मनातलं #-3
'स्व'.....
अनेक माणसांच्यात प्रत्येक माणूस आपली स्वतंत्र ओळख जपतो.ती माणसाची मूलभूत प्रेरणाच असते. पूर्वी द.पा.खांबेटे यांची मानस शास्त्रावरची छोटी-छोटी पुस्तके मिळत,त्यातल्या एका पुस्तकात त्यानी एक किस्सा लिहिलेला अजून आठवतो. एका शाळेत एक विद्यार्थी असतो त्याला कशातच गती नसते .ना अभ्यासात ना खेळात ना कोणत्या कलेत.. शाळेतले सर्व विद्यार्थी त्याला चिडवत.. त्यावर तो त्याना सांगत असे की सगळ्या शाळेत माझ्या इतके लांबवर कोणीच थुंकू शकत नाही..😊 तात्पर्य प्रत्येकाला आपलं वेगळेपण जपायच असतं.पण जेव्हा लाखो-अब्जावधी लोकांचा विषय असतो तेव्हा स्वतःची वेगळी जपणाऱ्या लोकांचे समूह निर्माण होतात ,त्याला कोणी धर्म नाव देते कोणी पंथ तर कोणी जात.. माणसाची ही वेगळेपण दाखवायची प्रवृत्ती उपजत असते त्यामुळे जात,पंथ आणि धर्म यांचे उदयास्त नैसर्गिक असतात.प्रत्येक माणसात " स्व" असतोच.त्याच्यामुळेच माणूस सुखावतो तरी किंवा दुखावतो तरी..एका व्यक्तीच्या 'स्व' चा समूहाच्या 'स्व' पर्यंत झालेला प्रवास म्हणजे जात,पंथ आणि धर्म होय. हे समूहाचे 'स्व' प्रचंड विधायक आणि प्रचंड विघातक दोन्ही काम करतात. अर्थात ईश्वर मानणारे धर्म मग तो कसाही असो सगुण किंवा निर्गुण ..केवळ हेच धर्म आहेत असे नाही. काळाच्या ओघात धर्म न मानणारे कम्युनिस्ट हा सुद्धा एक धर्मच झाला.गंमत म्हणजे त्यात सुद्धा लेनिनवादी,मार्क्सवादी, माओवादी असे पंथ झालेच की....जेवढं विधायक कार्य धर्माच्या नावावर झाले तेवढे कम्युनिस्टांनी पण केलेच आहे.आणि आपली विचारधारा न मानणाऱ्यांची कत्तल धर्माच्या नावावर झाली तेवढी कत्तल कम्युनिस्टानी पण केलीय..
एकुणात 'स्व' ला नियंत्रण करायला विवेक लागतो, तो विवेक निर्माण करायचे काम धर्माकडून अपेक्षित असते ,पण बहुतेक वेळी हा 'स्व' धर्माला नियंत्रित करतो म्हणजे विद्यार्थ्यांच्या जागी शिक्षक बसतात आणि शिक्षकाच्या जागी विद्यार्थी बसतात.मग विवेक वर्गाबाहेर जातो..
असो ...पूर्णविराम
© प्रशांत शेलटकर
86 00 58 38 46
No comments:
Post a Comment