खंत..
आभाळ भरून आलं
पण ते बरसलच नाही
येऊन गेला वसंत तरी
कोकीळ गायला नाही
आले आले सुख म्हणुनी
दारी तोरण बांधले
सुख आले दारापर्यंत
कोणास ठाऊक परत फिरले
पापण्या किंचित ओल्या
त्याला परत फिरताना
काय आणि कुठे चुकते
ताळा जराही लागेना
सरत आले आयुष्य तरी
जगलो असे वाटेचना
कृतार्थ असे काही
किंचितही घडेच ना
तुटलेली माणसे
अनोळखी त्यांच्या नजरा
एकही क्षण उत्कट नाही
जो वाटेल करू साजरा
बेदखल मी स्वजनातच
छळतो गर्दीतला एकांत
कल्लोळातही ऐकू येतो
सहज आतला आकांत
जे जे प्रिय वाटते
ते ते निघून दूर जाते
विझून जाते निरंजन
फक्त काजळी मागे उरते
-प्रशांत
No comments:
Post a Comment