Ad

Sunday, 7 January 2024

कर्मसिद्धांत

कर्मसिद्धांत-

 जे भगवद्गीता मनापासून वाचतात त्याना कर्मसिद्धांत कळायला फार अवघड नाही. जसे कर्म तसे फळ ..हे तर आपण रोजच्या जीवनात म्हणतच असतो..पण जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपण गोंधळतो, खचून जातो.. 
     सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते हे एकदा मान्य केलं की दुःखाची तीव्रता कमी होते आणि सुखाच्या क्षणी पाय जमिनीवर रहातात. यात गंमत अशी होते , दुःख वाट्याला आले तर माणूस म्हणतो हे माझ्याच वाट्याला का आले? पण जेव्हा सुख येते तेव्हा ..हे सुख माझ्याच वाट्याला का? असे विचारतो का?.. सुख सनाथ असते आणि दुःख अनाथ असते हेच खरे.. 
    माझ्याच बाबतीत का? तर बाबा तुझ्या कर्माप्रमाणे तुला मिळाले हेच उत्तर..पण यात सुद्धा एक गंमत ..माणसाला केवळ याच जन्माची कर्म आठवतात तीही आपण केलेली चांगली कर्मेच आठवतात..वाईट आठवत नाहीत कारण एक तर ती नकळत केलेली असतात किंवा केलेल्या वाईट कर्माचे छान पैकी समर्थन केलेले असते..त्यामुळे ती कर्मे पण चांगली कर्मे म्हणूनच मनुष्य गृहीत धरतो. त्यामुळे मी एवढा चांगला वागूनही माझ्या नशिबात का ? याचे कारण आपल्याला या जन्मातील आणि गत जन्मातील वाईट कर्मे माहीत नसतात.
    तो एवढा वाईट असून त्याच्या बाबतीत नेहमी चांगले का घडते या प्रश्नाचे उत्तर कर्म हेच आहे.म्हणून तुलना करू नये.
   प्रत्येकाची बॅलन्सशीट वरूनच  आलेली असते. त्यात सत्कर्माच्या ठेवींचे संचित असते आणि वाईट कर्माचे कर्ज असते.जसे कर्ज वाढत जाईल तसे त्याला दुःखाचे व्याज लागते आणि ते भरावे लागते.सत्कर्माच्या ठेवींवर सुखाचे व्याज मिळत असते. आयुष्यभर असे कमी जास्त होत असते.. शेवटच्या क्षणी कर्ज असो वा ठेव जशी असेल तसा पुढचा जन्म मिळतो..कर्ज फारच असेल तर पशुचा जन्म मिळतो..ठेव बऱ्यापैकी असेल तर मनुष्य जन्म आणि जर कर्ज आणि ठेव दोन्ही निरंक म्हणजे नाहीशी झाली की मोक्ष ...
    सर्व संग्रहाचा अंत हेच अंतिम सत्य..

सर्वांचे कल्याण होवो.😌🙏🏻🙏🏻

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...