बर्ड व्ह्यू...
कोणताही समाज पूर्णपणे खलनायक नसतो त्यातले आंतरप्रवाह वेगळे असतात..त्या प्रवाहात किती आणि कोणत्या दिशेने बदल होतात हे खूप महत्वाचे असते. काही प्रवाह कट्टरतेकडून उदारतेकडे जात आहेत तर काही प्रवाह उदारतेकडून कट्टरतेकडे जात आहेत ,त्यातही काही प्रवाह कट्टरतेकडून अधिक कट्टरतेकडे जात आहेत..समाज ते व्यक्तीनिष्ठता असाही एक बदल होत जातोय.आणि सर्व सामान्य ते वेगळी ओळख असेही स्थित्यंतर होतंय.
त्याच बरोबर समाजाचा विज्ञाननिष्ठते होणारा प्रवास हा देखील धर्मसापेक्ष असतो हे मान्य करावे लागेल. त्यातील काही प्रवाह मंद आहेत तर काही प्रवाह जलद.. तर काही चक्क उलटे आहेत..
इतिहास होऊन गेलेला असतो वर्तमान समोर असतो.भावनिक होण्यापेक्षा व्यावहारिक होणे सर्वच समाजाच्या हिताचे असते.हजारो वर्षे आपण समाजाची विभागणी हे आपले ते त्यांचे या दोन गटात करत आलो आहोत. आणि त्या नादात वास्तवाचे भान विसरत जात आहोत..
समाज म्हणजे काळा आणि पांढरा या दोनच रंगातल चित्र नाही.त्यात अनेक शेड्स असतात. गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर समाजाचे एक वेगळेच समीकरण असते .तिथे एक अधिक एक बरोबर दोन इतके सोपे नसते, मिळवलेले दोन एक कोणत्या गुणवत्तेचे आहेत त्यावर उत्तराची गुणवत्ता असते. गुणवत्तेचे एक अधिक एक अधिक एक असे शंभर वेळा केलं तर येणारे उत्तर शांती असू शकते..आणि एक अधिक एक असे फक्त एकवेळा केलं तरी त्याचे उत्तर अशांती असू शकते..
काही गोष्टीत बर्ड व्ह्यू महत्वाचा असतो.
© प्रशांत
No comments:
Post a Comment