Ad

Thursday, 27 February 2025

बिचारी माय मराठी

बिचारी...

लाभले आम्हास भाग्य 
बोलतो मराठी..
व्यवहारातून जरी बाद
माय आमची मराठी..

भैय्यासवे न बोलतो 
आम्ही मराठी..
तिथे लाजते बुजते
आमुची मराठी

एकमेकांशी बोलतो
आम्ही इंग्रजी हिंदी
घरातच आमुच्या
दीनवाणी मराठी

बोली भाषेस आमुच्या
हसतो आम्ही मराठी
न घरचे न घाटचे
श्वान आम्ही मराठी

फक्त इतिहासात रमतो
आम्ही मराठी
आमचाच खरा म्हणून
भांडतो आम्ही मराठी

कशास हवे उगाच
एक दिवस मराठी मराठी
उद्यापासून दीनवाणी
आमुची मायबोली मराठी

- © प्रशांत

गमतीदार मराठी प्रतिशब्द

काही गमतीदार मराठी प्रतिशब्द

मोबाईल- चलद्रुकश्राव्यउपकरण

स्टेटस- स्थितीसंदेश

अप्लिकेशन-स्वयंचलित कार्यावली

इन्स्टाग्राम-जलदद्दृकश्राव्यसंदेश स्वयंचलीतकार्यावली

व्हाट्सएप-जिज्ञशमनसंदेशवहनस्वयंचलित कार्यावली

ऑनलाईन- अदृश्यवहनमाध्यम

रिल्स-कलादर्शीनीआंशिकफित

टॅग-कळशब्द

यू ट्यूब-तुनळी

फेसबुक-मुखपुस्तक

प्रोग्राम-स्वयंचलितकार्यावळ

एस एम एस- अ.सं.से (अल्प संदेश सेवा)

लॅपटॉप-अंकीयसंगणक (अंक-मांडी)

डिजिटल- अंकीय (अंक-संख्या)

किबोर्ड-कळपट्टी

क्लाउड बॅकअप- मेघसदृश्यसंचयिका

😛😛😛😛😛

-प्रशांत

Tuesday, 18 February 2025

बर्ड व्ह्यू

बर्ड व्ह्यू...


कोणताही समाज पूर्णपणे खलनायक नसतो त्यातले आंतरप्रवाह वेगळे असतात..त्या प्रवाहात किती आणि कोणत्या दिशेने बदल होतात हे खूप महत्वाचे असते. काही प्रवाह कट्टरतेकडून उदारतेकडे जात आहेत तर काही प्रवाह उदारतेकडून कट्टरतेकडे जात आहेत ,त्यातही काही प्रवाह कट्टरतेकडून अधिक कट्टरतेकडे जात आहेत..समाज ते व्यक्तीनिष्ठता असाही एक बदल होत जातोय.आणि सर्व सामान्य  ते वेगळी ओळख असेही स्थित्यंतर होतंय.
    त्याच बरोबर समाजाचा विज्ञाननिष्ठते होणारा प्रवास  हा देखील धर्मसापेक्ष असतो हे मान्य करावे लागेल. त्यातील काही प्रवाह मंद आहेत तर काही प्रवाह जलद.. तर काही चक्क उलटे आहेत..
    इतिहास होऊन गेलेला असतो वर्तमान समोर असतो.भावनिक होण्यापेक्षा व्यावहारिक होणे सर्वच समाजाच्या हिताचे असते.हजारो वर्षे आपण समाजाची विभागणी हे आपले ते त्यांचे या दोन गटात करत आलो आहोत. आणि त्या नादात वास्तवाचे भान विसरत जात आहोत..
     समाज म्हणजे काळा आणि पांढरा या दोनच रंगातल चित्र नाही.त्यात अनेक शेड्स असतात. गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर समाजाचे एक वेगळेच समीकरण असते .तिथे एक अधिक एक बरोबर दोन इतके सोपे नसते, मिळवलेले दोन एक कोणत्या गुणवत्तेचे आहेत त्यावर उत्तराची गुणवत्ता असते. गुणवत्तेचे एक अधिक एक अधिक एक असे शंभर वेळा केलं तर येणारे उत्तर शांती असू शकते..आणि एक अधिक एक असे फक्त एकवेळा केलं तरी त्याचे उत्तर अशांती असू शकते..
    काही गोष्टीत बर्ड व्ह्यू महत्वाचा असतो.

