काळोख....
निपचित पडला उजेड
अंधार सोकावला
फडफड करते पणती
दिवा विझून गेला..
दूर कुठे पडले
उजेडाचे कलेवर
देतो अंधार हुंदके
खोटा खोटा गहिवर
आता मिट्ट काळोख
करा काळोखाची सवय
इथे दखलपात्र गुन्हा
येता उजेडाची सय..
पेशी पेशी विझल्या
कशा पेटतील मशाली
इथे उजेड वाहतो
काळोखाच्या पखाली
कशी पेटेल ठिणगी
जाळ आतच नाही
राख बसली निर्लज्ज
फुंकर कामाचीच नाही
चार फेकता तुकडे
श्वाने देती बघा ढेकर
भुकंतात मात्र इमाने
शपथ घालते भाकर
कसली क्रांती फुकाची
कसले रे फुकाचे बंड
पेशी-पेशीत वहाते
रक्त थंड रक्त षंढ..
इथे अंधाराला रहातो
चक्क उजेड जामीन
सुर्यानेच ठेवली इथे
सोन किरणे गहाण.
आता होऊ रे अमिबा
होऊ स्वतःतच लीन
कोण हवे सोबतीला
इथे आपसूक प्रजनन
आता शेवटचा दिवा
वाट विझण्याची पाहू
उजेडाची चुकार पेशी
नाही उरली ना ते पाहू..
मग उरेल अंधार
भय नजरेचे नाही..
विवेकाची टोचणी
मुद्दलातच नाही...
© प्रशांत
No comments:
Post a Comment