Ad

Saturday, 27 January 2024

मी डिजिटल..

मी डिजिटल ...

हल्ली मी कुठे असतो समक्ष
भरून राहिले आहे माझे
डिजिटल अस्तित्व...
व्हाट्सअप ,फेसबुक,इंस्टा
आणि ट्विटरवर सुद्धा..

माझा असली चेहरा ...
केव्हाच किडन्याप केलाय
नव्हे तो ही डिजिटल झालाय
आता मी दिसतो  ना
ज्याला हवा तसा...
जशी मागणी तसा पुरवठा..

हल्ली मी अधाशासारखी
माहिती गिळतो.. न चावता
मेंदू तुडुंब भरलाय आणि
माहितीचा लोंढा वाहतोय
धमन्यांतून पेशीकडे..

पेशींचीच झालीत स्वतंत्र संस्थाने
कोणी डाव्या झाल्यात
कोणी उजव्या झाल्यात
कोणी हिंसक कोणी अहिंसक
मोजक्या  निर्विकार पेशीमात्र
निपचित पडून आहेत
निओ-कॉर्टेक्स मध्ये..

हल्ली भीतीच वाटते
गर्दीत मिसळायला
गर्दीपण झालीय हल्ली डिजिटल
तिचा कोलाहल बंदिस्त झालाय
स्क्रीनच्या चमकदार चौकटीत
हल्ली तिथेच होतात 
आंदोलने,दंगली, वाद विवाद
रस्त्यावर दिसतात फक्त झोंबी
म्हणून भीती वाटते गर्दीची

त्याहूनही भीती वाटते
आतल्या गर्दीची..
हल्ली ओळखूच येत नाही
मी माझा मला..
मी आस्तिक की नास्तिक?
डावा की उजवा ? की मधला?
रडवेला आणि अगतिक होऊन
मी माझाच चेहरा शोधतोय

खरं तर मी हरवलोच आहे
कायम स्वरूपी..कायम साठी
यदाकदाचित चेहरा सापडलाच
तर इजिप्तमधल्या ममी सारखा
मी पहात बसेन त्याला..
प्राचीन काळी मी असा होतो तर?

-प्रशांत शेलटकर
 8600583846

आपण आपले

किती एक्सपोज व्हावं
ज्याच त्यानं ठरवावं..
शाबूत ठेवावं स्वतःला
न कशातही हरवावं..

नसतात ना प्रत्येक क्षण
सर्वानाच सांगावेसे
काही गुज असतेच ना
मनातच जपावेसे

युज अँड थ्रो नसतात ना
 केवळ उपभोगाच्या वस्तू
गरज  संपल्यावर म्हणतात ना
कोण मी अन कोण तू..

यशाचाच तुमच्या बघा
लोकांना किती मत्सर
आतून जळतील खाक
वरून स्तुतीचे अस्तर

बोलू द्यावे लोकांना
ते काय बोलतच असतात
तुला म्हणून सांगतो म्हणून
सगळयांनाच सांगत असतात

कालची क्लोज माणसं
आज अनोळखी होतात
स्वार्थ साधल्यावर
सगळीच माणसे दूर जातात

एक काडी हवी असते
उंट जमीनीवर बसायला
एक निमित्त हवेच असते
नाती सगळी तोडायला

माफ करून सगळ्यांना
आपण मात्र पुढे जावे
भुंकणारे भूकंत असतात
आपण का बरे लक्ष द्यावे

- प्रशांत

Wednesday, 24 January 2024

एक मीरा ...एक राधा..

मेरे तो गिरीधर गोपाल... दुसरो न कोय...

     राधा आणि मीरा दोघींमध्ये एक साम्य होत..दोघी केवळ नाममात्र विवाहित होत्या त्यांचे सर्वस्व कृष्ण होता पण तो पूर्णार्थाने त्यांचा कधी झालाच नाही..
     पण राधे पेक्षा मिरेचे प्रेम जास्त तरल आणि श्रेष्ठ..राधेला कृष्णाचा पार्थिव सहवास तरी होता..पण मीरा आणि राधा यांच्यात युगांचे अंतर होते..मिरेला कृष्ण कधीच पार्थिव रुपात भेटणार नव्हता..तरी मीरा त्याच्यावर उत्कट प्रेम करत राहिली..प्रसंगी विषाचा प्याला प्राशन केला तिने...जो कधीच मिळणार नाही त्याच्यावर उत्कट प्रेम करत रहाणे सर्वाना जमत नाही...ज्यांना जमत त्या राधा किंवा मीरा होतात....