© प्रशांत

Saturday, 8 February 2025

बुद्धिमान उल्लू...

बुद्धिमान उल्लू...

समतोल विचार करायला शिकवणारी पुस्तके वाचली पाहिजेत, एकाच विचारसरणीची तीच तीच पुस्तके वाचली तर आपण त्याच विचारसरणीचे होत जातो..मेंदू गुलाम होणे हे शरीर गुलाम होण्यापेक्षा वाईट..मानसिक गुलामी समजून येत नाही..जग बहुरंगी आणि बहुढंगी असताना मानसिक गुलामी त्यातला एकच रंग आणि एकच ढंग दाखवते.. आणि तेच एकमेव सत्य असल्याचा आभास निर्माण करते..
     माध्यमं मग ती प्रिंट असो वा डिजिटल त्याच्या आहारी न जाता स्वतःचा मेंदू शाबूत ठेवणे हे निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे..तथागत म्हणाले होते अत्त दीप भव... स्वतःचा मार्ग दीप स्वतःच हो..सध्याच्या मोहमयी वातावरणात आपण अत्त दीप होण्याची क्षमता हरवून बसलोय..आपण आपल्या भूतकाळाकडे ना तटस्थपणे पाहू शकत ना वर्तमानाकडे..कोणाला तरी नायक अथवा खलनायक केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही.आपल्याला अनुकूल कळप जॉईन करणे आणि विरोधी कळपावर तुटून पडणे , यातच आपला मेंदू अडकून पडला तर भविष्याबद्दल आपण काय विचार करणार?
      समाज म्हणजे अनेक चांगल्या-वाईटाचे मिश्रण असताना आपण काय पाहावं आणि कसा विचार करावा हे ठरवणाऱ्या व्यवस्था निर्माण झाल्यात मग त्या राजकीय असो ,अराजकीय असो किंवा धार्मिक असो..प्रिंट आणि डिजिटल माध्यमाद्वारे मेंदू ताब्यात घेऊन आपआपले कळप तयार करून ते व्यवस्थेला कसे पूरक राहतील याची दक्षता घेतली जातेय.
     आजचा सोशल आणि प्रिंटिंग मीडिया जर संपुर्ण समाजाला  इतका उल्लू बनवत असेल उद्याचा ए आय काय उत्पात करेल..कल्पना पण करू शकत नाही..भविष्यात मोजक्या व्यक्ती जग नियंत्रित करतील अशी साधार भीती वाटत आहे..सरंजामशाही-लोकशाही-सरंजामशाही हे चक्र तर नाही ना?????

-प्रशांत

Thursday, 6 February 2025

बाजार...

बाजार...

बाजारात उभा होतो...
अनेक माणसं आणि प्राणी ये जा करत होती..एक गाढव आलं ..त्याने कचरा कुंडी शोधली ..ते तिकडे रमले..चार पाच कुत्री त्याना हवं ते हुंगत इकडे तिकडे फिरत होती..बाजूला फळांचा स्टॉल लागला होता.. छान ताजी फळं बकेट भरून लावली होती..कुत्रा आणि गाढव यांचे तिकडे लक्ष जाणे शक्यच नव्हते...मुळात ते त्यांचे नैसर्गिक खाणेच नाही ना..
     बाजारात एक चिकन सेंटर होते.. शुद्ध शाकाहारी माणस तिकडे फिरकत पण नव्हती..आणि मांसाहारी माणसं भाजीवाल्याकडे पाहत पण नव्हती..
           बाजारात प्रत्येक धर्माचे एकेक स्थळ होत मंदिर . त्या त्या धर्माचे धार्मिक लोक त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळावर जात येत होते..ईश्वर एक असला तरी माणसांनी त्यांची विभागणी केल्या मुळे ते एकमेकांच्या धार्मिक स्थळी जाणे शक्यच नव्हते...प्रत्येकाचा देव मोठा...
        बाजारात एक मोर्चा सुद्धा चालला होता.. मोर्चातले लोक घोषणा देत होते.. कडेने चालणाऱ्या लोकांना त्यांचे काही सोयर सुतक नव्हते..कारण त्यांच्यावर अन्याय झाला नव्हता..आणि मोर्चातल्या लोकांना ते सोडून बाकीचे सगळे शोषक वाटत होते..
     बाजारात सर्व काही होत..आंबट ,तिखट,तुरट,गोड ,कडू सगळ्या चवी होत्या त्या बाजाराला..जो तो आपल्याला आवडेल ती चव चाखून पहात होता....आणि त्याच चवीचा बाजार आहे असे डिक्लेअर करत होता..

