देव
ते म्हणाले देव आहे
हे म्हणाले देव नाही
मी म्हणालो दोघांना
मला त्यातलं कळत नाही
ते म्हणाले ओरडून
देवाला रिटायर्ड करा
जे नाहीच त्याला
रिटायर्ड कस करा?
भलतेच खवळले ते
म्हणाले तू अडाणी
देव म्हणजे येडेपणा
देव म्हणजे नशापाणी
देव नसला तर नसूदे
माझं जरा ऐक ना
देव असला तरी
तुला फरक नाहीच ना?
ज्याला जस दिसत
ते त्याला दिसू दे
कृतज्ञेपोटी तरी
हात जोडलेले असू दे
तुझी श्रद्धा तत्वावर
तो कुठे बोलत नाही
त्याची श्रद्धा दगडावर
तू का समजून घेत नाही
तुला जिथे दगड दिसतो
तो तिथे ईश्वर पाहतो..
तुझा भार तुझ्यावर
त्याचा देवावर असतो
तू जसा विचार करतो
त्याने तसाच करावा का?
सिद्ध केलेच पाहिजे सर्व
तुझा वेड्या हट्ट का?
देव ज्यांनी नाकारला
त्यांचाच पुढे देव झाला
आधी लाजत मग वाजत
देव्हाऱ्यात जाऊन बसला
कापुसकोंड्याच्या गोष्टीला
अंत जसा नाही.
देव आहे की नाही?
प्रश्नाला या उत्तरच नाही
देव आहे म्हणालास तर
तो अगदी समोर आहे
देव नाहीच म्हणालास तर
नुसता मेंदूला घोर आहे
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment