Ad

Sunday 28 March 2021

आठवणीतले ड्रायव्हर्स

आठवणीतले ड्रायव्हर्स....


दुरून धुळीचे लोट दिसू लागले की समजायचं एस टी आली. मग आई बाबा आमचा हात पकडायचे.गाडी जवळ येऊन थांबली की,की गाडीत शिरायला झुंबड व्हायची मग आम्ही दोघे भाऊ त्या गर्दीत मुसंडी मारून आत घुसायचो. ड्रायव्हरच्या मागची आडवी सीट  रिकामी असली की आम्हाला गड जिंकल्यागत आनंद व्हायचा.त्यावेळी एसटीला मागे दरवाजे असत आणि कंडक्टरची सीट त्या दरवाजाजवळ असायची.
    असो, आम्ही धावत जाऊन ती सीटच्या हिरव्या लोखंडी जाळीत बोटे रुतवून पलीकडचं ड्रायव्हर चे विश्व पाहत असू...
एसटीच्या केबिन ही सतत राबणाऱ्या बाईसारखी असते.तिला नटणं मुळात सोसतच नाही..वाहन चालू रहावे आणि ड्रायव्हरला फक्त बसता यावे हाच एक स्वच्छ हेतू ठेऊन केबिनचे विश्व साकारलेले असायचे. भजनी मंडळात जसे बुवा गातात आणि धरकरी साथ देतात तसे केबिनमधील प्रत्येक पार्ट ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंगला आवाज करून साथ देत असंत..
समोर लावलेला गाडीचा बोर्ड उलटा वाचण्यात पण मजा असायची..केबिन मधल्या बेलचे पण कौतुक असायचे.डबल बेल झाली की एका हाताने गिअर टाकून दुसरा हात स्टेअरिंग ठेऊन खाली पायाच्या काही अगम्य हालचाली करून ड्रायव्हर गाडी चालू करायचा आणि इथून आम्ही   ड्रायव्हर चे गट तयार करत असू..
   मंदगती,मध्यमगती आणि जलदगती..अगदी क्रिकेटसारखे..
अजूनही काही ड्रायव्हर्स माझ्या मनोविश्वात स्थान पटकावून आहेत.
    आमच्या लहानपणी काशा मामा नावाचा एक मंदगती ड्रायव्हर होता..त्याच्या इतका सुरक्षित ड्रायव्हर अवघ्या एसटी च्या विश्वात झाला नाही आणि होणारही नाही. त्यांचं ड्राइविंग इतकं स्लो असायचं की रस्त्यात चालणारी म्हैस देखील आपल्या लेकरांना ,"पोरानु सावकाश चला आपला काशामामा हाय"  अस सांगत असावी.त्या काळात स्लो असण्याला  काशामामा  हा एक समानार्थी शब्द होता..एक बर होत की काशामामा फक्त लोकल फेऱ्या मारत असत..जर त्याला मुंबई ट्रिप दिली असती तर रत्नगिरीत बसलेला प्रवासी मुंबईत जाई पर्यंत त्याचे लग्न होऊन मुलेबाळे पण झाली असती असा एक विनोद त्या काळात प्रसिद्ध होता..
शेख नावाचा दुसरा एक ड्रायव्हर म्हणजे ड्राइविंग मधला सुनील गावसकर होता.त्याच्या ड्राइविंगमध्ये राजा रवी वर्म्याचे सौन्दर्य होत..वळण घेताना पोटातल पाणी देखील हलत नसे. कितीही अवघड वळण असो ते अस काही घेत की रस्त्याच्या कॅनव्हासवर ब्रशने एखादं सहज सुंदर चित्र आकाराला यावं...त्यामुळे त्यांच्या गाडीतून प्रवास करणे म्हणजे गावस्करची फलंदाजी बघण्यासारखे होते.
   याच्या अगदी विरोधी जमादार म्हणून ड्रायव्हर होता. तो म्हणजे ड्राइविंग मधला युसूफ पठाण ..
एक पाय चाकाजवळच्या खाचेत रुतऊन दुसरा हात कडीला धरून जमादारचा प्रचंड देह ज्यावेळी चालकाच्या सीटवर आदळायचा तेव्हा प्रवाशीच काय एसटी पण थरथर कापायची. त्याच्या ड्राइविंग च्या वेळी पोटातील पाणी नुसतं हालायच नाही ते बाहेर पण यायच ..महाभारत काळात म्हणॆ धर्मराजचा रथ कायम चार आंगळे वर चालायचा..कलियुगात फक्त जमादारची एसटी चार अंगुळे वर धावायची..
     विठू मुरकर नावाचा आणखी एक ड्रायव्हर होता.त्याला पिछे मूड म्हणायचे..ड्राइविंग करताना सतत मागे बघायची त्याची सवय होती.गाडी चालवताना तो इतका वेळ मागे पाहायचा की अस वाटायचं की याच्या उजव्या कानाजवळ देवाने एक जादा डोळा दिलेला असावा. मागे बसलेल्या ओळखीच्या प्रवाशाची अगदी तपशीलवार  चौकशी करता करता तो ड्राइविंग करत असे..असते एखाद्याची शैली...
     आम्ही शाळेत असताना सहलीसाठी सगळ्यात फेव्हरेट ड्राइवर होता रवी मुरकर...रवी म्हणजे ड्राइविंग मधला सचिन तेंडुलकर.. एसटी च्या भाव विश्वातला देव..सेलिब्रेटी होण्याचे भाग्य लाभलेला हा ड्राइवर सगळ्यांचाच लाडका होता..
    सहलीला जाताना गाडीत धमाल करताना एक लाडिक बाल हट्ट आम्ही हमखास करत असू..समोर दुसरी गाडी असेल तर "ड्रायव्हर काका ड्रायव्हर काका आमची गाडी पुढे हाका" अशी मागणी ठरलेली असे. ड्रायव्हर्सही आमचा बालहट्ट पुरा करत ओव्हर टेक करून गाडी पुढे नेत असत मग गाडीत जिंदाबाद जिंदाबाद चालू होई...
    काळाच्या ओघात बालपणीचे अनेक ड्रायव्हर्स कधीच ओव्हरटेक करून पुढे गेलेत..आमचं जिंदाबाद ऐकायला ते नाहीत..आज एसटीने प्रवास होत नाही..पण ती एसटी आणि ते ड्रायव्हर्स काळजात घर करून राहिलेत...कायमचे!

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...