हंगामी मृत्यू...
आणि हा आळसावलेला एकांत
आळोखेपिळोखे देत झोप जागी झालेली
साल्या या मोबाईलला झोप नाही..
बेवड्याने ग्लास उचलावा ना..
तसा मी मोबाईल उचलतो.....
आणि तेच तेच वांझोटे
बघत बसतो,
ऐकत बसतो
वाचत बसतो....
कोणाच्या पोस्टखाली
लाईक साचलेले..
कुणाच्या दुकानात
गिऱ्हाईक ना फिरलेले...
कुणाच्या पोस्टला
कमेंटचे डोंगळे लागलेले
कोणी इतिहासाच्या धोबीघाटावर
गेलेल्यांची धुणी धुत बसलेले
छात्या इतक्या फुगलेल्या की
कधीही फुटतील...
प्रेताची कवटी फुटावी तशा...
मला भ्या वाटत...
मी मोबाइल फेकून देतो..
सिनेमा संपल्यावर हॉलमध्ये लायटीत
आजूबाजूचे प्रेक्षक दिसावे ना
तशी बायका मुले दिसू लागतात
ती आहेतही आणि नाहींतही
ती त्यांच्या मितीत हरवलेली
या क्षणी तरी मी बेदखल झालोय
त्यांच्या विश्वातून...
या क्षणी तरी कोण कुणाचं नाहीये
नवरा,बायको मूल, आई बाबा
सगळी पार्थिव नाती संपून गेलीत
बाकी सगळ्या लयी विरून गेल्यात
तरी श्वासांची लय चालू आहे...
मी खिडकीपाशी येतो,
पलीकडचे झाडंही अशीच
वेगळ्या मितीत गेलेली..
त्यांचे श्वासही मंद झालेले...
जणू सगळ्या आसमंताचाच
जणू हंगामी मृत्यू झालाय...
मृत्यू इतका सुखद असेल का..
सगळ्याच जाणिवांची वस्त्रे उतरवून
नेणिवेच्या अथांग.. गहिऱ्या डोहात
प्रवेश करणे म्हणजे असेल का मृत्यू ?
दिवसाची माया सुखावते..लळा लावते
पण ही शांत एकांती रात्र...
नेणिवेचे शाश्वत सुख देतेय...
शून्य करतेय माझ्या तन मनाला....
आता परत झोप म्हणते झोप आता
ही आळसवलेली रात्र अजून संपलेली नाही
मी परत बेडवर येतो...
आता परत डोळे मिटून जातील...
मग मी सुद्धा वेगळ्या मितीत जाईन
माझा पण हंगामी मृत्यू होईल...
उद्या सकाळ पर्यंत...
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment