पुस्तक....
एखादे पुस्तक वाचावे ना
तसे स्वतःला वाचत सुटावे..
कधी प्रश्न करावे कधी उत्तरावे
पण अखंड वाचत सुटावे..
काही पाने हसवणारी
काही पाने रडवणारी
काही तर अगदीच
भयव्याकुळ करणारी
नकळत आपले डोळे टिपावे
पण,एखादे पुस्तक वाचावे ना
तसे स्वतःला वाचत सुटावे..
काही पाने हसरी
तर काही दुखरी
काही रटाळ अगदी
काही अगदी साधी-सुधी
वाटले क्षणभर रेंगाळावे
तर जरूर थांबावे...
पण , एखादे पुस्तक वाचावे ना
तसे स्वतःला वाचत सुटावे..
पांढऱ्यावरती नेहमीच काळे
नसते ना नेहमी नेहमी
अक्षरांना रंग गुलाबी
येतो ना कधी कधी...
मग त्या अक्षरांचे
हलके अलगद चुंबन घ्यावे
पण, एखादे पुस्तक वाचावे ना
तसे स्वतःला वाचत सुटावे..
आयुष्याच्या या पुस्तकाला
कोण जाणे किती पाने
पुढच्या पानावर काय लिहिले
हे तो एक विधाताच जाणे
किंचित करून बोट ओले
एकेक पान पलटत रहावे
एखादे पुस्तक वाचावे ना
तसे स्वतःला वाचत सुटावे..
कधी प्रश्न करावे कधी उत्तरावे
पण अखंड वाचत सुटावे..
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment