बुद्धिमान उल्लू...
समतोल विचार करायला शिकवणारी पुस्तके वाचली पाहिजेत, एकाच विचारसरणीची तीच तीच पुस्तके वाचली तर आपण त्याच विचारसरणीचे होत जातो..मेंदू गुलाम होणे हे शरीर गुलाम होण्यापेक्षा वाईट..मानसिक गुलामी समजून येत नाही..जग बहुरंगी आणि बहुढंगी असताना मानसिक गुलामी त्यातला एकच रंग आणि एकच ढंग दाखवते.. आणि तेच एकमेव सत्य असल्याचा आभास निर्माण करते..
माध्यमं मग ती प्रिंट असो वा डिजिटल त्याच्या आहारी न जाता स्वतःचा मेंदू शाबूत ठेवणे हे निरोगी लोकशाहीचे लक्षण आहे..तथागत म्हणाले होते अत्त दीप भव... स्वतःचा मार्ग दीप स्वतःच हो..सध्याच्या मोहमयी वातावरणात आपण अत्त दीप होण्याची क्षमता हरवून बसलोय..आपण आपल्या भूतकाळाकडे ना तटस्थपणे पाहू शकत ना वर्तमानाकडे..कोणाला तरी नायक अथवा खलनायक केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही.आपल्याला अनुकूल कळप जॉईन करणे आणि विरोधी कळपावर तुटून पडणे , यातच आपला मेंदू अडकून पडला तर भविष्याबद्दल आपण काय विचार करणार?
समाज म्हणजे अनेक चांगल्या-वाईटाचे मिश्रण असताना आपण काय पाहावं आणि कसा विचार करावा हे ठरवणाऱ्या व्यवस्था निर्माण झाल्यात मग त्या राजकीय असो ,अराजकीय असो किंवा धार्मिक असो..प्रिंट आणि डिजिटल माध्यमाद्वारे मेंदू ताब्यात घेऊन आपआपले कळप तयार करून ते व्यवस्थेला कसे पूरक राहतील याची दक्षता घेतली जातेय.
आजचा सोशल आणि प्रिंटिंग मीडिया जर संपुर्ण समाजाला इतका उल्लू बनवत असेल उद्याचा ए आय काय उत्पात करेल..कल्पना पण करू शकत नाही..भविष्यात मोजक्या व्यक्ती जग नियंत्रित करतील अशी साधार भीती वाटत आहे..सरंजामशाही-लोकशाही-सरंजामशाही हे चक्र तर नाही ना?????
-प्रशांत
No comments:
Post a Comment