मी डिजिटल ...
हल्ली मी कुठे असतो समक्ष
भरून राहिले आहे माझे
डिजिटल अस्तित्व...
व्हाट्सअप ,फेसबुक,इंस्टा
आणि ट्विटरवर सुद्धा..
माझा असली चेहरा ...
केव्हाच किडन्याप केलाय
नव्हे तो ही डिजिटल झालाय
आता मी दिसतो ना
ज्याला हवा तसा...
जशी मागणी तसा पुरवठा..
हल्ली मी अधाशासारखी
माहिती गिळतो.. न चावता
मेंदू तुडुंब भरलाय आणि
माहितीचा लोंढा वाहतोय
धमन्यांतून पेशीकडे..
पेशींचीच झालीत स्वतंत्र संस्थाने
कोणी डाव्या झाल्यात
कोणी उजव्या झाल्यात
कोणी हिंसक कोणी अहिंसक
मोजक्या निर्विकार पेशीमात्र
निपचित पडून आहेत
निओ-कॉर्टेक्स मध्ये..
हल्ली भीतीच वाटते
गर्दीत मिसळायला
गर्दीपण झालीय हल्ली डिजिटल
तिचा कोलाहल बंदिस्त झालाय
स्क्रीनच्या चमकदार चौकटीत
हल्ली तिथेच होतात
आंदोलने,दंगली, वाद विवाद
रस्त्यावर दिसतात फक्त झोंबी
म्हणून भीती वाटते गर्दीची
त्याहूनही भीती वाटते
आतल्या गर्दीची..
हल्ली ओळखूच येत नाही
मी माझा मला..
मी आस्तिक की नास्तिक?
डावा की उजवा ? की मधला?
रडवेला आणि अगतिक होऊन
मी माझाच चेहरा शोधतोय
खरं तर मी हरवलोच आहे
कायम स्वरूपी..कायम साठी
यदाकदाचित चेहरा सापडलाच
तर इजिप्तमधल्या ममी सारखा
मी पहात बसेन त्याला..
प्राचीन काळी मी असा होतो तर?
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment