सोशल मीडिया सोसत नाही...
फेसबुक, व्हाटस अप,इन्स्टा सारख्या सोशल मीडिया मुळे आपण दांभिक होत आहोत असे वाटत नाही का??
जसे आपण आहोत तसे न दिसता, जसे दिसायला हवे तसे दाखवतो आहोत. सेल्फी काढताना लोकांचे निरीक्षण करा , लोक आधी मोबाईल सेट करतात ,मग स्वतःला सेट करतात, मग स्वतःच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल आणतात..क्लिक करतात आणि मग सगळे परत जाग्यावर येते..
जगातील सर्वात सुखी,आनंदी माणूस आहे हे दाखवण्याच्या ट्रेंड आहे.हे क्लिक पुरती स्माईल दाखवण्याची सवय पुढे अधिक झिरपत जाते ..मग मनात काही भावना असो वा नसो त्याची प्रतिके पोस्ट केली की झाले.. त्याचेच एक कर्मकांड होऊन बसले आहे.
मला कधी कधी प्रश्न पडतो ..नियमित gm आणि gn करणारी माणसे इतरवेळी का बोलत नाहीत? सकाळी उठले ..मोबाईल घेतला की धाड धाड gm चे मेसेज टाकणे हा सवयीचा भाग झाला असेल का यांच्या की मनाचे कंडिशनिंग तसे झाले असेल?
अगदी वाढदिवसाचे मेसेज पण तसेच कोरडे असावेत..वास्तविक आपले अगदी क्लोज असलेल्या लोंकांच्या वाढदिवसाबद्दल आपल्याला कौतुक असते किंवा आपल्या जवळचे कोणी गेले तर आपण नक्कीच दुःखी होतो पण इतरवेळी जगात कोणी वाढले काय किंवा कमी झाले काय आपल्याला त्याचे देणेघेणे नसण्याची शक्यता कमीच ..
सण आले टाक फोटो,वाढदिवस झाला टाक फोटो,गाडी घेतली टाक फोटो,घर घेतले टाक फोटो...हे ठीक आहे पण आज काय खाल्ले त्याचे फोटो,कुठे चाललात त्याचे फोटो, दर वाराच्या स्पेशल देवाचे फोटो, जिममधले फोटो, किती बारीक झालात त्याचे फोटो, सकाळीच मॉर्निंग गुड असल्याचा निर्वाळा आणि रात्री गुड असेल याचा दिलासा ..बाळाला नाक दाबून औषध पाजावे तसे रोज पाजलेले उपदेशाचे डोस यामुळे आपणच रिकामटेकडे आहोत अस वाटायला लागतं...लोकांचं काय काय चालू असत...सगळीकडे आनंदी आनंद गडे आणि आपल्याच आयुष्यावर दुःखाची शोककळा पसरलीय अस वाटून राहील तर नवल ते काय??
- प्रशांत शेलटकर
8600583846