Ad

Sunday 30 June 2024

कोकनी..

कोकनी...😊


मी नाय भक्त
आनी मी नाय चमचा
खावन पिवन सुखी 
भात आनी लोनचा

हैसून येता पाकीट
थैसून येता पाकीट
टोपी खय कोनास ठाव
उरला फक्त जाकीट

हैसून बी घेयाचा
थैसून बी घेयाचा
पन डोले झाकून
फक्त नोटा दाबायचा

रस्तो खैचो,खड्डो खैचो
ताच काय ता उमगना
आपटून आपटून झेजरून गेली
गाडीवाल्याची ढुंगना..

भगवे निले, हिरवे
एका मालेचे मनी
ऐन आकाडात आंतव
टँकरातना पानी..

ह्यं गेलं नी तं आलं
काय झो फरक पडत नाय
कालीफोर्निया काय म्हंतत ता
आयुक्षात काय व्हनार नाय

-प्रशांत शेलटकर
 8600583846

Sunday 23 June 2024

मनातलं-#४

मनातलं -# -4

स्वसंवेद्य..

सखोल विचार केला तर आपण जिवंत आहोत म्हणजे मानवी मेंदूच्या मर्यादेत राहून केलेले आकलन आहे. सगळ्या जीवंत माणसांनी जिवंत असण्याचे निकष तयार केले आहेत त्या निकषात बसणे म्हणजे जिवंत अन्यथा मृत..
    समोर जे काही दिसतं त्याची सतत जाणीव किंवा अनुभूती किंवा त्याचे आकलन होत रहाणे म्हणजे जिवंत असणे. सगळ्या जाणिवा मेंदूशी निगडित असतात. त्यामुळे जे दिसते ते तसेच आहे आणि तेच वास्तव आहे हे माणसाच्या उत्क्रांत होत गेलेल्या मेंदूने ठरवले आहे.
    बिग बँग झाले पण का झाले? जीव का निर्माण झाले आणि मुळात  मानव निर्माण का झाला? निसर्गाचाच भाग असलेला माणूस निसर्गाचेच तटस्थ निरीक्षण कसे करेल?
    बिग बँग पूर्वी काहीच नव्हते तर काहीच निर्माण व्हायला नको.ज्ञानेश्वरीत एक अर्थपूर्ण शब्द आहे ... " स्वसंवेद्य" म्हणजे स्वतःला जाणून घेण्यासाठी स्वतःच स्वतःला निर्माण केलेले..बिग बँग पूर्वी काहीच नव्हते तर असे काय द्रव्य होते की ज्याला स्वतःलाच जाणून घ्यायचे होते म्हणून स्वतःच स्वतःला निर्माण केले..बरं हे सर्व जंजाळ समजून घ्यायला ,त्याची मांडणी करायला माणूस निर्माण झाला? की जो त्या द्रव्याचाच एक भाग आहे..
    ही एक प्रकारची वैचारिक लुपच आहे, सेम इनपुट सेम आउटपुट..जो पर्यंत त्याचा उलगडा होत नाही ( तसही तो कधीच होणार नाही) तो पर्यंत आपण जिवंत आहोत हे गृहीत धरायला हरकत नाही ज्यादिवशी या लुपच्या बाहेर जाऊ तो मृत्यू असेल..मृत्यू म्हणजे आस्तित्वाचा अभाव ही मांडणी वैज्ञानिक आहे.पण विज्ञान ही एक कापूस कोंड्याची गोष्ट आहे.प्रश्नांची उत्तरे आणि उत्तरातून प्रश्न.. 
    तात्पर्य-जाणून घेणे म्हणजे जाणून घेण्याची मर्यादा समजण्याची जाणीव होणे...

© प्रशांत-शेलटकर
       86 00 58 38 46

Saturday 22 June 2024

यौवने...

तुझ्या उत्तान देहाचे
मी काय करू सखे
हर घडी भासते तुझे
रूप हे अनोखे अनोखे

हे चुंबन म्हणून की
ठिणग्या हव्याहव्याशा
पेशीत रुतल्या माझ्या
ताना तुझ्या हव्याहव्याशा

हे आरोह अवरोह विजेचे
कल्लोळतात देहात माझ्या
वणव्यातही का फुलतात सखे
सांग ना ह्या कळ्या ताज्या

बघ अधीर झाले उरुगेंद हे
व्हावयास त्वरेने मोकळे
मर्दता लाभे सुख इतुके की
फिके पडती अन्य सुखसोहळे

अरे इथे तृप्ती कोणास हवी
अतृप्त राहू दे तुला मला..
रुतले माझे तारुण्य तुझ्यात
इतक्यात घाई कशाला...

 टंच भरले तारुण्यघट तुझे
मनसोक्त प्राशू दे ग यौवने
कटी प्रदेशी चालू दे अविरत
परम सुखाची आवर्तने..

क्षण समाधीचा उत्तुंग गहिरा
इतक्यात मी घेणार नाही
तू थाम्ब म्हणे पर्यन्त सखे
मी मुळीच थाम्बणार नाही

ओठ तुझे हे किंचित उघडे
डोळे तृप्तीत झाकोळले.
देहाच्या हिंदोळ्यावर तुझ्या
मन माझे घेते अखंड झुले..

दाद तुझी घालते समिधा
पेटत्या अखंड देहधुनीत
अन तृप्तीचा मादक संदेश
पोहोचतो तुझ्या पेशींपेशीत

असू दे मिठी तशीच घट्ट
जरी भैरवी उंबऱ्यावर
शेवटचा अंतरा राहिला ग
एकदम येऊ समेवर...

ही पहाट तृप्त झाली
सैलावून मिठी जराशी
तृप्त श्वासात तुझ्या
नीज आली सखे जराशी

-प्रशांत.☺️

Tuesday 18 June 2024

काळोख..

काळोख....

निपचित पडला उजेड
अंधार सोकावला
फडफड करते पणती
दिवा विझून गेला..

दूर कुठे पडले
उजेडाचे कलेवर
देतो अंधार हुंदके
खोटा खोटा गहिवर

आता मिट्ट काळोख
करा काळोखाची सवय
इथे दखलपात्र गुन्हा
येता उजेडाची सय..

पेशी पेशी विझल्या
कशा पेटतील मशाली
इथे उजेड वाहतो
काळोखाच्या पखाली

कशी पेटेल ठिणगी
जाळ आतच नाही
राख बसली निर्लज्ज
फुंकर कामाचीच नाही

चार फेकता तुकडे
श्वाने देती बघा ढेकर
भुकंतात मात्र इमाने
शपथ घालते भाकर

कसली क्रांती फुकाची
कसले रे फुकाचे बंड
पेशी-पेशीत वहाते
रक्त थंड रक्त षंढ..

इथे अंधाराला रहातो
चक्क उजेड जामीन
सुर्यानेच ठेवली इथे
सोन किरणे गहाण.

आता होऊ रे अमिबा
होऊ स्वतःतच लीन
कोण हवे सोबतीला
इथे आपसूक प्रजनन

आता शेवटचा दिवा
वाट विझण्याची पाहू
उजेडाची चुकार पेशी
नाही उरली ना ते पाहू..

मग उरेल  अंधार
भय नजरेचे नाही..
विवेकाची टोचणी
मुद्दलातच नाही...

© प्रशांत

Thursday 13 June 2024

मनातलं #-3

मनातलं #-3

'स्व'.....

