दुनियादारी
समजून घेतोय दुनिया अन्
समजून घेतोय दुनियादारी...
काळोख डसलेल्या जिंदगीची
काळोखाशी दोस्ती न्यारी
समजून घेतोय व्यवस्थेच्या
निर्जीव झाडावर टांगलेल ...
बळीराजाचं कलेवर अन्
समजून घेतोय त्याच्या लक्षुमीचा
काळजाशीच गोठलेला अस्फुट हुंदका
अन् हेही समजून घेतोय...
त्याच्या कच्चाबच्चांच्या
खपाटीस गेलेल्या पोटातला जाळ
अन् सरकारी चिटूरक्यावरची
बळीराजाच्या जिंदगीची ...
सरकारी किंमत.....
मी समजून घेतोय व्यवस्थेच्या
थडग्यात गाडलेली कित्येक
बळीराजाची अन कामगारांची
आोळख हरवलेली मढी
ज्यांचा डि एन ए थेट माझ्याशी जुळतोय
पण तरीही अजुन समजून घेतोय
काळोखाच्या चादरीवरची
नक्षत्रांची नक्षी...
कार्ल मार्क्सच्या थडग्यात
अजून जिवंत असेल का समाजवादाची
एखादी पेशी....
अजूनही समजून घेतोय
दुनिया अन् दुनियादारी
-प्रशांत शेलटकर
No comments:
Post a Comment