स्वार्थ पूर्ण झाला की ब्रेकपची कारणे शोधणाऱ्या आजच्या तथाकथित प्रेमाच्या कल्पनेच्या बाहेर आहे मीरा.."काहीतरी" मिळवण्याच्या उद्देशाने केलेले प्रेम..ते "काहीतरी" मिळाले की संपून जाते..किंवा नाहीच मिळाले तरी संपून जाते...पाण्याने भरलेला प्याला ओठाला लावला की तृषा शमते.. पण त्याच पाण्यात आकंठ बुडालो तर तृषा आणि तृषार्त दोघेही एकमेकांत विलीन होतात..मीरा आणि राधा कृष्णमय झाल्या त्या याच कारणाने...

- प्रशांत शेलटकर.... "शांतप्रज्ञ"

- 8600583846

साक्षी

साक्षी..

आसक्तीच्या झंझावाती
विरक्तीचा दिवा मिणमिण
जपून ठेवतो घन अंधारी
उजेडाचा टिपूर कण कण

मोहाचा मोहक माहोल
विवेकाची पणती फडफड
फितूर होईल का ओंजळही
हृदयात भयव्याकुळ धडधड

संख्येत गुंतले जप कित्येक
जपमाळ ती झीजून गेली
साधनेच्या लख्ख ज्योतीला
अहंकाराची काजळी आली

शब्दांनी सजले शब्दच केवळ
क्षीण आतले शांतीसुक्त
आसक्तीचे गारुड आत अन
वरून केवळ दांभिक विरक्त

शरण जावे का आसक्तीला?
पाप पुण्याचे हिशेब मिटावे
जणू देह हा अन्य कुणाचा
आपण केवळ साक्षी व्हावे?

-प्रशांत

सूर्य नमस्कार..१

अ. ल.क. ( अति लघु कथा)

सूर्यनमस्कार -१

....डोळे चोळत चोळत टेरेसवर गेलो..स्वतःला सूर्याकडे सेट केलं..सुरवात केली..ओम मित्राय नमः 
    सूर्य हड म्हणाला.. दुपार साठी राखून ठेवलेला एक जळजळीत किरण माझ्यावर फेकून तो ढगाआड गेला..
    इकडे पृथ्वीलोकात मी तीन  सुर्यनमस्कारात आटपलो होतो..सूर्य ढगाबाहेर आला तेव्हा टेरेसवर कुणीच नव्हते...
   इकडे खाली मला बाथरूम मध्ये " आला मोठ्ठा..नमस्कार घालणारा" . असा वरून आवाज आला आणि नंतर खिक खिक करून कोणीतरी कुत्सित हसले..मला घनदाट संशय त्या सुर्याचाच आहे..

- प्रशांत 😃

Sunday, 7 January 2024

कर्मसिद्धांत

कर्मसिद्धांत-

 जे भगवद्गीता मनापासून वाचतात त्याना कर्मसिद्धांत कळायला फार अवघड नाही. जसे कर्म तसे फळ ..हे तर आपण रोजच्या जीवनात म्हणतच असतो..पण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपण गोंधळतो, खचून जातो.. 
     सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते हे एकदा मान्य केलं की दुःखाची तीव्रता कमी होते आणि सुखाच्या क्षणी पाय जमिनीवर रहातात. यात गंमत अशी होते , दुःख वाट्याला आले तर माणूस म्हणतो हे माझ्याच वाट्याला का आले? पण जेव्हा सुख येते तेव्हा ..हे सुख माझ्याच वाट्याला का? असे विचारतो का?.. सुख सनाथ असते आणि दुःख अनाथ असते हेच खरे.. 
    माझ्याच बाबतीत का? तर बाबा तुझ्या कर्माप्रमाणे तुला मिळाले हेच उत्तर..पण यात सुद्धा एक गंमत ..माणसाला केवळ याच जन्माची कर्म आठवतात तीही आपण केलेली चांगली कर्मेच आठवतात..वाईट आठवत नाहीत कारण एक तर ती नकळत केलेली असतात किंवा केलेल्या वाईट कर्माचे छान पैकी समर्थन केलेले असते..त्यामुळे ती कर्मे पण चांगली कर्मे म्हणूनच मनुष्य गृहीत धरतो. त्यामुळे मी एवढा चांगला वागूनही माझ्या नशिबात का ? याचे कारण आपल्याला या जन्मातील आणि गत जन्मातील वाईट कर्मे माहीत नसतात.
    तो एवढा वाईट असून त्याच्या बाबतीत नेहमी चांगले का घडते या प्रश्नाचे उत्तर कर्म हेच आहे.म्हणून तुलना करू नये.
   प्रत्येकाची बॅलन्सशीट वरूनच  आलेली असते. त्यात सत्कर्माच्या ठेवींचे संचित असते आणि वाईट कर्माचे कर्ज असते.जसे कर्ज वाढत जाईल तसे त्याला दुःखाचे व्याज लागते आणि ते भरावे लागते.सत्कर्माच्या ठेवींवर सुखाचे व्याज मिळत असते. आयुष्यभर असे कमी जास्त होत असते.. शेवटच्या क्षणी कर्ज असो वा ठेव जशी असेल तसा पुढचा जन्म मिळतो..कर्ज फारच असेल तर पशुचा जन्म मिळतो..ठेव बऱ्यापैकी असेल तर मनुष्य जन्म आणि जर कर्ज आणि ठेव दोन्ही निरंक म्हणजे नाहीशी झाली की मोक्ष ...
    सर्व संग्रहाचा अंत हेच अंतिम सत्य..