अनेक माणसांच्यात प्रत्येक माणूस आपली स्वतंत्र ओळख जपतो.ती माणसाची मूलभूत प्रेरणाच असते. पूर्वी द.पा.खांबेटे यांची मानस शास्त्रावरची छोटी-छोटी पुस्तके मिळत,त्यातल्या एका पुस्तकात त्यानी एक किस्सा लिहिलेला अजून आठवतो. एका शाळेत एक विद्यार्थी असतो त्याला कशातच गती नसते .ना अभ्यासात ना खेळात ना कोणत्या कलेत.. शाळेतले सर्व विद्यार्थी त्याला चिडवत.. त्यावर तो त्याना सांगत असे की सगळ्या शाळेत माझ्या इतके लांबवर कोणीच  थुंकू शकत नाही..😊 तात्पर्य प्रत्येकाला आपलं वेगळेपण जपायच असतं.पण जेव्हा लाखो-अब्जावधी लोकांचा विषय असतो तेव्हा स्वतःची वेगळी जपणाऱ्या लोकांचे समूह निर्माण होतात ,त्याला कोणी धर्म नाव देते कोणी पंथ तर कोणी जात.. माणसाची ही वेगळेपण दाखवायची प्रवृत्ती उपजत असते त्यामुळे जात,पंथ आणि धर्म यांचे उदयास्त नैसर्गिक असतात.प्रत्येक माणसात " स्व" असतोच.त्याच्यामुळेच माणूस सुखावतो तरी किंवा दुखावतो तरी..एका व्यक्तीच्या 'स्व' चा समूहाच्या 'स्व' पर्यंत झालेला प्रवास म्हणजे जात,पंथ आणि धर्म होय. हे समूहाचे 'स्व' प्रचंड विधायक आणि प्रचंड विघातक दोन्ही काम करतात. अर्थात ईश्वर मानणारे धर्म मग तो कसाही असो सगुण किंवा निर्गुण ..केवळ  हेच धर्म आहेत असे नाही. काळाच्या ओघात धर्म न मानणारे कम्युनिस्ट हा सुद्धा एक धर्मच झाला.गंमत म्हणजे त्यात सुद्धा लेनिनवादी,मार्क्सवादी, माओवादी असे पंथ झालेच की....जेवढं विधायक कार्य धर्माच्या नावावर झाले तेवढे कम्युनिस्टांनी पण केलेच आहे.आणि आपली विचारधारा न मानणाऱ्यांची कत्तल धर्माच्या नावावर झाली तेवढी कत्तल कम्युनिस्टानी पण केलीय..
     एकुणात 'स्व' ला नियंत्रण करायला विवेक लागतो, तो विवेक निर्माण करायचे काम धर्माकडून अपेक्षित असते ,पण बहुतेक वेळी हा 'स्व' धर्माला नियंत्रित करतो म्हणजे विद्यार्थ्यांच्या जागी शिक्षक बसतात आणि शिक्षकाच्या जागी विद्यार्थी बसतात.मग विवेक वर्गाबाहेर जातो..
      असो ...पूर्णविराम

© प्रशांत शेलटकर
    86 00 58 38 46

Saturday 8 June 2024

दरवेळी...

दरवेळी....

दरवेळी पावसावर
नवीन काय लिहायचे
तोच चहा तीच भजी
किती वेळ तळायचे

तेच बेडूक तेच डराव
तेच तळे तीच बाव
तेच तेच किती सांगायचं
दरवेळी पावसावर
नवीन काय लिहायचे

जुनी दारू नवीन बाटली
उपमांची गंगा आटली..
तेच गाल तीच बट
तेच तेच किती पहायचे
दरवेळी पावसावर
नवीन काय लिहायचे

पाणी तापलं  गेली वर वाफ
सायन्स हेच सांगतय ना साफ
मग एच टू ओ वर काय लिहायचे
दरवेळी पावसावर
नवीन काय लिहायचे
तोच चहा तीच भजी
किती वेळ तळायचे

® प्रशांत
86 00 58 38 47

तटस्थ..

तटस्थ...

निवडून घ्यावे कांदे
तशी निवडून घेतो बातमी
तरी म्हणे मी तटस्थ
नाही कुणाची गुलामी

फेकून मारू "लिंका"
विरोधकांची जाळू लंका
आपलीच वाजू दे टिमकी
आपलाच झडू दे डंका

कोण जिंकले कोण हरले
याचाच पत्ता नाही..
तरीही करू गंभीर चर्चा
अरे ही काय थट्टा नाही

रंगपेटीत दोनच रंग
पांढरा आणि काळा
सोबत दोनच पक्षी
कावळा आणि बगळा

मेंदूत यांच्या खिळे ठोकले
डावे उजवे फक्त
कोण कोणाचा गुलाम
कोण कोणाचा भक्त

माहितीचा बाजार भरला
भरून घ्या रे गोणी
का आणि कशासाठी?
विचारू नका कोणी

झेंडे उतरून खांद्यावरचे
बघा भोवती लख्ख..
दोन सोडून अनेक रंग
असतात भोवती चक्क

पंत गेले राव चढले
जुने झाले हो आता
युती करुनी भद्र-अभद्र
मिळून भोगती सत्ता

® प्रशांत शेलटकर
86 00 58 38 46




वेळ ही आली बघा
आता अशी नी तशी
बायको गेली माहेरी
अन घ्यावी लागते उशी

मऊ मऊ उशी माझी
रेशमावाणी मऊ मऊ
कुशीत तिला घेऊन
स्वप्नात जाऊ जाऊ

कुशीत घेऊन तिजला



Friday 7 June 2024

भुलू नये

भुलू नये....