.......😊 सोशल मीडिया हा एक प्रकारचा बाजारच आहे..जो तो आपल्याला रुचेल आवडेल आणि बोचेल   ते घेतो आणि तेच आपआपल्या ग्रुपवर पोस्ट करत असतो..
..... जग आपल्या आपल्या चवीनुसार असतं...आंबट,तिखट, गोड ,कडू,तिखट,खारट... 

......झापडं काढून टाकली की बाजार स्वच्छ दिसतो...

😊-प्रशांत

Saturday, 1 February 2025

बेजारी...

बेजारी...

तेच घर तेच शहर
तीच गल्ली तेच गाव
आयुष्यभर चिकटलेल
तेच तेच आपलं नाव

तोच डोंगर तोच सूर्य
तोच समुद्र तेच लव्ह
तीच भेळ तीच वेळ
तोच वडापाव तीच चव

तोच पाऊस तेच ऊन
तोच वारा तेच ढग
तोच  तू तोच मी
तुझ माझं तेच जग

तेच दुःख तेच उसासे
तेच दैन्य तीच खंत
तीच गडबड तीच गर्दी
तोच मोबाईल तीच उसंत

तीच लाळ,तोच आवंढा
तेच लोणी तोच मस्का
तेच बाबू तेच शोना
तोच प्रश्न तू जेवलीस का?

त्याच बातम्या त्याच चर्चा
तेच प्रश्न तीच उत्तरे
तेच रोग तेच रुग्ण
तीच औषधें तेच उतारे

तीच बायको तोच नवरा
तेच मित्र तेच शेजारी
सगळं काही तेच तेच
जिंदगी हीच एक बेजारी

 प्रशांत शेलटकर..

नाव ठेवायला जागा नाही?

नाव ठेवायला जागा नाही?


घाणेकर , गाढवे,आणि किरकीरेंच्या मुलींना कधी एकदा लग्न होऊन नाव बदलतय अस होत असेल का?

गोडबोले नावाची माणसं भांडत असतील का? आणि भांडली तर कशी भांडत असतील?

हसमुख नावाचा माणूस अंत्ययात्रेला गेला तरी हसतमुखाने जात असेल का?

वाघ नावाच्या मुली सासरी वाघमारेंच्या घरी गेल्यावर मूळ वाघांचे काय होत असेल?

सहस्त्रबुद्धेना शाळेत जायची गरज भासत असेल का?

उपरकर..इश्श हे काय नाव आहे?

हरम या नावातला एक काना कुठेतरी हरवलाय अस नाही वाटत?

पेशवे नावाची माणसे ऑफिसमध्ये न जाता दरबारात किंवा सदरेवर जात असतील का?

पोटफोडे नावाच्या माणसासमोर चिलखत घालून जावे का?आणि डोईफोडे नावाच्या माणसासमोर हेल्मेट घालून जावे का?

जोशी नावाने हाक मारली तर रस्त्यातले चारपाच जण वळून का बघतात?

भोले ओ भोले हे गाणं लिहिणाऱ्या भय्याचा मित्र ,भोळे नावाचा मराठी माणूस असेल का?

सातपुते,विसपुते,अष्टपुत्रे या नांवावर चीन मध्ये बंदी असावी का?

तुम्हला पटेल किंवा ना पटेल ,पण पटेल सगळ्या भारतात पसरले आहेत हे तरी पटेल का?

 या अनेक प्रश्नांच्या खुंटयावर लटकलेला  "शेलटकर"

😃😃😃😃

भांडा सौख्यभरे...भांडलंच पाहिजे...

भांडा सौख्यभरे...भांडलंच पाहिजे...


आरोग्यासाठी भांडण आवश्यक आहे. पूर्वी लोक नळावर, बसमध्ये,ऑफिसमध्ये, शाळे मध्ये,घरात,,दारात भांडत असायची..राग आला, पटलं नाही की तिथल्या तिथे  हिशेब क्लीअर करून मिटवला जायचा..
     त्यामुळे मनातला राग ,द्वेष पटकन डी फ्युज होऊन मनातला वणवा विझून जायचा आणि मन मोकळं होवून जायचं..
      आज काय होतंय की भांडण आपण मॅनर्सलेसच्या वर्गात टाकून दिलंय. मनात राग आणि द्वेष असला तरी तो व्यक्त न करता वरवरचा  शांत हसरेपणा आपण स्वीकारालाय..मी भांडलो किंवा भांडले तर माझी प्रतिमा लोकांत कशी होईल याचीच काळजी लागून राहाते..आपली शांत सुस्वभावी एटिकेट्स वाली प्रतिमा ही फेक असते.आतून आपण रागाने ,द्वेषाने, मत्सराने बेभान झालेले असतो . हा डबल स्टॅंडर्ड घातक असतो मनालाही आणि शरीरालाही..आपल्यातले हे "दोन" वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतात.
     एक तर बोलून मोकळं झालं पाहिजे अथवा मोकळं होऊन बोललं पाहिजे..जे पटत नाही ते बोलून मोकळं व्हायचं ,उदाहरण..मैत्रिणीची साडी आवडली नाही तर आवडली नाही अस सांगावं उगाचच छान आहे वगैरे खोटं खोटं बोलू नये..किंवा काही बोलूच नये..साडी छान नाहीये हे तुमचं अंतर्मन सांगतंय पण मैत्रिणीला वाईट वाटेल (मुळात यात वाईट वाटण्यासारखं काही नाही) म्हणून तुमचं बहिर्मन साडी छान म्हणतंय म्हणजे तुमच्या दोन मनात संघर्ष होतोय.. त्यामुळे मन अस्थिर होतय ,मन एकदा अस्थिर झालं की ते रोगांना आमंत्रण देतंय..
    याचा दुसरा इफेक्ट असा आहे की तुम्ही तुमच्या मैत्रीणीला वास्तवापासून लांब नेताय.तिला कल्पनेत रमवताय..म्हणजे जे नाही ते आहे असे समजणे यातूनच स्वतःची, स्वतःसाठी तयार केलेली फेक प्रतिमा तयार होते.हे सुद्धा घातकच..
      उलट्या बाजूने विचार केला तर जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणी ला तिची साडी सुंदर आहे अस खोटं खोट सांगता तेव्हा ती देखील तुमची साडी किती सुंदर आहे ग ,केवढ्याला घेतली? कुठे घेतली असे खोट्या उत्सुकतेने सांगते तेव्हा ती देखील तुम्हाला कल्पनेच्या खोट्या विश्वात नेत असते..
      पुरुषांच्या बाबतीत पण असेच होत असते.पण विषय वेगळे असतात..मूळ मुद्दा असा आहे की आपण जसे दिसते,जसे जाणवते तसे व्यक्त व्हायला विसरलोय.. लाभ आणि हानीची गणिते डोक्यात ठेवून आपण रिलेशनशिप डेव्हलप करतोय.न जाणो भविष्यात हा माणूस उपयोगी पडेल मग याला का दुखवा..असा प्रोफेशनल विचार करतो आपण..त्यालाच आपण मॅनर्स समजून चाललोय.  त्याचे भले बुरे परिणाम आपण भोगतोय..
     भांडण हा सेफ्टी व्हॉल्व आहे..मनात कोंडलेली वाफ निघून जाण्यासाठी.. म्हणून जे मित्र आपल्याशी भांडतात ते सच्चे असण्याची शक्यता जास्त असते..

   म्हणून भांडल पाहीजे, 
   आभाळ मोकळं झालं पाहिजे
   उगाच ढगांची गर्दी कशाला
   बरसून मोकळं झालं पाहिजे..

©- प्रशांत 😊

खंत..

खंत..

आभाळ भरून आलं
पण ते बरसलच नाही
येऊन गेला वसंत तरी
कोकीळ  गायला नाही

आले आले सुख म्हणुनी
दारी तोरण बांधले
सुख आले दारापर्यंत
कोणास ठाऊक परत फिरले

पापण्या किंचित ओल्या
त्याला परत फिरताना
काय आणि कुठे चुकते
ताळा जराही लागेना

सरत आले आयुष्य तरी
जगलो असे वाटेचना
कृतार्थ असे काही
किंचितही घडेच ना

तुटलेली माणसे
अनोळखी त्यांच्या नजरा
एकही क्षण उत्कट नाही
जो वाटेल करू साजरा

बेदखल मी स्वजनातच
छळतो गर्दीतला एकांत
कल्लोळातही ऐकू येतो
सहज आतला आकांत

जे जे प्रिय वाटते
ते ते निघून दूर जाते
विझून जाते निरंजन
फक्त काजळी मागे उरते

-प्रशांत

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...