शिशिर
अंधाराची ओढून चादर
गुडूप झोपली पहाट मात्र
निपचित पडली गात्र तरी
श्वास निरंतर चालती मात्र...
झाडांचेही तेच ते प्राक्तन
ती ही उभीच गेली गारठून
पाना-पानात त्यांच्या हिरव्या
शिशिर कधीचा गेला ओघळून
इथे कुणाला निमित्त पुरले
विळखे आणखी घट्ट झाले
अन घट्ट मिठीत कुणा कुणाचे
सृजनाचे रम्य ,सोहळे रंगले...
पान- पातेरा जमवून कोणी
शेकोटीचा खेळ मांडती
धगधगत्या ज्वाळेकडे ते
एकटक मग उगाच पाहती
चहा उकळतो कुठे गाडीवर
वाफ त्याची दिसते सुंदर
घोट घेता अलगद त्याचा
रम्यच क्षण तो भासे खरोखर
"यंदा थंडी जास्तच आहे"
कोणी बोलतो उगाच काही
मग वाफाळती तोंडे देती
उगाच दुजोरा त्यालाही...
हा शिशिर सांगतो काही
ऐका मित्रानो निवांत
झाला कितीही आकांत
तरी आत असावे शांत
ही विपश्यना निसर्गाची
मौनात खोल जाण्याची
गोठल्या संवेदना तरीही
आत वसंत जपण्याची
.
.
गोठल्या संवेदना तरीही
आत वसंत जपण्याची...
-@प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment