धर्म आणि त्याचे अनुयायी...
माणसाच्या प्रवृत्ती आणि विकृती धर्माच्या पलीकडच्या असतात त्या बदलायला धर्म देखील असमर्थ ठरतो. म्हणून धर्म बदलला म्हणून वृत्ती बदलतेच असे नाही. ज्याची वृत्ती सज्जन असते तो कोणत्याही धर्मात असेना तो सज्जनच असतो. सगळेच भारतीय धर्म मानवता सांगतात. इतर परदेशातून आलेल्या धर्माचा माझा अभ्यास नाही आणि जिथे अभ्यास नाही तिथे व्यक्त होणे चूक आहे असे माझे मत आहे.
काही विकृत प्रथा धर्माला बदनाम करतात म्हणून तो अखंड धर्म किंवा पंथ वाईट नसतो. एखादा धर्म त्या माणसाच्या वर्तनावर किती चांगला प्रभाव टाकतो याच्यावर त्या धर्माची नाही तर त्या माणसाचीच गुणवत्ता सिद्ध होते. अत्यंत उच्च प्रतीचे तत्वज्ञान सांगणारे धर्म त्यांच्याच अनुयायांना झेपत नाहीत मग ती माणसे त्या धर्मालाच निम्न पातळीवर आणून सोडतात.
होमोसेपियन लेव्हल पासून सुरू झालेला माणसाचा प्रवास अखंड चालू आहे. सर्व तऱ्हेच्या उन्नत अवस्था काही ठराविक माणसांना प्राप्त होतात त्याना आपण प्रेषित म्हणतो इतकंच. सामान्य माणूस त्या उन्नत माणसांच्या प्रभावात येतो पण त्यांची उन्नत अवस्था प्राप्त करणे सर्वाना शक्य होत नाही.तो कर्मकांडांच्या प्रभावात राहतो. प्रत्येक पंथाचे कर्मकांड वेगळे असते तरी ते असते हेच महत्वाचे.. तू तुझे कर्मकांड सोड आणि माझे कर्मकांड स्वीकार हा एक विनोदी तितकाच केविलवाणा विरोधाभास असतो. आणि हे विरोधाभास,या विसंगती, हे वाद-विवाद जगाच्या अंतापर्यंत चालू रहाणार. विश्वाची उत्पत्तीच परस्परविरोधी तत्वातून निर्माण झाली आहे .आणि माणूस हा विश्वाचाच अविभाज्य भाग असल्यामुळे परस्परविरोधी विचारांचे प्रतिबिंब मानवी वर्तनात,व्यवहारात पडणे साहजिकच आहे
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment