एका झिम्माड दिवशी
काऊ चिंब भिजला
घरट्यापाशी चिऊच्या
दारातच तो थाम्बला
दार उघड चिऊताई
मी तुझा ग काऊ
भिजलो नखशिखांत
आता कुठे जाऊ?
होऊन जरा कोरडा
घेईन चहा जरासा
पाऊस थांबे पर्यंत
दे ग जरा आडोसा
काऊ भिजला कितीही
चिऊताईस माया नाही
जपते बिचारी स्वतःला
भरवसा कुणाचा नाही
पण तोडायचे कसे
मन कावळ्याचे ते
म्हणून सांगत राहिली
ती वेगळेच बहाणे
म्हणाली थाम्ब जरा
मी आहे थोडी बिझी
पिल्ले बाथ टबात
खेळतात रे माझी
त्याना पुसून घेते
लावते गंध टिकली
थाम्ब तू जरासा
घाई नाही रे चांगली
कावळा म्हणाला,
चिऊ ताई ठीक आहे
आवर तुझे निवांत
मी मोकळाच आहे
असे कित्येक बहाणे
चिऊताई ने मग केले
भिजतच कावळ्याला
तिने दारातच ठेवले
वाट पाहून थकला
काऊ उडून गेला..
पण जाता जाता तिला
बोल सुनावून गेला
ऐक ग नीट चिमणे
मी चिऊताई म्हणतो.
भावा विषयी मनात ना
का संशय मनी दाटतो
मी असेन ग काळा
पण मन नाही माझे काळे
नदी किनारी बघ जरा
टपले किती शुभ्र बगळे
दिसण्यावरून कुणाला
तू नको धिक्कारू
अन फक्त रंगावरून
नको कोणा स्वीकारू
बोल बोलून हिताचे
काऊ उडून गेला..
दार उघड चिऊताई
कधीच ना पुन्हा म्हणाला
-प्रशान्त
No comments:
Post a Comment