सर्वांचे कल्याण होवो.😌🙏🏻🙏🏻

-प्रशांत शेलटकर

Monday, 1 January 2024

किंचित ज्ञान ..उदंड अज्ञान...☺️

किंचित ज्ञान ..उदंड अज्ञान...☺️

1 +1  = 2 गणिती उत्तर
1+ 1  =  1 जैविक उत्तर
1 + 1 =  0  अध्यात्मिक उत्तर

खुलासा- 1 या संख्येत 1 ही संख्या मिळवली तर 2 उत्तर येते हे गणिती उत्तर

1 स्त्री  आणि 1 पुरुष एकत्र  आले तर मूल जन्माला येते हे जैविक उत्तर

जीव  शिवस्वरूपात विलीन झाला  की शून्यावस्था येते हे झाले  अध्यात्मिक उत्तर ...

       ☺️☺️☺️☺️☺️

ज्याच्या त्याच्या मिती आणि मतीनुसार
तिन्ही उत्तरे बरोबर ..मानवी इंद्रियगम्य जाणिवांच्या पलीकडे काही असते.याला सर्वमान्य पुरावा नाही. आणि जोपर्यंत पुरावा नाही तो पर्यंत विज्ञान त्याला मान्य करत नाही. हे विज्ञानाच्या विशिष्ट मितीमध्ये सत्यच आहे.
     मेंदूच्या सद्यस्थितीतील प्रगतीच्या अंगाने विचार केला तर जेवढे आकलन होते आणि जेवढे सिद्ध होते तेच सत्य  हे बरोबर...भूतकाळात आदिम अवस्थेत मेंदूचा विकास जितका होता तितकेच त्याचे आकलन ,तितकीच त्याने मान्य केलेली तथ्ये ,काढलेले निष्कर्ष हे सारे आदिम अवस्थेतील मेंदूच्या दृष्टीने विज्ञानच होते.
   जशी मेंदूची प्रगती होत गेली तशी त्याचे भवतालाचे आकलन बदलत गेले ते अधिक सखोल सविस्तर आणि त्याच वेळी सूक्ष्म होत गेले. जुनी तत्वे ,निष्कर्ष बाद होत गेले नवीन प्रस्थापित होत गेले.
   गंमत आणि इंटरेस्टिंग  भाग म्हणजे उत्क्रांती अजूनही होत आहे. मेंदू अजून डेव्हलप होतोय. त्यामुळे जुन्याची पडझड होऊन नवीन निर्मिती होणारच..जुने म्हणजे केवळ धार्मिक ,अध्यात्मिक नव्हे , विज्ञान देखील बदलत रहाणार.
   मला सगळे कळते हे जर अध्यात्म म्हणत असेल आणि आपल्या मती आणि मितीनुसार ते चूक असेल तर विज्ञानालाही असे म्हणता येणार नाही की विज्ञानालाच सगळे कळते. जिना चढताना पायाखालची पायरी सोडल्याशिवाय वरची पायरी गाठता येत नाही तसेच आधीची मांडणी कितीही तर्कशुद्ध असो उत्क्रांती ती खोटी तरी ठरवते अथवा जुनी तरी ठरवते..काळाच्या ओघात बदलाची गती वाढत जातेय..आजचे शहाणे कालच्याना मूर्ख ठरवतात ..कदाचित उद्याचे शहाणे आजच्या शहाण्यांना मूर्ख ठरवतील..😊

-प्रशांत शेलटकर
8600583846

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...