त्या  संग्रहाचा उपयोग काय.?  भगवद्गीता वाचली पण प्रत्यक्ष कर्मफळाची आशा सुटत नसेल तर काय उपयोग?
बायबल वाचले पण मन करुणेने भरून येत असेल तर काय उपयोग? बुद्धाची पुस्तके खूप आहेत संग्रही पण मनातून कोणाचा द्वेषच जात नसेल तर या संग्रहांचा उपयोग काय?
      माणूस जस जसे वाचत जातो तसा तो व्यापक होत जातो,हलका होत जातो, तो जर संकुचित  होत असेल तर तो केवळ पुस्तकांचा भरवाहक आहे..बाकी काही नाही

-प्रशांत शेलटकर
 8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...