थोर माणसांचेही
कधी पाय मातीचे
कधी देखाव्यावर
भुलू नये........

भले मोठे शब्द
देखणे वक्तृत्व
बोलण्यावर फक्त
भुलू नये.....

गढूळ अंतरंग
निर्मळ बाह्यरंग
फक्त दिखाव्यावर
भुलू नये....

मुखी रामाचे नाव
अंतरी रावणा ठाव
फक्त नावावर
भुलू नये....

प्रतिभेचे उत्तम देणे
पण गुणच जिथे उणे
फक्त प्रतिभेवर
भुलू नये...

केली बहु पारायणे
तरी विन्मुख नारायणे
पाखंडी मनुष्यास 
भुलू नये...

केली अस्मादिकांनी चूक
जे चूक ते चूक
कान धरण्या  माझा
भुलू नये....

--- @ प्रशांत शेलटकर
     86 00 58 38 46

@ प्रशांत

Saturday 1 June 2024

मनातलं #-2

मनातलं # - 2

शून्य म्हणजे काहीही नाही.. Absolutely nothing..गंमत म्हणजे काहीही नाही हे सिद्ध व्हायला काहीतरी असावे लागते त्याशिवाय काहीही नाही हे सिद्धच होत नाही.पुन्हा त्यात ट्विस्ट म्हणजे "काहीतरी" आहे हे सिद्ध व्हायला   "काहीतरी" नसावं लागतं. अंधार हा प्रकाश सापेक्ष आहे आणि प्रकाश हा अंधार सापेक्ष आहे.अंधाऱ्या खोलीत लाईट लावला की प्रकाशाचे अस्तित्व जाणवते आणि लाईट ऑफ केला अंधाराचे अस्तित्व जाणवते.मग सत्य काय ? अंधार की प्रकाश? हा एक कापुसकोंड्याचा प्रश्न..
      निराकार म्हणजे ज्याला आकार नाही ते? मग ज्याला आकारच नाही ते समजून कसे घ्यायचे? निराकार म्हणजे निर्वात पोकळी? मग ही निर्वात पोकळी समजून घ्यायला काहीतरी डोळ्यासमोर येणे नैसर्गिक आहे ना? त्याशिवाय समजणार कसे ? एका कोऱ्या कागदावर मधली जागा सोडून चारी बाजूला  डिझाइन काढली तर डिझाइन सोडून उरलेली जागा म्हणजे निर्वात पोकळी.. पण ती केव्हा जाणवेल ? जेव्हा डिझाइन असेल तेव्हाच ना? म्हणजे " नाही" हे सिद्ध व्हायला " आहे" चे अस्तित्व  असावे लागते , नास्तिक आणि आस्तिक या संकल्पना अशाच असतील का?..
   ....अर्थात हे सगळे चिंतन..मनन मानवी मेंदूच्या मर्यादित कक्षेतले आहे. मानवी मेंदूला जे आकलन होईल तेच सत्य या गृहीत तत्वावर आधारलेले आहे, कारण तसे गृहीत धरणे अपरिहार्य आहे. काहीतरी बेस असल्याशिवाय चिंतनाची इमारत उभी रहात नाही.पण हा बेस काही पूर्ण सत्य नाही, मानव सोडून इतर प्राण्यांच्या विशेष क्षमता पहिल्या तर या विश्वात मानवी आकलनाच्या पलीकडे खूप काही आहे हे दिसून येते.पण अज्ञानात आनंद या कल्पनेत रमून माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे या समजाला उराशी कवटाळून बसण्यास तूर्तास तरी हरकत नाही..पुढचे पुढे...

@ प्रशांत शशिकला शशिकांत

8600583646

कोकनी..

कोकनी...😊 मी नाय भक्त आनी मी नाय चमचा खावन पिवन सुखी  भात आनी लोनचा हैसून येता पाकीट थैसून येता पाकीट टोपी खय कोनास ठाव उरला फक्त जाकीट हैस...