कविराज..
कोण म्हणून काय पुसता
दाताड वेंगाडुनी...
आम्हास ओळखते दुनिया
कविराज म्हणुनी...
उठता बसता दात घासता
सुचते आम्हास हरघडी काव्य
अतिसामान्य चिजांतही दिसते
आम्हास असे काही भव्य
उघडतात डोळे तुमचे
आमचे उमलते नेत्र कमल
तुम्ही फक्त दात घासता
आम्ही करतो दंतपंक्ती धवल
चार तांबे ओतून तुमची
अंघोळ कशीतरी उरकते
भिजते अंगांग कवीचे तेव्हा
त्यास त्याची प्रिया बघा स्मरते
जेवताना तुम्हा दिसे फक्त
वरण भात भाजी पोळी
तिथेही आम्हास होते
काव्य स्फूर्ती आगळी
मऊ सूत पोळी म्हणू की
प्रियेचे गोरेपान अंग..
साधा भातही दरवळतो
जसा बासमतीचा गंध
कधी केस सापडता व्यंजनी
तुम्ही किती डाफरता,
परी आम्हास त्या प्रसंगी
सुचते बघा कविता..
प्रिये तुझा बघ चुकार कुंतल
आमटीत क्रीडा करतो..
लपतो मी इथे म्हणे तो
तू शोध रे शोध म्हणतो
खट्याळ केस तुझे
आवर ग आवर सजणे
असे आमटीत लपणे
शोभते का त्या सजणे?
तुम्ही फक्त जेवता
कवीराज आस्वाद घेतो
सुपारी कुठे ?
कवी अक्षरे चघळतो
तुम्हाला केवळ पावसाळा
आम्हास ऋतू हिरवा
तुम्हास जरी कंटाळा
आमच्या मनात नवा रुजवा
तुम्ही करता कामधंदा
कवी प्रपंच यज्ञ करतो
तुम्ही फक्त करता प्रवास
कवी मस्त सफर करतो
चुकूनही चिचारु नका
कवी काय करतो?
शब्दांची का असेना
तो फुंकर घालत असतो
तो फुंकर घालत असतो
प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment