Ad

Saturday, 7 October 2023

समांतर

समांतर..

तू आवडतेस...
प्रचंड आवडतेस..
म्हणूनच..
मी तुला लव्ह यू
म्हणत नाही..
कशाला हवा ना शिक्का
नात्याचा आणि गोत्याचा
नाते म्हणजे सर्पगोळी..
ठिणगी पडली की पेटत जाते
दिशाहीन अपेक्षा...आणि
त्यांचे अक्राळ विक्राळ आकार
अपेक्षाभंगाची धुरकट काजळी
आणि शेवटी उरतो
नात्यांचा निर्जीव गोतावळा..

त्यापेक्षा बरे ना..
अव्यक्तच राहिलेले..
खोल खोल तळाशी
खुप काही जपलेले
आणि हो,
अजून मला तरी कुठे माहितेय
तुझं माझ्यातले अचूक अंतर
मी किती जवळ किती दूर
उगाचच काल्पनिक संकेतांच्या 
शिड्या चढून वर जायचे 
आणि गाफील क्षणी
मिळायचा सर्पमुखी मोक्ष..
कसले अंदाज कसले तर्क..
तू तर तुझ्यातच गर्क..

असेच आपले आयुष्य
समांतर धावत राहील..
जवळ आहोत की दूर आहोत?
प्रश्न मात्र पडत रहातील

ओढ ? जिव्हाळा?
आहेही आणि नाहीही..
आपल्या नात्याची टोटल
कधी लागते कधी लागत नाही
पण तू अशीच समांतर चालत रहा..
आपल्या नात्याचे संदर्भ
शोधत रहा शोधत रहा...
समांतरातले समान अंतर
तू शोधत रहा शोधत रहा

-© प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

चष्मा..

चष्मा.... मित्रा तुझा चष्मा मला दे पाहीन ना जग मी तुझ्या नजरेतून..पण क्षणभरच पण तू ही हे जग बघ ना स्वच्छ नितळ नजरेने चष्म्याशिवाय...... हे च...