Ad

Tuesday, 23 March 2021

वास्तू

वास्तू....

पावस शिंदेवाडी मधील बर्जे यांचं घर...माझं जन्मघर..अंगणातली गुलाबाची झाडं.. बाजूलाच तीन चाकी सायकल..भलं मोठं पोट सावरीत हातात बॅट घेतलेला मी ...समोरच शर्टची बटण उलट सुलट लावलेला आणि ढेंगं पसरून कॅच घ्यायला उभा राहिलेला माझा छोटा भाऊ सुशांत...एवढं धूसर आठवतंय...

पावस.. गोडबोले वाठार..देशमुखांचा जुना वाडा.. वाड्याचे खिळ्याचे दार...शेजारी सतत खोकणाऱ्या लिमये आजी..त्यांची ती बंबई से आये मेरा दोस्त,दोस्त को सलाम करो अस टाळ्या वाजवून गाणं म्हणणारी अपंग वयस्कर मुलगी...दारासमोरचे तीन मोठे फणस...दगडी चबुतरा असलेलं तुळशीवृंदावन.. सायंकाळी त्यावर बसून म्हटलेले पाढे...शेजारच्या हर्डीकरांच्या घरातून रेडिओवर येणारे नाट्यगीतांचे सूर..राजाभाऊ गोडबोले यांनी सकाळीच गो इंदिरा म्हणून कामवालीला घातलेली खणखणीत साद... आणि संध्याकाळी हात पाय मातीने माखून घेतल्यावर वाड्याच्या मागच्या बाजूला आईने घातलेली ऊन ऊन पाण्याची अंघोळ...सर्व काही लक्ख आठवतं...

कसोप बन वाडी...भाई साळव्यांचे हिरव्या रेजांचे कौलारू घर..लांबलचक पडवी त्यात पडदा लावून केलेले दोन खण... भिंतीवर लावलेले राम लक्ष्मण सीता यांचे मोठे फोटो.. त्यासमोर दादांसोबत म्हटलेली रामरक्षा...घनघोर पावसाळी रात्री  पांघरुणात गुडूप होऊन ऐकलेला बाहेरचा पाऊस ...पडवीतल्या झोपळ्यावर बसून रात्री बुवा लिंगायत काकांनी ऐकवलेल्या भुतांच्या गोष्टी...   उन्हाळ्यात अंगणात ठेवलेले ते आंब्याचे खोके. त्यावर लिहिलेली ती पाठविणार आणि घेणार यांची नावे...सगळं काही कालच घडलेलं...

पावस देसायांच्या अनंतनिवास च्या बाजूचे पानगले यांचे घर..पुन्हा एकदा पार्टिशन टाकून केलेले एकाच खोलीचे दोन भाग..ते आईचे शेणाने सारवणे..रोज संध्याकाळी देसायांच्या घरातून येणारे आरती रामचंद्राचे...भक्तिमय सूर...गणपतीत त्या आरत्या...ती सजावट..साधं स्वच्छता गृह नसताना अनुभवलेले ते अपार सुख अजून मनाच्या तळाशी साचून राहील आहे..

परत पावस शिंदेवाडी...शरद गुरव यांचे घर..मायाळू गुरव दाम्पत्य.. सतत दादा दादा करणारी रूपा.. त्या क्रिकेटवरच्या गप्पा..शेजारच्या महाविष्णूच्या देवळात येणारे आणि अनुनासिक स्वरात " चला दिवे लावून घेतो" अस म्हणून प्रसन्न स्मित करणारे धनंजय जोशी काका...देवळात बसून केलेला तो शेवटच्या वर्षाचा अभ्यास.. भाड्याच्या घरातून झालेली ताईंची बिदाई...आणि त्याच घरात झालेलं भाच्याच बारसं...
    भाड्याच्या घरातल्या सगळ्या सुख दुःखाच्या आठवणींना मनाच्या कुपीत बंद करून 23 मार्च ला केलेला विवेकानंद नगर गोळप येथील स्वतःच्या वास्तूत केलेला प्रवेश..आज आमच्या वास्तूचा वाढदिवस..आई-दादांनी स्वकष्टाने उभ्या केलेल्या वास्तूला घामाचा सुगंध आहे..ज्यांनी भाड्याच्या घरात दिवस काढले आहेत त्याना स्ववास्तूची किंमत कळते..त्या घराला रि सेल व्हॅल्यू नसतेच मुळी... ते अमूल्य असते..तिची ओढ लागते..ती वास्तू आपल्याशी बोलते..फक्त ऐकता आलं पाहिजे.. 

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...