बघ आता कशी दिसतेस....
ऐकलस का?
किचन मधून जरा
बाहेर ये...
पीठाने भरलेले हात
विस्कटलेले केस
तसेच राहू देत
आणि आरशासमोर
उभी रहा..
....बघ कशी दिसतेस...
आता,
पीठाने भरलेले हात
धुऊन घे
विस्कटलेले केस..
बांधून घे..
अस्ताव्यस्त ओटा
आवरून घे
आता परत..
आरशासमोर उभी रहा
....बघ आता कशी दिसतेस...
आता तशीच
बाथरूम मध्ये जा
केस बांधून घे
आणि शॉवर खाली उभी रहा
गाण्याची एक लकेर
उमलून येईल आपोआपच
तिला तशीच उमलुदे
तिथेही आरसा असेलच
त्यात बघ स्वतःला ..
....बघ आता कशी दिसतेस
केस बांधून बाहेर ये
मान थोडी तिरपी कर
केस पुसत आरशात बघ
मघाचची लकेर
लकेर अजून गळ्यात असेलच
थोडी हस आणि
परत आरशात बघ ....
....बघ आता कशी दिसतेस
आता मस्त पैकी सजून घे
फिकटशी लिपस्टिक
ओठांवर फिरुदे..
केस मोकळेच असू दे ग
छान दिसतात तुला
आता आरशात न्याहाळ स्वतःला
.....बघ आता कशी दिसतेस
आता ना तुला तो आठवेल
चक्क दिसेलही आरशात
तुझ्या मागेच असेल तो
आणि तू विचारशीलही त्याला
" सांग ना रे मी कशी दिसते"?
तो गालात किंचित हसेल
बोलणार तर काहीच नाही
फक्त मागूनच तुला कवेत घेईल
तो काही बोलला नाही तरी
त्याचा स्पर्श सांगेल तुला
की तू खूप छान दिसतेस...
नकळत डोळे भरून येतील
क्षणभर डोळे मिटून घेशील
परत डोळे उघडशील तेव्हा
मागे तो नसेल...
नकळत डोळे टिपून घेशील
पुन्हा नजर आरशात जाईल
.. बघ आता कशी दिसतेस
कंठ दाटून येईल
डोळे भरून येतील
तू सावरलंस तरी..
कदाचित समोरचा आरसा?
तो मात्र हुंदका देईल..
आता तिथे थांबू नकोस
आरशातही बघू नकोस
तसही तो तुला सांगणार नाहीच
आता तू कशी दिसतेस !!!!
-©प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846