बाकी शून्य...
माझ्याच मनाच्या
खोल खोल डोहात
जेव्हा मी उतरतो
तेव्हा त्या डोहाच्या तळाशी
मीच दिसतो
अगदी अगतिक ,असहाय्य
मान गुडघ्यात घातलेला
बिनचेहऱ्याचा मी..
सगळीकडे ...
अंधार लपेटून बसलेला अंधार..
उजेडाची भीती असलेला अंधार
मी....
चिरदाह मिरवणारा ..अश्वत्थामा
मी ...
वासनांचे गंजलेले बाण ...
भात्यात शिल्लक असलेला
कौंतेय ...हो कौंतेयच..
पण मी उतरत नाही आजकाल
माझ्या मनाच्या खोल डोहात
भीती वाटते..
कदाचित मी तिथे नसलो तर?
वेदना मिरवण्याचा ,
अगतिकतेचा ,असहाय्यतेचाही
मोह असतोच ना..
बस्स शून्याला शून्याचा मोह..
बाकी सर्व शून्यच
-प्रशांत
No comments:
Post a Comment